

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील प्रत्युत्तरात्मक कराच्या धास्तीने जगभरातील शेअर बाजारात गोंधळ उडाला आहे. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे बाजारपेठेत मोठी घसरण दिसून येत आहे. बुधवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६% आणि चीनवर ३४% प्रत्युत्तरात्मक कर लादण्याची घोषणा केली. यानंतर, आज निफ्टीच्या साप्ताहिक समाप्तीवर शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 310 अंकांनी घसरला होता. त्याच वेळी, निफ्टी देखील १३० अंकांनी घसरला. तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ दिसून आली.
आज व्यवहाराच्या प्रारंभी फार्मा आणि पॉवर स्टॉकमध्ये वाढ झाली. आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. निफ्टीमध्ये डॉ. रेड्डी, सन फार्मा, सिप्ला, पॉवर ग्रिड, एनटीपीसी हे सर्वाधिक वाढणारे होते. यामध्ये २ ते ६ टक्के वाढ दिसून आली. इन्फोसिस, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त घसरण दिसून आली. आयटी शेअर्स २ ते २.५ टक्क्यांनी घसरले होते.
मागील बंदच्या तुलनेत सुरुवातीचे आकडे पाहिले तर सेन्सेक्स ८०६ अंकांनी घसरून ७५,८११ वर उघडला. निफ्टी १८२ अंकांनी घसरून २३,१५० वर उघडला. बँक निफ्टी ४३८ अंकांनी घसरून ५०,९१० वर उघडला. चलन बाजारात, रुपया २३ पैशांनी कमकुवत होऊन ८५.७३/$ वर उघडला.
९ एप्रिलपासून १८० हून अधिक देशांवर १० ते ४९ टक्क्यांपर्यंतचे प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गिफ्ट निफ्टी ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. आशियाई बाजारही कोसळले. निक्केई ३ टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, यूएस फ्युचर्स देखील ४ टक्क्यांनी घसरले आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे जगात घबराट निर्माण झाली आहे. भारतावर २६% परस्पर कर लादला. अमेरिकेत येणाऱ्या सर्व उत्पादनांवर किमान १०% कर आकारला जाणार आहे.
टॅरिफ हा एक प्रकारचा सीमा शुल्क किंवा कर आहे. कोणताही देश परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर हा कर लादतो. हा कर आयात करणाऱ्या कंपनीवर आकारला जातो. या करामध्ये वाढ करुन किंवा कमी करून देश आपापसातील व्यापार नियंत्रित करत असतो.