सेन्सेक्स- निफ्टी २-२ टक्क्यांनी घसरून बंद, गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले

Stock Market Crash : घसरणीला कारणीभूत ४ घटक कोणते?
Stock Market Crash, Sensex, Nifty50
आज गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य पूर्वेतील इराण- इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) हाहाकार उडाला. सेन्सेक्स (Sensex) आजच्या ट्रेडिंग सत्रात तब्बल १,८०० अंकांनी कोसळून ८२,५०० च्या खाली आला. तर निफ्टी (Nifty50) ५०० अंकांनी घसरून २५,३०० च्या खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स १,७६९ अंकांच्या घसरणीसह ८२,४९७ वर बंद झाला. तर निफ्टी ५४६ अंकांनी घसरून २५,२५० वर स्थिरावला. निफ्टीची आजची २.१२ टक्क्यांची घसरण ही २ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे. सेन्सेक्सही २.१ टक्के घसरणीसह बंद झाला.

आज सर्व श्रेत्रात चौफेर विक्रीचा मारा दिसून आला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टी रियल्टी सर्वाधिक ४ टक्क्यांनी घसरला. ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले.

Summary

ठळक मुद्दे

  • सेन्सेक्स १,७६९ अंकांच्या घसरणीसह ८२,४९७ वर बंद.

  • निफ्टी ५४६ अंकांनी घसरून २५,२५० वर स्थिरावला.

  • निफ्टीची २.१२ टक्क्यांची घसरण ही २ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण.

  • सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद.

  • निफ्टी रियल्टी सर्वाधिक ४ टक्क्यांनी घसरला.

  • ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले.

  • बीएसई मिडकॅप २.२ टक्क्यांनी घसरला.

  • स्मॉलकॅप १.८ टक्के घसरणीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फटका

बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात एका दिवसात ९.७१ लाख कोटींची घट झाली. यामुळे बाजार भांडवल ४६५.१५ लाख कोटी रुपयांवर आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फटका बसला आहे.

Middle East tensions : मध्य पूर्वेतील तणावाचे बाजारात पडसाद

इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर १८० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर इस्रायलने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर घेण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धपरिस्थितीमुळे चिंता वाढली. येथे संघर्ष आणखी तीव्र झाल्यास इराणमधून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Sensex Today :  'हे' शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स लाल रंगात रंगले. मारुती, एलटी, एशियन पेंट्स हे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांनी, ॲक्सिस बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, कोटक बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी अधिक घसरले.

BSE Sensex
सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स लाल रंगात रंगले.(Image Source- BSE)

Nifty Oil & Gas ची काय झाली अवस्था?

निफ्टीवर बीपीसीएल, मारुती, एलटी, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स ४ ते ५ टक्क्यांनी घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी ऑटो आणि निफ्टी ऑईल आणि गॅसला मोठा फटका बसला. निफ्टी ऑटो सुमारे ३ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी ऑईल आणि गॅस २.७ टक्क्यांनी खाली आला. निफ्टी ऑईल आणि गॅसवरील पेट्रोनेट, एमजीएल यांचे शेअर्स घसरले. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निफ्टी ऑईल गडगडला आहे. निफ्टी रियल्टी ४.३ टक्क्यांनी घसरला. इतर निर्देशांकांतही २ ते २.५ टक्क्यांची घसरण दिसून आली.

NSE Nifty50
निफ्टीची आजची २.१२ टक्क्यांची घसरणी ही २ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे.(Image Source- NSE)

Israel Iran War : इराण- इस्रायल संघर्ष

इराण- इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिशारा दिला आहे. त्यात हिजबुल्ला विरुद्ध सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक मारले गेले आहेत. सीमेपलीकडून हल्ले सुरू केल्यानंतरची इस्रायलची ही पहिली जीवितहानी आहे. त्यानंतर इस्रायलने गुरुवारी मध्य बेरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यात ६ लोक ठार झाले आहेत.

Crude Oil prices : कच्च्या तेलाच्या दरात वाढ

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्याबाबतच्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ७५ डॉलरच्या वर गेलाय. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल ७२ डॉलरवर पोहोचले आहे. दोन्ही बेंचमार्क गेल्या तीन दिवसांत जवळपास ५ टक्क्यांनी वाढलेत. भारत हा तेल आयातदार देश असल्याने मध्य पूर्वेतील तणावाचा फटका भारताला बसणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परदेशी गुंतवणूदारांकडून विक्रीचा सपाटा

त्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) विक्रीचा सपाटा सुरुच आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी ८,२८२ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. गेल्या कही दिवसांपासून बाजारात परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहे. चीनने गेल्या आठवड्यात आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. यामुमुळे तेथील बाजाराला चालना मिळण्याची शक्यता आहे यामुळे परदेशी गुंतवणूकदार चीन बाजाराकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stock Market Crash, Sensex, Nifty50
इस्रायल- इराण संघर्षामुळे कच्चे तेल भडकले! भारतावर काय होणार परिणाम?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news