

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) अनिश्चितता कायम आहे. यामुळे आज शुक्रवारी (दि. ८) सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) ५५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,४८६ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ५१ अंकांनी घसरून २४,१४८ वर स्थिरावला. मुख्यतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली.
निफ्टी आयटी आज ०.७ टक्के वाढला. तर मीडिया, पीएसयू बँक, मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर, रियल्टी निर्देशांक १ ते २ टक्क्यांनी घसरले. निफ्टी रियल्टी निर्देशांकात सलग दुसऱ्या दिवशी घसरण कायम राहिली. निफ्टी रियल्टी जवळपास ३ टक्क्यांनी खाली आला. निफ्टी मीडिया निर्देशांकदेखील २ टक्क्याने घसरला. बीएसई मिडकॅप १.१ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक (BSE SmallCap) १.५ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, एसबीआय, टाटा स्टील, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपी, रिलायन्स हे शेअर्स १ ते २.६ टक्क्यांपर्यंत घसरले. तर एम अँड एमचा शेअर्स ३ टक्के वाढला. त्याचबरोबर टायटन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, सन फार्मा, पॉवर ग्रिड हे शेअसे १ ते २ टक्क्यांनी वाढले.
एनएसई निफ्टीवर ट्रेंट, कोल इंडिया, एशियन पेंट्स, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरून टॉप लूजर्स ठरले. तर एम अँड एम, टायटन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले.
अमेरिच्या फेडरल रिझर्व्हने गुरुवारी व्याजदरात २५ बेसिस पॉइंटने कपात केली. तरीही यामुळे भारतीय बाजाराला दिलासा मिळाला नाही. कारण कार्पोरेट कंपन्यांच्या कमकुवक कमाईचे पडसाद बाजारात दिसून येत आहे.