

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, महिला या वर्गावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नसल्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दरम्यान, आज सादर झालेल्या अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ५ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७७,५०५ वर बंद झाला. तर निफ्टी २६ अंकांच्या घसरणीसह २३,४८२ वर स्थिरावला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प २०२५ संसदेत सादर केला. यादरम्यान शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले होते. पण त्यानंतर लगेच दुपारी २ च्या सुमारास ते सपाट पातळीवर आले.
अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना दुपारी १२ च्या सुमारास सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. तर निफ्टी २३,४५० च्या सपाट पातळीवर व्यवहार करत आहे.
अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्प मांडत असताना सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ दिसून आली. तर निफ्टी ८८ अंकांनी वाढून व्यवहार करत आहे.
निफ्टीवर इंडसइंड बँकेचा शेअर्स २.७ टक्के वाढला आहे. तर हिरो मोटोकॉर्पचा शेअर्स १.५ टक्के घसरला आहे. डॉ. रेड्डीज शेअर्सही १ टक्क्याने खाली आला आहे.
सेन्सेक्सवर आयटीसी हॉटेल्स, इंडसइंड बँक, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, सन फार्मा हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले आहेत. तर टायटन, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले आहेत.