सेन्सेक्स १,०७८ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांची ५ लाख कोटींची कमाई

Stock Market | शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रांत तेजी कायम
Stock Market
आज सलग सहाव्या सत्रांत सेन्सेक्स वाढून बंद झाला.(AI Image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातिक सकारात्मक संकेत, मजबूत झालेला रुपया आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने भारतीय शेअर बाजाराने (Stock Market) सोमवारी (दि.२४) तेजीचा 'षटकार' मारला. सलग सहाव्या सत्रांत सेन्सेक्स आणि निफ्टी वाढून बंद झाले. आजच्या सत्रात सेन्सेक्सने जवळपास १,२०० अंकांची वाढ नोंदवून ७८ हजारांचा टप्पा ओलांडला. ७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच बीएसई सेन्सेक्सने (Sensex) ७८ हजारांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर सेन्सेक्स १,०७८ अंकांच्या वाढीसह (१.४० टक्के वाढ) ७७,९८४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) ३०७ अंकांनी वाढून २३,६५८ वर स्थिरावला. निफ्टीने चालू वर्षातील संपूर्ण तोटा भरून काढण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

गुंतवणूकदारांनी कमावले ५.१९ लाख कोटी

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २४ मार्च रोजी ५.१९ लाख कोटींनी वाढून ४१८.४९ लाख कोटींवर पोहोचले. गेल्या शुक्रवारी २१ मार्च रोजी बाजार भांडवल ४१३.३० लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांना ५.१९ लाख कोटींचा फायदा झाला.

विशेष म्हणजे बँकिंग आणि आयटी शेअर्समधील वाढीमुळे बाजारातील तेजीला चालना मिळाली. सर्व बँकिंग आणि आयटी शेअर्सचे निफ्टी ५० च्या दिवसातील वाढीत निम्म्याहून अधिक योगदान राहिले.

आज सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. निफ्टी बँक, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक हे २ ते ३ टक्के वाढून आघाडीवर राहिले. निफ्टी आयटी, निफ्टी रियल्टी, निफ्टी एनर्जी, निफ्टी ऑटो निर्देशाकांनीही १ ते २ टक्के वाढ नोंदवली. तर बीएसई मिडकॅप १.३ टक्के आणि स्मॉलकॅप १.१ टक्के वाढून बंद झाला.

Sensex Today | कोणते शेअर्स सर्वाधिक तेजीत?

सेन्सेक्सवर एनटीपीसी, कोटक बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स हे शेअर्स २ ते ४.५ टक्क्यांपर्यंत वाढले. टायटन, इंडसइंड बँक, झोमॅटो हे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर

अनेक महिन्यांच्या सततच्या विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी आता खरेदीवर जोर दिला आहे. गेल्या चार सत्रांपैकी तीन सत्रांत परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. यामुळे बाजारातील भावना उंचावल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (२१ मार्च) परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) एका दिवसात तब्बल ७,४७० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. ही खरेदी चार महिन्यांच्या कालावधीत एका दिवसात केलेली सर्वात मोठी आहे. तर याच दिवशी देशांतर्गंत गुंतवणूदारांनी ३,२०२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. गेल्या काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी आक्रमकपणे विक्री केल्याने बाजारात मोठी घसरण झाली होती. पण आता परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

तसेच अमेरिकेतील ट्रेझरी उत्पन्नात घट झाल्याने भारतीय शेअर्संना आधार मिळाला आहे.

Stock Market
टर्म इन्शुरन्स नूतनीकरण का गरजेचे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news