

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी (दि. ७) कर्जदारांना मोठा दिलासा दिला. त्यांनी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. पतधोरण जाहीर करण्यापूर्वी सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर होते. पतधोरण जाहीर केल्यानंतर चढ-उतार राहिला. विशेषतः व्याजदराशी संबंधित क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद राहिला. ऑटो आणि रियल्टी शेअर्समध्ये ३ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. तर बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्स सुमारे १.५ टक्के घसरले. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ७७,८६० वर तर निफ्टी ३१ अंकांच्या घसरणीसह २३,५७० च्या सपाट पातळीवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, झोमॅटो, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर पॉवर ग्रिड, आयटीसी, एसबीआय, टीसीएस, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले आहेत.