

* Stock Market | गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 953.20 अंक व 3076.60 अंकांनी वधारून दोन्ही निर्देशांक 23350.4 आणि 76905.51 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 4.26 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 4.17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गेल्या पाच सत्रांमध्ये भारतीय भांडवल बाजाराने सलग वाढ दर्शवली. मागील 4 वर्षांतील एकाच सप्ताहात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. या 5 सत्रांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवल बाजारमूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) तब्बल 22 लाख कोटींनी वाढले. यामध्ये बीएसई मिडकॅप निर्देशांक 7.09 टक्के, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 7.87 टक्क्यांनी वाढला. सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये एसबीआय लाईफ (11.6 टक्के), श्रीराम फायनान्स (9.2 टक्के), एचडीएफसी लाईफ (9.2 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (8.3 टक्के), अपोलो हॉस्पिटल्स (8.3 टक्के) या समभागांचा समावेश. सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये टेक महिंद्रा (-2.2 टक्के) आणि आयटीसी (-1.6 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने या वर्षात दोनवेळा व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा गुंतवणुकीचा ओघ भारतासारख्या अधिक व्याजदर (रेपोरेट) असलेल्या राष्ट्रांकडे वळवला. यामुळेच शुक्रवारच्या सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) शुक्रवारच्या सत्रात भारतीय भांडवल बाजारात 7470.36 कोटींची समभाग खरेदी केली. तसेच यापूर्वीच्या म्हणजेच गुरुवारच्या सत्रात या गुंतवणूकदारांनी 3239.14 कोटींची खरेदी केली होती. या सर्वांमुळे एकूणच भारतीय भांडवल बाजारात या सप्ताहात उत्साहाचे वातावरण होते.
* फेडरल रिझर्व्ह बँक, जी अमेरिकेतील व्याजदर (रेपोरेट) ठरवते. या बँकेने चालू वर्षात दोनदा व्याजदर कपात होण्याचे संकेत दिल्याने रुपया चलनाला डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा उभारी मिळाली. शुक्रवारअखेर रुपया चलन 86.3675 रुपये प्रतिडॉलर किमतीवरून मजबूत होऊन 85.9725 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाले. इक्विटी प्रकारात गेल्या 2-3 सत्रांत आलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे रुपया चलन मजबूत झाल्याचे अर्थविश्लेषकांचे मत. शुक्रवारच्या सत्रात रुपया चलनाने 85.9375 रुपये प्रतिडॉलरचा मागील 10 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि सप्ताहाअखेर एकूण 1.2 टक्क्यांच्या मजबुतीसह बंदभाव दिला. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांनीदेखील मोठी घट दर्शवली. 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्यांचा भाव 6.6249 टक्के इतका झाला. 21 जानेवारी 2022 नंतरचा हा सर्वात नीचांकी दर आहे. एकूण सप्ताहभरात या रोख्यांचा भाव 7 बेसिस पॉईंट खाली आला. मागील 4 महिन्यांतील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे.
* युनायटेड किंग्डममधील प्रुडेन्शिअल उद्योगसमूह आणि एचसीएएलटेक कंपनीची उपकंपनी ‘वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंटस्’ यांच्यामध्ये भागीदारी करार. या भागीदारीमध्ये प्रुडेन्शिअल ग्रुप होल्डींगचा 70 टक्के तर वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंटचा 30 टक्के हिस्सा असेल. ही भागीदारीमधील कंपनी आरोग्य विमा क्षेत्रात (हेल्थ इन्शुरन्स) कार्यरत असेल. सध्या जीवन विमा क्षेत्रात (लाईफ इन्शुरन्स) प्रुडेन्शिअलची आयसीआयसीआय सोबत भागीदारी असून, या क्षेत्रातील ती तिसर्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.
* इंडसइंड बँकेच्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये विसंगती आढळल्याने 2100 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे अंतर्गत छाननीतून स्पष्ट झाले. या व्यवहारातील खर्च हा ताळेबंदातील हिशेबापेक्षा अधिक झाल्याचे सप्टेंबर 2024 मध्ये प्रथम लक्षात आले. आता यामधील एकूण विसंगती शोधण्यासाठी बाह्य लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता यानुसार विसंगती आढळण्याचे मूळ कारण आणि त्यानुसार नुकसानीची जबाबदारी आणि दोषारोप निश्चिती करण्यात येणार आहे.
* आदित्य बिर्ला उद्योगसमूहाची बांधकाम क्षेत्रातील कंपनी बिर्ला इस्टेटचे पुण्यात घरबांधणी प्रकल्पाद्वारे पदार्पण. संगमवाडी या ठिकाणी 5.76 एकरांवर 1.6 दशलक्ष चौरस फुटांवर विक्री योग्य क्षेत्रफळाचे एकूण 1000 सदनिका (फ्लॅटस्) बांधण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ‘बिला पुण्य’ नावाच्या या प्रकल्पाद्वारे कंपनीला 2700 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.
* भारतीय सांख्यिकी मंत्रालयाकडून ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रासाठी ‘ई-कॉमर्स महागाई निर्देशांक’ चालू करण्यासाठी चाचपणी. यासाठी सांख्यिकी मंत्रालयाने भारतातील प्रमुख सुमारे 15 ई-कॉमर्स कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. भारतात महागाई जोखण्यासाठी किरकोळ महागाई दर निर्देशांक (रिटेल इन्फ्लेशन इंडेक्स) आणि घाऊक महागाईदर (होलसेल इन्फ्लेशन इंडेक्स) असे दोन निर्देशांक प्रामुख्याने वापरले जातात. परंतु, गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्सचे क्षेत्र झपाट्याने वाढले. अॅमेझॉन फ्लिपकार्ट मीशो सोबतच क्वीक कॉमर्स कंपनी जसे की ‘ब्लिंक इट’, ‘झेप्टो’ने देखील बाजारपेठेत हिस्सा काबीज केला. या प्लॅटफॉर्मवरील उत्पादनांच्या किमतीमधील चढ-उतारांवर लक्ष ठेवून आणि त्याद्वारे महागाईदराचा निर्देशांक निश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
* सरकारी कंपनी ‘राष्ट्रीय इस्पात निगम’मध्ये (आरआयएनएल) केंद्र सरकारने 11,440 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये 6,783 कोटींचा निधी मंजूर केला होता. आता उरलेला निधी प्रत्येक तिमाहीत ऑक्टोबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. सध्या ही कंपनी तोट्यात असून, तिची मालमत्ता (-4538 कोटी) आहे. कंपनीच्या मालमत्तेपेक्षा त्यावरील कर्ज अधिक आहे. या कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा निधी देण्यात येणार आहे.
* ‘बेन कॅपिटल’ ‘मनप्पुरम फायनान्स’ कंपनीमध्ये 18 टक्के हिस्सा खरेदी करणार. यासाठी बेन कॅपिटल एकूण 4385 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 236 रुपये दरावर एकूण 9.29 कोटी प्राधान्य समभागांचे (प्रेफरन्शिअल शेअर्स) आणि वॉरंटसच्या स्वरूपातील हस्तांतरण केले जाणार आहे. यापुढे बेन कॅपिटल ‘मनप्पुरम फायनान्स’चा सहप्रवर्तक (जॉईंट प्रमोटर) म्हणून काम करेल. 16 एप्रिल रोजी मनप्पुरम फायनान्सची एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग होणार आहे. या बैठकीत समभागधारकांकडून मान्यता मिळाल्यावर मग या व्यवहारावर शिक्कामोर्तब होईल.
* 1 एप्रिलपासून ‘यूपीआय’शी निगडित असलेला मोबाईल नंबर बरेच काळापासून बंद असेल, तर ते बँक अकाऊंट यूपीआयवरून हटवण्यात येणार. या क्रमांकावरून कोणतेही पेमेंट करता येणार नाही. एखादा मोबाईल नंबर बरेच काळ रिचार्ज न केल्यास तो नंतर दूरसंचार कंपनी दुसर्याला देते. आता या नंबरशी पूर्वीच्या व्यक्तीचे यूपीआयद्वारे बँक खाते जोडलेले असल्यास याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. यामुळे केंद्रीय नियामक ‘एनपीसीआय’ने हा बदल 1 एप्रिलपासून अंमलात आणण्याचे ठरवले आहे. 1 एप्रिलपासून फोन पे, गुगल पे, पेटीएम सर्वांसाठी हा नियम लागू असेल.
* 14 मार्च 2025 अखेर भारताची विदेश चलन गंगाजळी सप्ताहभरात 300 दशलक्ष डॉलर्सनी वधारून 654.27 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. गंगाजळीची ही मागील तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.