

आशिष जोशी
जर तुम्हाला शेअर बाजारातील चढ-उतारांची भीती वाटत असेल आणि कोणताही धोका न पत्करता सुरक्षितरीत्या आपले पैसे वाढवायचे असतील, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा पर्याय केवळ सुरक्षितच नाही, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अतिशय आकर्षक परतावा देणारा आहे.
पीपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये आणि कमाल एक लाख पन्नास हजार रुपये गुंतवता येतात. ही गुंतवणूक तुम्ही एकदाच करू शकता किंवा महिन्याने हप्त्यानेही जमा करू शकता. जर एखाद्या वर्षी तुम्ही गुंतवणूक केली नाही, तर तुमचे खाते इनअॅटिव्ह होऊ शकते. अशा वेळी पुन्हा खाते सक्रिय करण्यासाठी प्रत्येक न केलेल्या वर्षासाठी पाचशे रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास रुपये दंड भरावा लागतो. एक व्यक्ती केवळ एकच पीपीएफ खाते उघडू शकतो, मग ते पोस्ट ऑफिसमध्ये असो वा बँकेत. जर चुकून दोन खाती उघडली गेली, तर त्यात दुरुस्ती आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीने दरवर्षी फक्तएक लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवले आणि हे नियमितपणे तीस वर्षे सुरू ठेवले, तर ती व्यक्ती एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फंड सहज तयार करू शकते.
समजा, तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. सध्या यावर वार्षिक व्याजदर 7.1% आहे. हे व्याज दरवर्षी चक्रवाढ स्वरूपात दिले जाते, म्हणजेच फक्ततुमच्या मूळ गुंतवणुकीवरच नाही, तर त्यावर मिळणार्या व्याजावरही पुढील वर्षी व्याज दिले जाते. यामुळेच दीर्घकालीन कालावधीत याचा परिणाम खूप मोठा दिसून येतो.
तुम्ही 30 वर्षे दरवर्षी एक लाख रुपये गुंतवले, तर एकूण गुंतवणूक होईल 30 लाख रुपये. पण, चक्रवाढ व्याजामुळे तीस वर्षांनंतर तुमच्या खात्यात सुमारे एक कोटी तीन लाख रुपये (1,03,00,607) जमा होतात. म्हणजेच फक्ततीस लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सुमारे 73 लाख रुपयांचा नफा मिळतो, तेही पूर्णपणे जोखीमरहित मार्गाने!
पीपीएफ योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चक्रवाढ व्याज (कंपाऊंडिंग इफेक्ट). चक्रवाढ म्हणजे व्याजावर व्याज मिळणे. पहिल्या वर्षी मिळालेल्या व्याजावर दुसर्या वर्षी पुन्हा व्याज दिले जाते, आणि हे चक्र प्रत्येक वर्षी सुरूच राहते.
सुरुवातीच्या दहा वर्षांमध्ये पैसा हळूहळू वाढतो; पण 15 व्या वर्षांनंतर त्यामध्ये वेगाने वाढ होते. पंचविसाव्या वर्षांनंतर तर पैसे बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वाढू लागतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला दीर्घकालीन संयम आहे, त्यांच्यासाठी पीपीएफ एक अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय ठरतो.
पूर्णतः सुरक्षित, चांगला परतावा देणारी आणि त्याचबरोबर कर बचतीची संधीही देणारी पीपीएफ योजना सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
पीपीएफ योजना ईईई श्रेेणीत येते. याचा अर्थ असा की, गुंतवणुकीच्या वेळी करमुक्ती, दरवर्षी मिळणार्या व्याजावर कर नाही आणि योजना परिपक्व झाल्यावर मिळणार्या संपूर्ण रकमेवरही कोणताही कर आकारला जात नाही.
पीपीएफ योजनेची परिपक्वता (मॅच्युरिटी) पंधरा वर्षांनंतर होते; पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला ते खाते बंद करावेच लागेल. तुम्ही हे खाते पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता! गुंतवणुकीसह किंवा गुंतवणुकीविना.
जर तुम्ही पुढेही गुंतवणूक करत राहिलात, तर तुम्हाला जुन्या बॅलेन्सवर आणि नव्या गुंतवणुकीवर दोन्हीवर व्याज मिळते. अशा प्रकारे तुम्ही आपल्या निवृत्तीच्या योजना किंवा मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी भरीव फंड तयार करू शकता.
पीपीएफ योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे; पण ती पूर्णपणे ‘लॉक’ नसते. सातव्या वर्षांपासून त्यातून अंशतः पैसे काढता येतात.
पैसे काढण्याची मर्यादा अशी आहे की, चौथ्या वषच्या अखेरीस असलेला बॅलेन्स किंवा मागील वर्षाचा बॅलेन्स, यापैकी जे कमी असेल, त्याच्या पन्नास टक्क्यांपर्यंतची रक्कम काढता येते. हे पैसे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय गरजा किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकता आणि यावर कोणताही कर लागणार नाही.
आजच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीत जिथे देश-विदेशातील अर्थव्यवस्था सतत चढ-उतार अनुभवत आहेत, शेअर बाजार अस्थिर आहे आणि बँकांच्या मुदत ठेवींवर व्याज दर कमी होत आहेत, अशा वेळी पीपीएफसारखी सरकारी हमी असलेली योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक मोठा दिलासा ठरते.