

पुढारी ऑनलाईन डेस्क : होळी सणाच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजार (Stock Market) शुक्रवारी १४ मार्च रोजी बंद राहणार आहे. तसेच त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्याने शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहील. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बीएसईने (BSE) जारी केलेल्या सुट्टीच्या वेळापत्रकात उद्या शुक्रवारी बाजारात खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार असल्याचे नमूद केले आहे. इक्विटीज, डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) आणि करन्सी ट्रेडिंगसह सर्व मार्केट सेगमेंट्स बंद राहतील.
याव्यतिरिक्त मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) देखील होळीनिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहील, असे त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. दरम्यान, एक्सचेंज सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ५ ते रात्री ११:३० दरम्यान खुला राहील.
होळी सण हा २०२५ मधील १४ नियोजित शेअर बाजार सुट्ट्यांपैकी एक आहे. आगामी दिवसात ३१ मार्च रोजी ईद-उल-फित्र, १० एप्रिल रोजी श्री महावीर जयंती, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि १८ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्ताने बाजार बंद राहील.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात घसरण सुरु आहे. निफ्टी ५० निर्देशांक सप्टेंबरमधील २६,२७७ च्या शिखरावरून जवळजवळ १५ टक्क्यांनी खाली आला आहे. ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.