डॉ. वसंत पटवर्धन
गेल्या शुक्रवारी निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 37947 वर व 11470 वर बंद झाले. बुधवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी होती. त्यामुळे बाजार चारच दिवस चालू होता. गुरुवारी आपण एक महान मुत्सद्दी, प्रतिभावान कवी, उत्तम वक्ता व निष्णात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अटलबिहारी वाजपेयी यांना मुकलो. त्यांनी आर्थिक सुधारणा मोठ्या प्रमाणावर केल्या होत्या. त्यांच्या आत्म्यास सर्व निवेशकांतर्फे आदरांजली!
गेल्या आठवड्यात दिवाण हाऊसिंग फायनान्सचे जून 2018 तिमाहीचे आकडे उत्तम आल्याने त्या शेअरची किंमत झपाट्याने वाढून 67 रुपयांपर्यंत गेला आहे. अजूनही वर्षभरात तो सव्वाशे रुपयांनी वाढून 800 रुपयांपर्यंत चढू शकतो. सध्याच्या किंमतीला किं/उ. गुणोत्तर 18.22 पट दिसते. गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव 438 रुपये इतका कमी होता. म्हणजे आतापर्यंत त्यात 55 टक्क्यांची वाढ दिसली आहे. शिवाय मार्च 2018 वर्षाचा लाभांश मिळाला तो वेगळाच! कंपनीची या तिमाहीची विक्री 3149.67 कोटी रुपये होती. गेल्या जून तिमाहीची विक्री 2495.94 कोटी रुपये होती. यावेळचा नक्त नफा 435 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 13.87 रुपये होते. जून 2017 तिमाहीचा नफा 322.42 कोटी रु. होता व शेअरगणिक उपार्जन 10.29 रुपये होते. पुन्हा शेअर 910 रुपयांपर्यंत येईल तेव्हा तो जरूर घ्यावा.
कोल इंडियाने या तिमाहीत 15.4 कोटी टन खाणीतून कोळसा काढला. मार्च 2019 पर्यंतच्या आर्थिक वर्षात 95.2 कोटी टन काढण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. या तिमाहीत माल हलविण्यासाठी 884 कोटी रुपयांची तरतूद करूनही, तिमाही नफा 3786 कोटी रुपये झाला आहे. एकूण उत्पन्न जून 2017 तिमाहीपेक्षा 79% ने वाढून हा नफा मिळवला गेला. रुपयाचा विदेशी चलनाबरोबरचा विनिमय दर घसरत असला व आयात केलेला कोळसा महाग होत असला तरी ती बाब कोल इंडियाच्या पथ्यावर आहे.
कर्जबाजारी भूषण पॉवर अॅन्ड स्टीलचे आग्रहण करण्यासाठी जेएसडब्ल्यू स्टीलने सध्या 19700 कोटी रुपयांची बोली दिली आहे. टाटा स्टीलनेही आपली किंमत कळवली आहे. बँक ऑफ इंडियाने 5557 कोटी रुपयांची पन्नास खात्यातली अनार्जित कर्जे विक्रीला ठेवली आहेत. अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या, चांगला तगादा लावून अशी कर्जे वसूल करू शकतील. अशोक लेलँडला बांगला देशाच्या रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनकडून 300 बसेसची ऑर्डर मिळाली आहे.
केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्याने, तिथे जास्त कार्यरत असलेल्या फेडरल बँक, मुथुट फायनान्स, मन्नापुरम् फायनान्स व साऊथ इंडियन बँकांना त्याची झळ लागू शकेल. केरळमधून रबर घेणार्या टायर कंपन्यांवरही त्याचा परिणाम होईल. त्याच्या नफ्यांवर घसरणार्या रुपयामुळेही परिणामी घट दिसेल. या कंपन्यांपासून सध्यातरी गुंतवणुकीपासून दूर रहायला हवे. व्ही गार्ड, कायटेस गामेट याही कंपन्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. रॅमको सिमेंटलाही केरळमधून बर्याच ऑर्डर्स मिळतात. त्याही कमी होऊ शकतील.
रेन इंडस्ट्रीजची जून 2016 तिमाहीची विक्री 3803 कोटी रुपये होती. जून 2017 तिमाहीपेक्षा ती 44 टक्के व मार्च 2018 तिमाहीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. ढोबळ नफा जून 2017 तिमाहीपेक्षा 48 टक्के जास्त आहे. नक्त नफा 288 कोटी रुपये व्हावा अशी बाजाराची अपेक्षा असताना तो 458.3 कोटी रुपये झाला. या तिमाहीचे शेअरगणिक उपार्जन 13.6 रुपये आहे. वार्षिकीकृत उपार्जनाच्या फक्त 5.2 टक्के किं/उ. गुणोत्तर दिसते. सध्या शेअरचा भाव 220 रुपये आहे. गेल्या दोन महिन्यात तो 180 रुपयांपर्यंत घसरला होता. अजूनही तो घ्यावा. वर्षभरात पुन्हा तो 300 रुपयापेक्षा जास्त चढू शकेल.
दिवाण हाऊसिंग फायनान्स, रेन इंडस्ट्रीज, नाल्को, पी. एन. सी. इन्फ्रा, इंद्रप्रस्थ गॅस, हिंदुस्थान पेट्रोलियम, ऑईल इंडिया, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, ओ. एन. जी. सी. स्टरलाईट अॅनॉलॉजीज, विंध्या टलिलिंक्स, येस बँक, कोल इंडिया, हेग, ग्राफाईट इंडिया हे सर्व शेअर्स भागभांडवल वर्षभर ठेवण्यायोगे आहेत. लोकसभा व राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड या राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले तर ऑगस्ट 2019 पर्यंत निर्देशांक 42000 अंकांपर्यंत वाढू शकेल व निफ्टी 13500 ते 14000 पर्यंत विक्रमी झेप घेऊ शकेल.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी किमान एक वर्ष मुदतीसाठी गुंतवणूक ठेवायला हवी. अधूनमधून जागतिक आर्थिक वातावरण, भारतातील राजकीय व आर्थिक घडामोडी, रिझर्व्ह बँकेची व्याजधोरणे, समाधानकारक पावसाळा अशा कारणांमुळे निर्देशांक किंवा निफ्टीचा लंबक मागेपुढे हेलकावत राहील. पण स्वर्गीय अटलबिहारींच्या 'पराभवाची मला न भीती' या उक्तीप्रमाणे 'तात्पुरत्या मंदीची मला न भीती' अशी मानसिकता गुंतवणूकदारांनी ठेवून बाजारावर श्रद्धा ठेवावी व सबुरी बाळगावी.