

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या जोरदार विक्रीनंतर आज बुधवारी (दि.२ एप्रिल) भारतीय शेअर बाजारात रिकव्हरी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वाढून ७६,४४० वर पोहोचला. तर निफ्टीने सुमारे १०० अंकांनी वाढून २३,२६० च्या अंकाला स्पर्श केला. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजीचा माहौल तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जाहीर होणाऱ्या नवीन शुल्क आकारण्याच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निफ्टी बँक, आयटी आणि रियल्टी हे निर्देशांक तेजीत खुले झाले आहेत.
ट्रम्प यांनी बुधवारी जसास तसे शुल्क आकारणी (reciprocal tariffs) करण्याची घोषणा केल्यानंतर तत्काळ ते लागू होईल, असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याचा व्यापारावर किती परिणाम होईल? आणि त्याच्या व्याप्तीबद्दल अनिश्चितता कायम आहे. यामुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्ध तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सेन्सेक्सवर मारुती, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले. तर नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.
आशियाई बाजारातही आज घसरण दिसून आली. जपानचा निक्केई ०.३ टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.५ टक्के घसरला आहे.