Stock Market Crash: फक्त 'या' 3 कारणांमुळे... शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, नेमकं काय घडलं?

Stock Market Fall Reason: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीही 180 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Fall Reason: आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. सकाळी किरकोळ घसरणीसह सुरू झालेला बाजार पुढे जाताना अधिक खाली गेला आणि सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही 180 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. या घसरणीमागे आशियाई बाजारांतील घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि आयटी क्षेत्रातील दबाव ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले.

सेन्सेक्स-निफ्टीत मोठी पडझड

बीएसई सेन्सेक्सने मागील बंद पातळीच्या तुलनेत घसरणीसह व्यवहार सुरू केला. सुरुवातीला मर्यादित घसरण दिसत असली तरी दिवस जसजसा पुढे गेला तसतशी विक्री वाढली. सेन्सेक्स 76,500 च्या आसपास घसरला, तर निफ्टी 24 हजारांच्या खाली येत 23,900 च्या जवळ पोहोचला.

आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्राला बसला. TCS, Infosys, HCL Tech आणि Tech Mahindra यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. जागतिक आयटी कंपनी Accenture ने महसूल वाढीचा अंदाज कमी केल्याने भारतीय आयटी कंपन्यांबाबतही गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

सर्वाधिक घसरण झालेले प्रमुख शेअर्स

लार्जकॅप शेअर्समध्ये TCS, Infosys, Tata Steel आणि Adani Ports यांचे शेअर्स 2 ते 3 टक्क्यांपर्यंत घसरले. मिडकॅपमध्ये Muthoot Finance, Voltas, Ashok Leyland आणि Dixon Technologies यांनाही मोठा फटका बसला. स्मॉलकॅप कंपन्यांमध्येही विक्रीचा दबाव कायम राहिला.

Stock Market Crash
Raj Thackeray: मराठी भाषेला रस्त्यावर सांडून....; राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, विधानसभेतील चुकीवरून वाभाडे काढले

बाजार घसरण्याची 3 प्रमुख कारणे

1. आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण

जपान, दक्षिण कोरिया आणि इतर आशियाई बाजारांमध्ये मोठी विक्री दिसून आली. विशेषतः दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक तब्बल 8 टक्क्यांपर्यंत कोसळला. नफावसुलीमुळे आणि परदेशी गुंतवणूक कमी झाल्याने तेथील बाजारात तात्पुरते व्यवहारही थांबवावे लागले. याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला.

2. परदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढत आहेत. सोमवारीच एफपीआयने सुमारे 636 कोटी रुपयांची विक्री केली. परदेशी निधी बाहेर जात असल्याने बाजारावर दबाव वाढत आहे.

3. आयटी क्षेत्रातील नकारात्मक संकेत

जागतिक स्तरावर आयटी क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन कमकुवत झाल्यामुळे भारतीय आयटी शेअर्समध्ये विक्री वाढली आहे. Accenture ने महसूल वाढीचा अंदाज कमी केल्याने आयटी कंपन्यांच्या भविष्यातील वाढीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

बाजारातील ही घसरण तात्पुरती आहे की दीर्घकालीन ट्रेंडची सुरुवात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते, घाबरून निर्णय घेण्याऐवजी गुंतवणूकदारांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करावे.

टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news