

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि.२८) घसरण दिसून आली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून ७७,३५० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २३,५४० जवळ व्यवहार करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित आयात कार आणि हलक्या ट्रकवर २५ टक्के शुल्क लागू करण्याच्या घोषणेच्या चिंतेने निफ्टी ऑटो निर्देशांक आजदेखील लाल रंगात रंगला. आयटी निर्देशांकामध्ये घसरण झाली आहे. फार्मा शेअर्समध्येही विक्रीचा दबाव राहिला आहे.
दरम्यान, निफ्टी ऑटो ०.८ टक्के घसरला आहे. निफ्टी ऑटोवर एम अँड एम, अशोक लेलँड, मारुती हे शेअर्स घसरले आहेत. तर मदरसनचा शेअर्स १ टक्के वाढला आहे. दरम्यान, बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्के वाढून व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ३ टक्के घसरला. त्याचबरोबर इन्फोसिस, पॉवरग्रिड, सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, कोटक बँक, आयटीसी, एशियन पेंट्स, एसबीआय हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर कायम असताना ट्रम्य यांच्या शुल्क लागू करण्याच्या चिंतेचे पडसाद बाजारात दिसून येत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) गुरुवारी एका दिवसात ११,१११ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. ही खरेदी सहा महिन्यांतील एका दिवसातील सर्वाधिक आहे.