

राजू पाटील
इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) जुलै २०२२ मध्ये गुजरातमधील गिफ्टसिटी येथे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू झाले. परंतु, या एक्सचेंजमध्ये गोल्ड ट्रेडिंगच्या प्रमाणात अजिबात सातत्य दिसून आलेले नाही. वित्तीय वर्ष २०२२-२३ मध्ये या एक्सचेंजवर ४११ किलो सोन्याचे व्यवहार झाले. २०२४-२५ मध्ये व्यवहाराचे प्रमाण तब्बल ९२ टनांपर्यंत पोहोचले; मात्र २०२५-२६ मध्ये ते पुन्हा घसरून ६०० किलोवर आले. आतापर्यंत IIBX मधील व्यवहार हे केवळ ज्वेलर्सच्या व्यापारी आयातीवर आधारित आहेत.
भारतातील संस्थात्मक गुंतवणूक फंडस् सोन्याला फायनान्शियल ॲसेट म्हणून ग्राह्य धरत असले, तरी त्यांचा सहभाग अद्याप दिसून आलेला नाही. हा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात सेबी, आरबीआय, केंद्रीय वित्त मंत्रालयाने यांच्या पातळीवर अनेक बैठका घेतल्या. सोने आयातीचा वेग कमी होण्यासाठी गिफ्ट सिटीच्या नियामकांनी फिजिकल कमोडिटी फंड सुरू करण्यास मान्यता दिली आणि त्याची मुहूर्तमेढ जुलैत झाली. या फंडाच्या माध्यमातून गोल्ड ट्रेडिंग इकोसिस्टीमला गती देण्यासाठी केंद्र सरकारने दृढ निश्चय केला आहे. आयएफएससीएने जानेवारी २०२६ पासून कमोडिटी ट्रेडिंगला फायनान्शियल प्रॉडक्ट म्हणून मान्यता दिली आहे. फिजिकल कमोडिटी फंडामुळे भारत आगामी चार-पाच वर्षांत गोल्ड ट्रेडिंगचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.
सध्या सोने जानेवारीतील त्याच्या उच्चांकी पातळीपासून सुमारे २८ टक्के खाली आलेले आहे. सोने खरेदीसाठी ही अतिशय योग्य संधी असल्याचे मत पोर्टफोलिओ व्यवस्थापकांनी व्यक्त केले आहे. सोन्याने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट परतावा दिलेला आहे. गेल्या १० वर्षांत त्याने १३.७ टक्के चक्रवाढ परतावा (CAGR), गेल्या ५ वर्षांत २०.४ टक्के आणि गेल्या वर्षभरात (३० जून २०२६ पर्यंत) सुमारे २० टक्के परतावा दिला आहे. सोने २०२२ मध्ये ठामपणे उभे राहिले. जेव्हा बॉण्डस् आणि इक्विटीज एकाच वेळी घसरले आणि गुंतवणुकीच्या पारंपरिक ६०/४० फ्रेमवर्कला आव्हान मिळाले, तेव्हा सोने हे खऱ्या अर्थाने लवचिक आणि भक्कम पोर्टफोलिओचे तिसरे आधारस्तंभ ठरले. त्यामुळे गेल्या चार वर्षांत सोन्यातील गुंतवणूक प्रचंड वाढली. परंतु, सोने आयातही वाढली. या आयातीचा वेग मंदावण्यासाठी फिजिकल कमोडिटी फंडचा शुभारंभ सरकारतर्फे करण्यात आलेला आहे.
अर्थ भारत फिनमेट हा गिफ्ट सिटीमधील पहिला फिजिकल कमोडिटी फंड तसेच गोल्ड फंड ठरला आहे. मुदतमुक्त (ओपन-एंडेड) स्वरुपातील या फंडातील किमान ९५ टक्के ॲसेटस् लंडन बुलियन असोसिएशन प्रमाणित स्टँडर्ड गोल्ड बार्समध्ये (सोन्याच्या विटा) गुंतवणार आहे आणि या सोन्याची गिफ्ट सिटीतील इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजवर (आयआयबीएक्स) खरेदी-विक्री करता येईल. आयआयबीएक्स हा एनएसई, एनएसडीएल, सीडीएसएल, एमसीएक्स आणि बीएसईचा संयुक्त उपक्रम आहे.
गिफ्ट सिटीतील फिजिकल कमोडिटी फंडात दर आठवड्याला सबस्क्रिप्शन आणि रिडेम्प्शनची सुविधा असल्यामुळे गुंतवणूकदारांना लिक्विडिटीची सुविधा मिळालेली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे सोन्याचे युनिटस् रिडीम करताना सर्टिफाईड फिजिकल गोल्ड बार्स किंवा त्याच्या समतुल्य कॅश घेण्याचा पर्याय आहे. त्यामुळे फिजिकल गोल्ड फंडस् केवळ वित्तीय पर्यायच नाही, तर भारतात सोन्यासाठी जागतिक इकोसिस्टीम उभारण्यासाठी केंद्र सरकारचा विशेष प्रयत्न आहे.
विदेशी चलन वाचणार
भारताने गेल्यावर्षी सोन्याच्या आयातीवर अंदाजे ६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलन खर्च केले. हा खर्च त्याच्या मागील वर्षाच्या (२०२४-२५) तुलनेत २४ टक्क्यांपेक्षा जास्त होता. परंतु, आता फिजिकल कमोडिटी फंडामुळे अल्पकालीन आयात व्यवहारांऐवजी दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणुकीची संस्कृती रुजून बहुमूल्य विदेशी चलन वाचणार आहे.