शेअर बाजारात चैतन्य कायम राहील काय? गतसप्ताहात 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Stock Market | मागील सलग ५ आठवड्यांमध्ये गंगाजळीत वाढ
Stock Market
भांडवल बाजारांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार.(file photo)
Published on
Updated on

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

गतसप्ताहात अमेरिकेच्या आणि चीनच्या व्यापारयुद्धातील होणाऱ्या घडामोडींमुळे भारतीय तसेच जगातील इतर भांडवल बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. गतसप्ताहाची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. परंतु, सप्ताहाअखेर निफ्टी व सेन्सेक्स दोघेही बऱ्यापैकी सावरले.

शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स १३१०.११ अंक म्हणजेच १.७७टक्के वधारून ७५१५७.२६ अंकांवर तसेच निफ्टी ४२९.४० अंक म्हणजेच १.९२ टक्के वधारून २२८२८.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. एकूण संपूर्ण सप्ताहाचा विचार करता निफ्टी ०.३३ टक्के म्हणजेच ७५.९० अंक तर सेन्सेक्स २०७.४३ अंक म्हणजेच ०.२८ टक्के घसरला.

सप्ताहभरात सर्वाधिक वाढ होणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (५.४ टक्के), टायटन (५.२ टक्के), नेस्ले इंडिया (४.४ टक्के), पॉवरग्रीड कार्पोरेशन (३.५ टक्के), जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (३.५ टक्के) या समभागांचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणाऱ्या कंपन्यांमध्ये ट्रेट (-१४.१ टक्के), टाटा स्टील (५.० टक्के), लार्सन अँड टुब्रो (-४.४ टक्के), टाटा मोटर्स (३.१ टक्के), टेक महिंद्रा (२.९ टक्के) या समभागांचा समावेश झाला. नुकतेच अमेरिकेने चीनमधून आधात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्के कर लावण्याची घोषणा केली.

याला प्रत्युत्तर म्हणून चीननेदेखील अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला. या सर्वांमुळे आठवडच्या सुरुवातीला भांडवल बाजारांची डळमळीत सुरुवात झाली. परंतु, अमेरिकेकडून काही प्रमाणात दिलासादायक बातमी आली, चीन वगळता इतर देशांवर लावलेल्या आयात शुल्कांना ९० दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली. यामुळे सप्ताहाअखेर भांडवल बाजारात चैतन्य परतले.

शुक्रवारच्या सत्रात रुपया चलन डॉलरच्या तुलनेत तब्बल ५८ पैसे मजबूत होऊन ८६.१० रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. दिवसादरम्यान प्रतिडॉलर ८५.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली. १ जुलैपर्यंत २६ टक्क्यांचा आयातकर अमेरिकेने स्थगित केल्याने रुपया चलनात मजबूती पहायला मिळाली.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कर २ रुपये प्रतिलिटरने वाढवला, आंतरराष्ट्रीय बाजारात काही महिन्यांपूर्वी खनिज तेलाचे भाव वाढले होते. त्यावेळी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्याने तेल उत्पादन व शुद्धीकरण कंपन्यांना तोटा झाला होता. आता या तोट्याची भरपाई करण्यासाठी सरकारने तेलाचे कर वाढवल्याचे स्पष्टीकरण देण्यात घेत आहे. याचप्रमाणे एलपीजी सिलिंडरच्या किमतीदेखील ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क वाढवल्याने आर्थिक वर्षांमध्ये साकारच्या महसुलात तब्बल ३५ हजार कोटींची भर पडणार आहे.

डिसेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार त्यामागील १२ महिन्यांतील क्रेडिट कार्डवरील बुडीत कर्जवितरण रक्कम (एनपीए) २८.४२ टक्क्यांनी वाहून ६७४२ कोटी झाली. त्यामागील म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये ही रक्कम ५२५० कोटी होती. डिसेंबर २०२४ पर्यंत क्रेडिट कार्डवरील थकीत कर्ज रक्कम एकूण २ लाख ९२ हजार ४४७ कोटींपर्यंत पोहोचली आहे. क्रेडिट कार्डवरील अनुत्पादित कर्जाचे प्रमाण डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत तब्बल ६ पटींनी वाढले आहे. थकीत कर्जावर बँका किंवा कर्जपुरवठादार वित्तीय संस्था जवळपास ४० ते ४६ टक्क्यांपर्यंतचे जबर व्याज आकारते आणि त्या चक्रात ग्राहक फसत जातो.

रिझर्व्ह बँकेच्या या अहवालाने वाढत्या कर्जभाराबद्दल अर्थतज्ज्ञ्यांची चिंता वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील रेपो रेट (व्याजदर) पाव टक्क्यांनी कपात करून ६ टक्क्यांवर आणले. फेब्रुवारीनंतर झालेल्या द्वैमासिक बैठकीत सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केली. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्था वृद्धीदर अंदाजे ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर खाली आणण्यात आला. याचप्रमाणे खाली येणाऱ्या खनिज तेलांच्या किमती लक्षात घेऊन या आर्थिक वर्षाचा किरकोळ महागाई दर अंदाजे (रिटेल इन्फ्लेक्शन) ४.२ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर घटवण्यात आला.

सोने तारण कार्डसंबंधी नियम लवकरच बदलले जाणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे हे नियम अधिक कडक व प्रभावशाली असतील, तसेच ते सर्व बँका आणि सोने तारण कर्जवितरक संस्थांना लागू होतील. लघू व कमी कालावधीच्या गरजा भागवण्यासाठी हमखास सोने तारण ठेवून कर्जे घेतली जातात. यासाठी कर्ज पुरवणाचा वित्त संस्थांची जोखीम व कर्जवाटपाची क्षमता लक्षात घेऊन आणि आर्थिक नुकसान झाल्यास ग्राहकाला भरपाईची हमी देण्याचा नियम प्रभावीपणे अंमलात आणला जाण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सीचे मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल निराशाजनक. कंपनीचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत १.३ टक्के घटून १२३८० कोटींवरून १२२२८ कोटी झाला. कंपनीचा महसूलदेखील केवळ ०.८ टक्के वधारून मागील तिमाहीत असलेल्या ६३९७३ कोटींवरून ६४४७९ कोटी झाला. 'बायजूज' या भारतातील एकेकाळच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपवर अमेरिकेत खटला दाखल.

बायजू रविंद्रन त्यांच्या पत्नी दिव्या गोकुलनाथ आणि बंधूरिजू रविंद्रन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ५३३ दशलक्ष किमतीच्या निधीची हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप आहे. कर्ज मिळवण्यासाठी सदोष वित्तसंबंधी माहिती (फॉल्टी फिनान्शिअल डाटा) कर्जदात्या कंपनीला पुरवल्याचा ठपका 'बायजूज'वर आहे.

'बायजूज 'तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनानुसार या सर्व आरोपांचा साफ इन्कार करण्यात आला असून, 'बायजूज'वर इतर कंपन्या नियंत्रण मिळवण्यासाठी करत असल्याच्या प्रयत्नाचाच एक भाग असल्याचे म्हटले आहे.

मार्च महिन्यात इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने १४.४ टक्क्यांची घसरण दर्शवली. या महिन्यातील इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक २५,०८२ कोटींवर आली. तसेच दरमहा एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीने मागील चार महिन्यांचा नीचांक दर्शवला. एसआयपीद्वारे एकूण २५९२५.६३ कोटी भांडवल बाजारात आले. म्युच्युअल फंडांचे एकूण व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य ६५.७४ लाख कोटी इतके झाले.

चीन व अमेरिकेच्या व्यापारयुद्धात सुरक्षित गुंतवणूक मानली जाणाऱ्या सोन्याला आणखी झळाळी मिळाली. देशांतर्गत बाजारपेठेत शुक्रवारी सोने ६२५० रुपयांनी वाढले. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव १० ग्रॅमला ९६४५० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. चांदीमध्ये किलोमागे २३०० रुपये वाढ होऊन चांदी ९५५०० रुपये झाली, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनतर्फे देण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने प्रतिऔंस ३२०० डॉलर किमतीचा टप्पा ओलांडला.

४ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी १०.८७२ अब्ज डॉलर्स वधारून ६७६. २६८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. सप्टेंबर २०२४ मध्ये गंगाजळीने ७०४.८८५ अब्ज डॉलर्सचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मागील सलग ५ आठवड्यांमध्ये गंगाजळीत वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news