पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.१८) जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या घसरणीतून सावरत वधारुन बंद झाले. विशेष म्हणजे आज बाजारात तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स २१८ अंकांनी वाढून ८१,२२४ वर बंद झाला. तर निफ्टी १०४ अंकांनी वाढून २४,८५४ वर स्थिरावला. निफ्टी बँक, फायनान्सियल आणि मेटल शेअर्समधील खरेदीच्या जोरावर दोन्ही निर्देशांकांना रिकव्हरी करण्यासाठी मदत झाली.
सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीतून सावरत वधारुन बंद.
सेन्सेक्स २१८ अंकांनी वाढून ८१,२२४ वर बंद.
निफ्टी १०४ अंकांनी वाढून २४,८५४ वर स्थिरावला.
निफ्टी बँक आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्के वाढले.
आयटी निर्देशांक १.४ टक्क्यांनी घसरला.
बीएसई मिडकॅपमध्ये किरकोळ वाढ.
स्मॉलकॅप लाल रंगात बंद.
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत असतानाही परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. आजही बाजारात चढ-उतार राहिला.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी बँक आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्के वाढले. निफ्टी मेटलमध्ये (Nifty Metal) चार दिवसांच्या घसरणीनंतर आज तेजी दिसून आली. तर आयटी निर्देशांक १.४ टक्क्यांनी घसरला. एफएमसीजी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी खाली आला. बीएसई मिडकॅपमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. तर स्मॉलकॅप लाल रंगात बंद झाला.
सेन्सेक्स आज ८०,७४९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ८०,४०९ पर्यंत खाली आला. त्यानंतर त्याने ८१५ अंकांनी रिकव्हरी केली आणि तो ८१,२२४ वर बंद झाला. सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकेचा शेअर्स ५.५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, सन फार्मा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर इन्फोसिसचा शेअर्स ४.६ टक्क्यांनी घसरला. एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.
निफ्टी १०४ अंकांनी वाढून २४,८५४ वर बंद झाला. निफ्टीवर ॲक्सिस बँक, विप्रो, आयशर मोटर्स, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर इन्फोसिस, ब्रिटानिया, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.