अर्थवार्ता : गतसप्ताहात निफ्टीमध्ये 73.05 अंकांची घसरण

Nifty fell by 73.05 points last week
अर्थवार्ता : गतसप्ताहात निफ्टीमध्ये 73.05 अंकांची घसरण Pudhari File Photo
Published on
Updated on

* गतसप्ताहात निफ्टीमध्ये एकूण 73.05 अंकांची घसरण नोंदवली गेली असून, निर्देशांक 25722.1 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये 0.28 टक्क्यांची घसरण झाली. तसेच सेन्सेक्समध्ये एकूण 273.17 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 83938.7 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 0.32 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सप्ताहात बाजारात सर्वाधिक वाढ झालेल्या समभागांमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स (6.3 टक्के), जेएसडब्ल्यू स्टील (5.7 टक्के), टाटा स्टील (4.8 टक्के), श्रीराम फायनान्स (4.7 टक्के) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (3.6 टक्के) या समभागांचा समावेश झाला. तर सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (-6.7 टक्के), सिप्ला लिमिटेड (-5.2 टक्के), बजाज फायनान्स (-4.3 टक्के), कोटक महिंद्रा बँक (-3.9 टक्के) आणि महिंद्रा अँड महिंद्रा (-3.8 टक्के) या समभागांचा समावेश झाला.

* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत झालेल्या करारानंतर चिनी आयातीवरील शुल्कात 10 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत चीनने बेकायदेशीर फेंटानिल व्यापारावरील कारवाई करण्याचे आणि 12 दशलक्ष टन सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे चिनी आयातीवरील शुल्क 57 टक्केवरून 47 टक्के करण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी स्वतःला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीसाठी चक्क 10 पैकी 12 गुण दिले. या करारानंतर जागतिक बाजारात सौम्य सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आली. तसेच, चीनने दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध एक वर्षासाठी स्थगित करण्यास मान्यता दिली आहे.

* मेहली मिस्त्री यांना टाटा ट्रस्टमध्ये पुनर्नियुक्ती मिळण्यात अपयश आले असून, या प्रकरणात आता कायदेशीर लढाईचे संकेत मिळत आहेत. टाटा ट्रस्टच्या बहुसंख्य विश्वस्तांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध दर्शवला. मिस्त्री हे रतन टाटा यांचे दीर्घकाळचे निकटवर्तीय मानले जातात आणि ते सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट या महत्त्वाच्या संस्थांच्या विश्वस्त मंडळावर होते. या निर्णयानंतर टाटा समूहामध्ये नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नोएल टाटा यांना पुढील वर्षभरात रतन टाटा यांचा उत्तराधिकारी बनण्याची इच्छा असल्याचे मिस्त्री गटाच्या सूत्रांनी सांगितले. टाटा ट्रस्टमध्ये मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान विजय सिंग, वेणू श्रीनिवासन आणि नोएल टाटा यांनी विरोधात मत दिले, तर जहांगिर जे.एच.सी. आणि दरियस खांबाटा यांनी मिस्त्री यांच्या बाजूने मत दिले. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील मोठा हिस्सा असल्याने या निर्णयाचा टाटा समूहाच्या भविष्यातील धोरणांवर परिणाम होऊ शकतो. सध्या मिस्त्री यांच्या गटाकडून पुढील कायदेशीर पावले उचलण्याची तयारी सुरू असून, या संघर्षामुळे टाटा समूहातील आंतरकलह पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन-आयडिया (Vi) ला मोठा दिलासा देत दूरसंचार विभागाला (DoT) कंपनीच्या AGR थकबाकी प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची परवानगी दिली आहे. Vi वर सध्या सरकारी करापोटी रु. 1.91 लाख कोटींची थकबाकी असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे कंपनीला आर्थिक स्थैर्य मिळविण्याची नवी संधी निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना सांगितले की, या प्रकरणातील विशेष परिस्थिती लक्षात घेता सरकारला पुनर्विचार करण्यापासून रोखण्याचे कोणतेही कारण नाही. केंद्र सरकारचा 49% हिस्सा व्होडाफोन-आयडियामध्ये आहे, तर कंपनीच्या सुमारे 200 दशलक्ष ग्राहक कंपनीची दूरसंचार सेवा वापरत आहेत.

* एनव्हिडिया (Nvidia) ही जगातील पहिली 5 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य असलेली कंपनी बनली आहे. एनव्हिडियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानातील प्रगती आणि सीईओ जेनसन हुआंग यांच्या करारांच्या मालिकेमुळे कंपनीला हा टप्पा गाठता आला. मागील फक्त चार महिन्यांपूर्वीच कंपनीने 4 ट्रिलियन डॉलरचा आकडा पार केला होता. एनव्हिडियाच्या वाढीमुळे ती S&P 500 निर्देशांकातील संपूर्ण वाढीपैकी जवळपास 20% वाढीस कारणीभूत ठरली आहे. दुसर्‍या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट (3.85 ट्रिलियन डॉलर), तिसर्‍या क्रमांकावर अ‍ॅपल (3.77 ट्रिलियन डॉलर) आणि चौथ्या क्रमांकावर अल्फाबेट (2.94 ट्रिलियन डॉलर) या कंपन्या आहेत. कंपनीचे AI चिप्स क्वांटम संगणकांशी जोडण्यासाठी वापरले जाणार असून, ते अर्धा ट्रिलियन डॉलर महसूल निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, एनव्हिडियाची ही कामगिरी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे.

* रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि गुगल यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली असून, त्याअंतर्गत जिओ वापरकर्त्यांना गुगलच्या Gemini Pro या AI सेवेला मोफत प्रवेश मिळणार आहे. या करारानुसार, जिओचे 18 ते 25 वयोगटातील ग्राहक जे अनलिमिटेड 5G प्लॅन वापरतात, त्यांना ही सुविधा दिली जाणार आहे. गुगलचा AI Pro प्लॅन 35,100 किमतीचा असून, त्यात 2 TB क्लाऊड स्टोरेजदेखील मिळते. ही योजना 18 महिन्यांसाठी विनामूल्य असेल आणि ती भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याआधी एअरटेलने Perplexity AI सोबत भागीदारी करून आपल्या ग्राहकांना अशाच प्रकारचा मोफत प्रवेश दिला होता. तसेच, OpenAI नेही आपल्या ChatGPT Go सेवेसाठी भारतात एक वर्षाचा मोफत प्लॅन जाहीर केला होता. या भागीदारीमुळे RIL आणि Google दोघेही भारतातील डिजिटल आणि AI क्रांतीत नवे पर्व सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.

* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि ऑईल इंडिया लिमिटेड (OIL) या कंपन्यांनी आंध्र प्रदेशात रु. 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह नवीन रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याचा करार केला आहे. प्रस्तावित रिफायनरीची क्षमता दरवर्षी 9 ते 12 दशलक्ष टन इतकी असेल आणि ती वित्तीय वर्ष 2030 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी आंध्र प्रदेश सरकारने 6,000 एकर जमीन मंजूर केली आहे. तसेच, कंपन्यांनी रु. 3,500 कोटींच्या पाईपलाईन प्रकल्पासाठी एनआरएल कंपनी आणि ऑईल इंडियासोबत देखील करार केला असून, यामुळे देशातील इंधन वितरण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेस चालना मिळणार आहे.

* अमेरिकेच्या बेभरवशाच्या व्यापार धोरणामुळे भारतीय निर्यातदारांनी आपली निर्यात इतर देशांकडे वळवली आहे. यामुळे आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये निर्यातीमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. समुद्री उत्पादनांची निर्यात 15.6% वाढून $ 4.83 अब्ज झाली, तर कापड निर्यात 1.23 टक्के वाढून $ 28.05 अब्ज इतकी झाली. विशेषतः व्हिएतनाम, मलेशिया, बेल्जियम आणि थायलंड या देशांकडे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून, व्हिएतनामला निर्यात 100 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच चीन, जपान आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांनाही भारतीय निर्यात वाढली आहे. या बदलामुळे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या निर्यात क्षेत्राला स्थैर्य आणि नवे बाजारपेठांचे दरवाजे उघडले आहेत.

* भारत सरकारने रु. 5,532 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत Kaynes Group, Syrma Group, Ascent Circuits (Amber Group) आणि SRF या कंपन्यांच्या सात प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे देशात 5,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकल्पांमुळे इलेक्ट्रॉनिक्स आयात खर्चात सुमारे रु. 20,000 कोटींची बचत होणार आहे.

* भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, भारताचा परकीय चलनसाठा 7 अब्ज डॉलरांनी घटून $ 695.4 अब्ज झाला आहे. 24 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात ही घसरण नोंदली गेली. एकूण साठ्यातील परकीय चलन मालमत्ता $ 566.5 अब्ज (घट $ 3.9 अब्ज), सोने साठा $ 105.5 अब्ज (घट $ 3 अब्ज) इतका राहिला. तसेच, SDR साठा $ 18.7 अब्ज आणि IMF कडे असलेली राखीव साठा $ 4.6 अब्ज इतका होता. या घसरणीमुळे भारताचा एकूण परकीय साठा काहीसा कमी झाला असला, तरी तो अजूनही स्थिर पातळीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news