विश्वास सरदेशमुख
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्यापुढे 'उदरनिर्वाह कसा करायचा?' असा प्रश्न उपस्थित होत असतो. निवृत्त झाल्यानंतर घरात दरमहा येणारे वेतन थांबते. अशा वेळी आपल्या सर्व गरजा भागवण्याएवढे उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा विचार निवृत्त होण्यापूर्वीच करणे गरजेचे असते.
निवृत्तीनंतर आपल्या सर्व गरजा भागवता येतील एवढे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन आपण नोकरी करत असताना करता येऊ शकते. नोकरी करत असताना आपल्या उत्पन्नातील थोडा वाटा दीर्घकालीन गुंंतवणूक योजनांमध्ये गुंतवला, तर आपल्याला निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक उत्पन्न मिळणे चालू होते. यासाठी आपल्या निवृत्तीनंतरच्या गरजा काय असतील, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. एकदा का या गरजा जाणून घेतल्या की त्यानुसार पैशाचे नियोजन करणे सोपे जाते. नोकरीनंतर दरमहा ठरावीक उत्पन्न हातात येण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते.
याशिवाय अनेक बँकांनी आणि गुंतवणूक कंपन्यांनी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न देणार्या (पेन्शन प्लॅन) योजना चालू केल्या आहेत. या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक मोठी फायदेशीर ठरते, असा अनेकांचा अनुभव आहे. नोकरी करत असताना पैसे शिल्लक ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दैनंदिन गरजांना पैसा नेहमीच अपुरा पडत असतो. मात्र, बचतीची सवय लावून घेतल्याखेरीज आपला पैसा शिल्लक राहत नाही. मुलांची शिक्षणं, लग्नं पार पाडून आपल्याला निवृत्तीनंतर दरमहा किती उत्पन्न लागणार आहे, याचा अंदाज घेऊन पैशाच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. हे नियोजन करताना त्यावेळच्या महागाईचा विचार करणे आवश्यक असते. याचबरोबर विमा उतरवणे, राष्ट्रीय बचतपत्रे यामध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते.
1) आपल्याकडे असलेल्या मालमत्तेची यादी तयार करा. ही यादी तयार करताना घरातील सोने-नाणे, विमा पॉलिसी, जमीनजुमला, म्युच्युअल फंडासारखी गुंतवणूक या सर्वांचा समावेश करा. याबरोबरच आपल्याला देणे असलेल्या रकमेचीही यादी तयार करा.
2) घर, चारचाकी यासाठी घेतलेली कर्जे लवकरात लवकर फेडून टाका. त्यासाठी हप्त्यापोटी थोडी जादा रक्कम भरली तरी हरकत नाही. बँकांच्या व्याजाचा हिशोब लक्षात घेतला तर आपण बँकेला व्याजापोटी अव्वाच्या सव्वा रक्कम भरत असतो, हे लक्षात घ्या. तुम्ही नोकरी करत असेपर्यंत कर्जाचा परतावा संपला पाहिजे, याकडे लक्ष द्या.
3) तुमची अनेक बँकांत खाती असतील तर, कोणत्या खात्यांमध्ये कमी व्यवहार आहेत हे पाहून ती खाती सरळ बंद करून टाका. जी बँक खाती चालू ठेवली आहेत त्या बँक खात्यांना आपल्या वारसदाराचे नाव बँकेकडे नोंदवून ठेवा. आपली कोणकोणत्या बँकेत खाती आहेत, आणि या खात्यांमध्ये किती रक्कम आहे, याची माहिती आपल्या कुटुंबीयांना न विसरता सांगा.
4) आपण ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती पत्नी, मुलांना द्या. आपले मृत्युपत्र वेळीच तयार करून ठेवा. मृत्युपत्र तयार करणे ही अत्यंत व्यावहारिक गोष्ट आहे. भावनेच्या चष्म्यातून याकडे पाहू नका. तुमचा अकस्मात मृत्यू झाला, तर तुमच्या मालमत्तेवरून वारसदारांमध्ये भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे वारस कोण कोण राहतील?, कोणाच्या वाटणीला काय येईल?, हे सर्व मृत्युपत्राद्वारे लिहून ठेवावे. मृत्युपत्र तयार केल्यावर त्याची अधिकृत नोंदणी करावी.
5) तुमच्याकडे जमीनजुमला, घर अशी स्थावर संपत्ती असेल तर ती पूर्णपणे आपल्याच नावाची आहे याची खात्री करून घ्या. यासाठी सरकार दरबारी जे काही व्यवहार पूर्ण करावे लागतात ते करून टाका.
6) तुम्हाला उशिरा अपत्य झाले असेल, आणि तुम्ही निवृत्त होईपर्यंत तुमचा मुलगा किंवा मुलगी सज्ञान होणार नसेल, तर पैशाची तरतूद करून ठेवा. या पैशांमधून तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे शिक्षण व अन्य जबाबदार्या पार पाडल्या जाऊ शकतात.
7) पत्नीला अथवा मुलांना आपण केलेल्या सर्व गुंतवणुकीविषयी संपूर्ण माहिती द्या. या गुंतवणुकीची कागदपत्रे कोठे ठेवलेली आहेत, गुंतवणुकीची मुदत केव्हा संपणार आहे, आदी आवश्यक माहिती आपल्या कुटुंबीयांना असणे आवश्यक आहे. ही माहिती आपल्या कुटुंबीयांना नसेल, तर तुमचे आकस्मित निधन झाल्यास तुम्ही गुंतवलेले पैसे कुुटुंबीयांना मिळू शकत नाहीत. त्याचबरोबर बँक खात्यासह जेथे जेथे पैसा गुंतवलेला आहे अशा सर्व ठिकाणी आपल्या वारसदाराचा उल्लेख करा. विमा पॉलिसी, बँकांच्या मुदतठेवी, पीपीएफ, म्युच्युअल फंड, कंपन्यांमधील मुदतठेवी अशा सर्व ठिकाणी कागदपत्रांमध्ये आपल्या वारसदारांचा उल्लेख करणे विसरू नका. वारसदाराला म्हणजे पत्नी, मुलांपैकी कोणालाही त्यांना कोणत्या संपत्तीबाबत वारसदार (नॉमिनी) म्हणून नेमले आहे, हे सांगून ठेवा. गुंतवणुकीच्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती कुटुंबीयांकडे देऊन ठेवा.
8) ज्येष्ठ नागरिक वयोगटात गेल्यानंतर औषधोपचारासाठी पैसा लागणार हे गृहीत धरून पैशाची तरतूद करा. कोणावरही अवलंबून रहायचे नसेल, तर आपल्या भविष्यकालीन गरजांसाठी आपणच तरतूद करायला हवी.