

पुढारी ऑनलाईन डेस्क : मजबूत झालेला रुपया आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्याने भारतीय शेअर बाजाराने (Stock Market) गुरुवारी (दि.१७) तेजीचा चौकार मारला. सेन्सेक्स १,५०८ अंकांनी वाढून ७८,५५३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४१४ अंकांनी वाढून २३,८५१ वर स्थिरावला. बँकिंग, ऑईल अँड गॅस आणि टेलिकॉम शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी राहिली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही प्रत्येकी ०.५ टक्के वाढले.
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पुन्हा खरेदी सुरु केली आहे. तसेच अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार डीलच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे बाजारात तेजीचा माहौल तयार झाला असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीची आज घसरणीसह सुरुवात झाली होती. पण त्यानंतर दुपारनंतरच्या व्यवहारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. यामुळे सलग चार सत्रांत सेन्सेक्स- निफ्टी वधारुन बंद झाले.
विशेष म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि जागतिक आर्थिक मंदीबद्दल चिंता कायम असतानाही भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १७ एप्रिल रोजी ४.४९ लाख कोटींनी वाढून ४१९.४८ लाख कोटींवर पोहोचले. १६ एप्रिल रोजी बाजार भांडवल ४१५ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ४.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
सेन्सेक्सवर Eternal, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, रिलायन्स, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स २ ते ४ टक्के वाढले. तर टेक महिंद्राचा शेअर्स घसरला.
बँक निफ्टी २.२ टक्के वाढला. बँक निफ्टीवर आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी ३,९३६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. त्यांनी १५ एप्रिल रोजी ६,०६५.७८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. यामुळे बाजारात उत्साह वाढला आहे.
डॉलर निर्देशांक घसरला आहे. तसेच परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याने भारतीय रुपया सलग चौथ्या सत्रात मजबूत झाला. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १० पैशांनी वाढून ८५.५४ वर पोहोचला. बुधवारी रुपया १६ पैशांनी वधारला होता. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांतील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
आशियाई बाजारातही आज तेजी राहिली. जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक प्रत्येकी १ टक्के वाढले.