भूषण गोडबोले
मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सप्ताहअखेर 218 अंकांची मंदी दर्शवून 34981 अंकाला तसेच 73 अंकांची मंदी दर्शवून निफ्टी 10526 अंकाला बंद झाला. आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी सेन्सेक्सची 34672 तसेच निफ्टीची 10440 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. सद्य: परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील सावरला आहे; तरीदेखील मागील आठवड्यात शेअर बाजाराने घसरण दर्शविली आहे. कारण अमेरिकन शेअर मार्केटने घसरण दर्शविली आहे. अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डो जोन्स मागील सप्ताहअखेर शुक्रवारी 178 अंकांची घसरण दर्शवून 24285 अंकाला बंद झाला आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार जानेवारी 2018 पासून डो जोन्स मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवत आहे. आगामी कालावधीसाठी 23344 ही डो जोन्ससाठी महत्त्वाची आधार पातळी आहे.
सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाने उसळी दर्शविल्याने शेअर बाजारात घसरण झाली. मात्र सद्य: परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाने घसरण दर्शवून देखील बाजार का घसरत आहे? केवळ कच्च्या तेलाचे दरच नव्हे तर डॉलर रुपयातील चढ-उतार, कंपन्यांचे निकाल, बाजाराचे मूलभूत मूल्याकंन, राजकीय परिस्थिती, महागाईचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. शेअर बाजारावर परिणाम करणारे अनेक घटक असल्याने ट्रेडिंग करताना चार्ट किंवा आलेख पाहणे योग्य ठरते. कारण घटक कोणताही असला तरी परिणाम किमतीवर होणार असतो त्यामुळे मागणी जास्त आहे का पुरवठा, हे आलेखानुसार समजून घेणे आवश्यक असते.
2008 साली जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत कच्च्या तेलाने 3500 पासून 6300 पर्यंत तेजी दर्शविली होती. याच काळात शेअर बाजारात मात्र मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यावेळेस कच्च्या तेलाचे चढे दर हे देखील शेअर बाजारातील घसरणीचे एक प्रमुख कारण ठरत होते. यानंतर जुलै 2008 पासून ऑक्टोबर 2008 पर्यंत कच्च्या तेलाचे दर 6300 पासून 3200 पर्यंत घसरले. मात्र शेअर बाजाराने याही काळात मोठ्या प्रमाणात घसरणच दर्शविली होती. यामुळे केवळ कच्च्या तेलाचे भाव घसरले म्हणून बाजारात हुरळून जाऊन खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. डीएच एफएल असो किंवा एस बँक मध्यम अवधीच्या आलेखानुसार 22 सप्टेंबर रोजी मंदीचा संकेत मिळाला होता. जेव्हा बाजाराचे मूल्यांकन महाग असते तेव्हा आलेखानुसार कोणत्याही शेअरने मंदीचे संकेत दिल्यास कारण शोधत बसण्यापेक्षा सावधान होणे आवश्यक असते.
मंदी दर्शविणारा शेअर मंदीच्या चक्रात आणखी स्वस्त होत जातो आणि अशा वेळेस मंदीचे कारण कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यामुळे ट्रेडिंग करताना आलेखानुसार जोपर्यंत तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत तेजीचे व्यवहार करू नयेत तसेच व्यवहार चुकण्याचा धोका ओळखून स्टॉप लॉस तंत्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे ट्रेडिंग करताना यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम बाजाराचे मूलभूत मूल्यांकन पडताळणे यानंतर बाजाराची आलेखानुसार दिशा पाहणे म्हणजेच 'भाव भगवान छे' सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे.
सद्य: परिस्थितीमध्येे निफ्टीचे मूलभूत मूल्यांकन म्हणजेच पीई 25 पेक्षा जास्त आहे, यामुळे ट्रेडिंग करताना मर्यादित भांडवल गुंतवणे योग्य आहे. मात्र साप्ताहिक आलेखानुसार बाजाराची दिशा नकारात्मक असल्याने जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत लिक्विड किंवा सेफ असेटमध्येच गुंतवणूक ठेवणे आणि योग्य संधीची प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल.
(सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार)