pudhari arthabhan
निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद करताना...pudhari photo

निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद करताना...

निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद करताना...
Published on
विनिता शाह

निवृत्तीनंतरच्या चांगल्या आयुष्यासाठी सुयोग्य आर्थिक नियोजन गरजेचे आहे. तुम्ही कितीही पैसे कमावले किंवा बचत केली, तरीही योग्य सेवानिवृत्ती योजना बनवली नसेल, तर वृद्धापकाळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

निवृत्तीनंतर तुमचे आयुष्य कसे असेल, हे साधारणतः पन्नाशी-साठीपूर्वी म्हणजेच तरुणपणापासून केलेल्या आर्थिक नियोजनावर अवलंबून असते. तरुणपणामध्ये बचतीकडे, गुंतवणुकीकडे लक्ष दिले नाही आणि कर्जाचा भार कमी केला नाही, तर वृद्धापकाळात आर्थिक अडचणी उद्भवू शकतात. तसेच गुंतवणूक किंवा बचत केलेली असेल आणि ती दूरदर्शी विचाराने केलेली नसेल, तरीही काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

आजच्या काळात लोक त्यांच्या जीवनशैलीबद्दल खूप जागरूक झाले आहेत. उपचाराच्या सुविधाही पूर्वीपेक्षा खूप चांगल्या झाल्या आहेत. अशा स्थितीत भारतातील स्त्री-पुरुषांचे वय सुमारे 70 वर्षे असले, तरी 100 वर्षांहून अधिक जगणार्‍या लोकांची संख्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे. अशा स्थितीत तुम्ही वयाच्या 55 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त होत असाल, तर पुढील 35 ते 40 वर्षांचा खर्च लक्षात घेऊन वयाच्या 20 ते 25 या वयोगटापासूनच निवृत्तीचे नियोजन करणे आवश्यक ठरते.

आज बहुतांश जण यासाठी म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारख्या पर्यायांची निवड करत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे; पण यामुळे निश्चिंत राहता येईल का? याचे उत्तर नाही, असे आहे. कारण, कोणत्याही मार्केटमध्ये मोठ्या चढ-उतारांचा किंवा ‘ब्लॅक स्वान’ इव्हेंटचा धोका नेहमीच असतो. त्या अचानक येतात. कोरोना महामारी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यांचा आर्थिक बाजारावर मोठा परिणाम होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हवामानदेखील भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. अशा स्थितीत निवृत्तीचे नियोजन करताना या गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात. याशिवाय सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महागाई. ज्या दराने वस्तूंच्या किमती वार्षिक आधारावर वाढतात त्याला ढोबळमानाने महागाईचा दर किंवा चलनवाढीचा दर म्हटले जाते.

आर्थिक धोरणांनुसार हा दर कमी-अधिक असू शकतो. भारताबाबत बोलायचे झाले, तर आज तो 4 ते 5 टक्क्यांच्या आसपास आहे; पण 1974 मध्ये तो 28 टक्क्यांच्या पुढे गेला होता. असे झाल्यास तुमची सर्व आर्थिक गणिते कोलमडू शकतात. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात तुम्ही दैनंदिन वस्तू 1,000 रुपयांना विकत घेतल्या; परंतु या महिन्यात महागाई वाढल्याने त्या वस्तूंचे भाव 1100 रुपयांपर्यंत वाढले. आता तुम्ही 100 रुपये जास्त द्याल किंवा एखादी वस्तू कमी कराल. महागाईचा दीर्घकाळात तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

यामध्ये बहुपर्यायी आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. म्हणजेच मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, सोने, जमीन, सरकारी योजना या सर्वांमध्ये विभागणी करून पैसे गुंतवल्यास सुरक्षिततेची हमी राहते.

pudhari arthabhan
सातारा : पर्यटनवाढीसाठी आर्थिक तरतूद करू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news