

जयदीप नार्वेकर
आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक नवे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे अनेकांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपल्या भविष्यनिधीचा म्हणजेच पीएफचा पैसा काढून तो शेअर बाजाराशी जोडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावा की नाही. नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) यावर महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली असून, नोकरदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पीएफचा पैसा काढून तो म्युच्युअल फंडात वळवणे योग्य आहे का आणि वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेसाठी नेमके काय उत्तम ठरेल, याचा घेतलेला हा आढावा.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचार्यांना सक्त ताकीद दिली आहे की, आपल्या निवृत्तीसाठी साचवलेला निधी काढून तो म्युच्युअल फंडात हस्तांतरित करू नये. समजूतदार नागरिकांसाठी भविष्य निर्वाह निधी हाच सर्वात मोठा आधार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. बर्याचदा तरुण वर्ग किंवा गुंतवणूकदार अधिक परताव्याच्या आशेने सुरक्षित सरकारी योजनांमधील पैशाला बाजाराच्या हवाली करतात, जे दीर्घकाळात नुकसानकारक ठरू शकते. पीएफ आणि म्युच्युअल फंड या दोन्ही वित्तीय पर्यायांचे उद्देश पूर्णपणे वेगळे आहेत, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
भविष्य निर्वाह निधी ही एक कायदेशीर सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश कर्मचार्याच्या निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्थिर करणे हा असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची बाजारातील जोखीम नसते आणि सरकारद्वारे निश्चित केलेला परतावा मिळतो, जो सध्या आठ पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे. याउलट, म्युच्युअल फंड हे एक स्वेच्छिक आणि बाजारपेठेच्या चढ-उतारांवर आधारित गुंतवणुकीचे साधन आहे, ज्याचा वापर मुख्यत्वे दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी केला जातो. म्युच्युअल फंडात उच्च परताव्याची शक्यता जशी असते, तशीच मुद्दल बुडण्याची किंवा बाजार कोसळल्यास नुकसान होण्याची जोखीमही असते.
भविष्य निर्वाह निधी हा केवळ बचतीचा मार्ग नाही, तर तो कर्मचार्यांना तीन स्तरांवर सुरक्षा कवच देतो, जे कोणत्याही म्युच्युअल फंडात उपलब्ध होत नाही. यामध्ये पहिली महत्त्वाची बाब म्हणजे मालकाचे अंशदान असते. म्युच्युअल फंडात केवळ गुंतवणूकदार स्वतःचे पैसे गुंतवतो, तर भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचारी आणि कंपनी असे दोघेही बारा-बारा टक्के योगदान देतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पेन्शनचा लाभ आहे. निवृत्तीनंतर पात्र कर्मचार्यांना कर्मचारी पेन्शन योजनेच्या अंतर्गत दरमहा ठराविक पेन्शन मिळते. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे मोफत विमा आहे. कर्मचारी जमा लिंक विमा योजनेच्या अंतर्गत सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सात लाखांपर्यंतचे जीवन विमा कवच पूर्णपणे विनामूल्य मिळते.
या दोन्ही वित्तीय पर्यायांचा विचार केला, तर हे स्पष्ट होते की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे चुकीचे नाही; परंतु त्याला भविष्य निर्वाह निधीचा पर्याय मानणे अत्यंत चुकीचे ठरेल. भविष्य निर्वाह निधी हा आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा पाया असला पाहिजे, ज्यामुळे बुद्धापकाळात निश्चित उत्पन्न आणि कुटुंबाला संरक्षण मिळते. जर तुमच्याकडे नियमित बचतीनंतर अतिरिक्त पैसा उरला असेल आणि तुम्ही बाजाराची जोखीम पत्करायला तयार असाल, तर तुम्ही स्वतंत्रपणे म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करू शकता. परंतु, भविष्य निर्वाह निधीचा सुरक्षित आणि हक्काचा पैसा जोखिमयुक्त बाजारात ओतणे अजिबात शहाणपणाचे ठरत नाही. निवृत्तीच्या काळात खर्या अर्थाने पाठबळ देणारी योजना ही सुरक्षितता आणि निश्चिततेवर आधारलेलीच असली पाहिजे.
कोणता पर्याय चांगला?
नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी : EPF हा निवृत्तीसाठी आवश्यक आणि सुरक्षित पर्याय आहे.
जास्त परतावा हवा असल्यास : दीर्घकालीन कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो, पण त्यात बाजाराची जोखीम असते.
संतुलित दृष्टिकोन : अनेक आर्थिक सल्लागार EPF आणि म्युच्युअल फंड दोन्हींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.
EPF सुरक्षिततेसाठी पर्याय तर म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठीचा पर्याय आहे.