

श्रीकांत देवळे
पगार वाढतो, उत्पन्न वाढते; पण महिनाअखेरीस खात्यात शिल्लक फारशी राहत नाही. दुसरीकडे आपल्यापेक्षा कमी उत्पन्न असलेली व्यक्ती नियमित बचत करते, गुंतवणूक वाढवते आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित दिसते. हा अनुभव बहुतेकांनी घेतलेला असतो. वस्तुतः हा फरक केवळ उत्पन्नातील नसतो. पैशांशी असलेले वर्तन, खर्चाच्या सवयी, जोखीम घेण्याची पद्धत आणि संयम यांचा त्यात मोठा वाटा असतो.
१. आर्थिक यशासाठी हुशारीपेक्षा शिस्त
शेअर बाजाराचे बारकावे समजणारी किंवा आर्थिक गणितात तरबेज व्यक्तीच मोठी संपत्ती निर्माण करेल असे नाही. जास्त उत्पन्न असूनही अनावश्यक कर्ज, अवाजवी खर्च किंवा बाजार पडताच घाबरून गुंतवणूक विकण्याची सवय असेल, तर संपत्ती निर्माण होणे कठीण होते. याउलट नियमित बचत, नियंत्रित खर्च आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची शिस्त असलेली व्यक्ती कालांतराने मोठा निधी उभारू शकते.
२. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे
महागडी कार, ब्रँडेड वस्तू किंवा परदेशी सहली आर्थिक सुबत्तेचे निश्चित मोजमाप नाहीत. ५० लाखांची कार दिसते; पण ती खरेदी करणार्या व्यक्तीवर किती कर्ज आहे किंवा तिच्याकडे किती बचत आहे, हे दिसत नाही. प्रत्यक्ष संपत्ती म्हणजे भविष्यासाठी शिल्लक ठेवलेली बचत आणि मालमत्ता. त्यामुळे दुसर्यांचे जीवनमान पाहून आपल्या आर्थिक क्षमतेबाहेर खर्च करण्याची सवय दीर्घकालीन संपत्तीला मारक ठरू शकते.
३. पैशाला वाढण्यासाठी वेळ द्या
चक्रवाढीची खरी ताकद वेळेत दडलेली असते. गुंतवणुकीवर मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला की त्यावरही परतावा मिळू लागतो. ही प्रक्रिया जितकी अधिक काळ सुरू राहते, तितका परिणाम मोठा होऊ शकतो. वारंवार गुंतवणूक बदलणे किंवा दर काही महिन्यांनी अधिक परताव्याच्या पर्यायामागे धावणे या प्रक्रियेत अडथळा आणू शकते.
४. संकटासाठी स्वतंत्र पैसा ठेवा
आर्थिक नियोजन करताना सर्व काही ठरल्याप्रमाणे होईल, असे गृहीत धरणे धोकादायक आहे. नोकरी जाणे, व्यवसायातील मंदी किंवा अचानक मोठा खर्च अशा परिस्थिती येऊ शकतात. त्यामुळे ६ ते ९ महिन्यांच्या खर्चाएवढा आपत्कालीन निधी उपलब्ध ठेवण्याचा विचार करता येतो. त्यामुळे अडचणीच्या वेळी दीर्घकालीन गुंतवणूक तोडण्याची वेळ टाळता येऊ शकते.
५. पैशाचे अंतिम मूल्य म्हणजे स्वातंत्र्य
पैशाचा उपयोग केवळ वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नसतो. पुरेशी बचत आणि गुंतवणूक असल्यास करिअरमधील बदल, काही काळ कामातून विश्रांती किंवा कुटुंबासाठी वेळ देण्यास आर्थिक आधार मिळू शकतो.
आर्थिक प्रगती मोजताना ‘मी किती कमावतो?’ यापेक्षा ‘कमाईतील किती पैसा टिकवतो आणि त्याला वाढण्यासाठी किती वेळ देतो?’ हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. उत्पन्न वाढवणे महत्त्वाचे आहेच; पण वाढत्या उत्पन्नाबरोबर खर्च वाढत राहिला, तर संपत्ती निर्मितीचा वेग वाढत नाही. आर्थिक स्वातंत्र्याचा पाया अखेरीस मोठ्या पगारापेक्षा बचतीची सवय, गुंतवणुकीतील सातत्य आणि संयम यावर उभा राहतो.