पुढारी ऑनलाईन डेस्क
जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि. ३०) विक्रमी उच्चांकावर सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ३०० अंकांनी वाढून ८२,४०० पार झाला. तर निफ्टीने (Nifty) २५,२५८ चा नवा उच्चांक नोंदवला. बाजारातील तेजीत बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्स आघाडीवर आहेत.
सेन्सेक्सवर टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले आहेत. तर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, रिलायन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
निफ्टीवर हिरोमोटोकॉर्प, बीपीसीएल, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. टाटा मोटर्स, LTIMindtree, श्रीराम फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा माहौल आहे. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.७५ लाख कोटींची वाढ झाली. आज शुक्रवारी शेअर बाजार खुला झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रमी उच्चांक गाठला. अमेरिकेतील आकडेवारीने अर्थव्यवस्थेबाबतची चिंता कमी केली आहे. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. तर गुंतवणूकदारांचे आता देशांतर्गत तिमाही वाढीच्या आकडेवारीकडे लक्ष आहे.