अर्थवार्ता

अर्थवार्ता
अर्थवार्ता
अर्थवार्ताfile photo
Published on
Updated on
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्न)

बँकिंग क्षेत्रातील समभाग मोठ्या प्रमाणात

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 313.25 अंक व 963.87 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 24323.85 अंक व 7999.6 अंकांच्या पातळीवर बंद झाले. आजपर्यंतची ही सर्वोच्च विक्रमी पातळी बंदभाव आहे. गुरुवारच्या सत्रात प्रथमच सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने तब्बल 80392.64 अंकांच्या पातळीपर्यंत भरारी घेतली. 4 जुलै रोजी सेन्सेक्ने 80 हजारांच्या वर (म्हणजेच 80,049.67 अंकांवर) बंदभावसुद्धा दिला; परंतु शुक्रवारच्या सत्रात म्हणजेच 5 जुलैला गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यास (profit booking) प्राधान्य दिले. शुक्रवारच्या सत्रात एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाली; परंतु बँकिंग क्षेत्रातील समभाग मोठ्या प्रमाणात याच दिवशी कोसळल्याने निफ्टी व सेन्सेक्समधील वाढ निष्प्रभ होऊन दोन्ही निर्देशांक अखेरच्या दिवशी किरकोळ बदलांसह बंद झाले. सप्ताहादरम्यान सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये इन्फोसिस (5.9 टक्के), ओएनजीसी (5.1 टक्के), एचसीएलटेक (4.1), विप्रो (3.9 टक्के), कोल इंडिया (3.9 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला, तर सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये टायटन कंपनी (-4.0 टक्के), एचडीएफसी बँक (-2.1 टक्के), इंडसिंड बँक (-2.1 टक्के), श्रीराम फायनान्स (-1.6 टक्के), भारती एअरटेल (-1.0 टक्का) यांचा समावेश झाला.

भांडवल बाजारातील ब्रोकर्स (दलाल)साठी सेबीने मोठा बदल केला. 1 जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, यापुढे स्टॉक एक्स्चेंज आपल्या सर्व ब्रोकर्ससाठी समान शुल्क आकारणी करणार. एखादा गुंतवणूकदार हा ब्रोकर्स त्या माध्यमातून जेव्हा स्टॉक एक्स्चेंजमध्ये व्यवहार करतो तेव्हा ब्रोकरला स्टॉक एक्स्चेंजला त्या बदल्यात काही प्रमाणात शुल्क द्यावे लागते. ब्रोकरने अधिक व्यवहार केल्यास त्याला स्टॉक एक्स्चेंज शुल्कात सवलत मिळते असे. जेवढा मोठा ब्रोकर आणि जेवढे व्यवहार अधिक तेवढी स्टॉक एक्स्चेंजकडून मिळणारी सवलत मोठी; मात्र या कारणामुळे गुंतवणूकदाराच्या डी-मॅट खात्यात अनावश्यक समभाग खरेदी-विक्री करण्यासदेखील प्रवृत्त करण्याचा पायंडा काही प्रमाणात सुरू झाला; परंतु सेबीने आता सर्व ब्रोकर्सना समान शुल्क आकारणीचे आदेश स्टॉक एक्स्चेंजना दिले आहेत. या नवीन नियमामुळे डिस्काऊंट ब्रोकर्स म्हणजे प्रामुख्याने फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये व्यवहार अधिक असणार्‍या ब्रोकर्सना आपले शुल्क वाढवावे लागण्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. सेबीचा हा आदेश येताच एंजल वन, एसएमसी ग्लोबलसारखे ब्रोकर्स कंपन्यांचे समभाग 5 ते 10 टक्क्यांदरम्यान कोसळले.

जून महिन्यात जीएसटी महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वधारून 1 लाख 73 हजार कोटींवर पोहोचला. मागील 3 वर्षांतील ही सर्वात कमी वाढ आहेत. यापूर्वी मे महिन्यात 10 टक्क्यांची महसूल वाढ दर्शवली होती.

जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार उद्योग समूह केकेआरने केरळमधील बेबी मेमोरिअल हॉस्पिटल या आरोग्य सुविधा पुरवणार्‍या हॉस्पिटल्सच्या कंपनीमध्ये 70 टक्के हिस्सा खरेदी केला. सुमारे 1 हजार खाटांची या कंपनीकडे क्षमता आहे. कालिकत आणि कुन्नूर या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत. एकूण यासाठी केकेआरने 2500 कोटी रुपये मोजले असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी केकेआरने भारतातील मॅक्स हेल्थ केअर, जेबी फार्मा, ग्लँड फार्मा, हेल्थिअम, इनफिक्स या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या कंपन्यांमध्येदेखील गुंतवणूक केली आहे.

यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारात मागील वर्षीच्या तुलनेत 49 टक्क्यांची जबरदस्त वाढ. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशनच्या आकडेवारीनुसार यूपीआयद्वारे जूनमध्ये 13.9 अब्ज व्यवहार झाले. व्यवहारमूल्य मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्के वाढले. यूपीआयद्वारे भारतात एकूण 20.1 लाख कोटी किमतीचे व्यवहार झाले. दर दिवशीची सरासरी पाहता, दर दिवशी 66903 कोटींचे 463 दशलक्ष व्यवहार झाले.

जून महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारातील इक्विटी या सदरात 26565 कोटींची खरेदी केली. यापूर्वी मे महिन्यात 25586 कोटी व एप्रिल महिन्यात 8700 कोटींची विक्री करण्यात आली होती.

आरोग्य विमा सेवा पुरवणी निवा बुपा भांडवल बाजारात उतरणार. आयपीओसाठी बाजारनियामक सेबीकडे अर्ज. एकूण 3 हजार कोटींचा आयपीओ असणार. यामध्ये इक्विटी स्वरूपातील 800 कोटींचे समभाग असतील. 2200 कोटींच्या प्रवर्तक व सध्याचे गुंतवणूकदार यांचा ओएफएस (ओपन फॉर सेल) असेल. बुपा ही सिंगापूरची प्रवर्तक कंपनी आहे. या ओएफएसमध्ये बुपा कंपनी आपले 320 कोटींचे समभाग विकेल. तसेच आणखी एक गुंतवणूकदार फेटल टोन आपले 1880 कोटींचे समभाग विकेल.

जून महिन्यात रशियाकडून आयात केल्या जाणार्‍या खनिज तेलाने मागील 13 महिन्यांचा उच्चांक गाठला. एकूण 2.13 दशलक्ष बॅरलची आयात रशियाकडून करण्यात आली. मागील महिन्याच्या तुलनेत आयातीत 7.2 टक्क्यांची वाढ झाली. रशियाकडून खनिज तेल घेतानाच अमेरिकेकडूनही खनिज तेल आयात करण्यात वाढ झाली. जूनमध्ये अमेरिकेकडील खनिज तेल आयात 75 टक्के वधारून 3.71 लाख बॅरल झाली.

आदी गोदरेज व नादीर गोदरेज हे बंधू आपला गोदरेज इंडस्ट्रीजमधील हिस्सा 12.65 टक्क्यांनी वाढवणार. रिशद नौरोजी हे गोदरेज कुटुंबीयांचे आणखी एक बंधू यांच्याकडून हिस्सा विकत घेतला जाणार. यासाठी आदी व नादीर गोदरेज कुटुंबीय 3653 कोटी रुपये मोजणार आहेत. गोदरेज कुटुंबीयांचा गोदरेज इंडस्ट्रीजमधील हिस्सा 43.83 टक्क्यांवर पोहोचेल.

देशातील डी-मॅट खात्यांची संख्या 16 कोटींवर पोहोचली. जूनमध्ये केवळ एका महिन्यात 42 लाखांपेक्षा अधिक डी-मॅट खाती उघडण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत डी-मॅट संख्येमध्ये 34.66 टक्क्यांची भर पडली आहे. 40 लाखांपेक्षा अधिक डी-मॅट खाती एकाच महिन्यात उघडली जाण्याची ही चौथी वेळ आहे.

हिंडेन्बर्ग संस्थेला अदानी प्रकरणात सेबीची नोटीस. अदानी समूहाच्या संदर्भात प्रतिकूल अहवाल प्रदर्शित करून समभागांच्या किमतीवर शॉर्ट सेलिंगद्वारे नफा कमावल्याचा हिंडेन्सबर्गवर आरोप आहे. यासंदर्भात ‘के इंडिया अ‍ॅपॉर्च्युनिटी फंड’ नावाच्या फंडात ‘हिंडेन्बर्ग’ने व्यापारी खाते उघडले आणि पडणार्‍या समभाग किमतीतून 183.24 कोटींचा नफा कमावला, असा आरोप करण्यात येत आहे; परंतु यातील ‘के’ हे अद्याक्षर भारतातील एका नामांकित बँकरचे असल्याचा पलटवार हिंडेन्बर्गने केला. शॉर्ट सेलिंगसाठी ज्याने या फंडाची निर्मिती केली, त्यामध्ये एका भारतीय बँकेचा समावेश असल्याचा आरोप हिंडेन्बर्गने केला. अद्याप बाजारनियामक ‘सेबी’ या प्रकरणी चौकशी करत आहे.

28 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.713 अब्ज डॉलर्सनी घटून 651.997 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. यापूर्वी 7 जून रोजी गंगाजळीने 655.817 अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news