

सध्या तिसर्या आठवड्यात बाजाराने साप्ताहिक घसरण नोंदवली. या घसरणीच्या मुळाशी असणारे कारण एव्हाना वाचकांच्याही तोंडपाठ झाले आहे. भारत-अमेरिका ट्रेड डीलला होणारा विलंब! त्या विलंबामुळे FII रोज विक्री करत आहेत.
आता या ट्रेड डीलमधील विलंबाला जोडून आणखी एक कारण पुढे आले आहे आणि ते म्हणजे भारतीय स्टॉक मार्केटचे. व्हॅल्युएशन महाग आहे. कारण, आज निफ्टीचा पीई रेशो आहे 22.6 आणि मागील दोन वर्षांचा सरासरी पीई रेशो आहे 22.3. सन 2026 च्या पहिल्या तिमाहीतील कार्पोरेट अर्निंग्ज वाढतील. आर्थिक निकाल चांगले येतील आणि त्यामुळे पीई रेशो कमी होऊन बाजाराचे व्हॅल्युएशन स्वस्त होईल. या गुंतवणूकदारांच्या आणि तज्ज्ञांच्या अंदाजाला सुरुवातीलाच दणका बसला. TCS आणि Tata Elxsi ने आर्थिक कामगिरीत निराशा केली. इतकेच नव्हे, तर टॅरिफ वाढीचे संकट आणि ट्रम्प यांचा घातकी स्वभाव पाहून कंपन्यांकडून आगामी काळाचा अंदाजही सकारात्मक येईनासा झाला आहे.
अॅक्सिस बँक, बंधन बँक, सीएट, टेक महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक यांनी सादर केलेल्या खराब आर्थिक निकालांनी अगोदरच संभ्रमात असलेल्या बाजारात निराशा पसरली. निफ्टी आयटी इंडेक्स सव्वातीन टक्के घसरला. टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, या सर्व कंपन्यांचे शेअर्स दीड टक्क्यापर्यंत घसरले. एचसीएल टेकचा शेअर तर साडेचार टक्के कोसळला. विप्रो आणि एलटीआय माइंड ट्री या कंपन्यांनी मिश्र काहीसे सकारात्मक निकाल सादर केले. त्यामुळे ते ग्रीन झोनमध्ये राहिले.
अॅक्सिस बँकेच्या खराब निकालामुळे हा शेअर पावणेसात टक्के खाली गेेला. निफ्टी प्रॉइव्हेट बँक इंडेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे योगदान अधिक असल्यामुळे तो इंडेक्सही दबावाखाली राहिला. इतक्या खराब वातावरणातही निफ्टी रिअॅल्टी इंडेक्सने बाजाराला सावरून धरले. आठवड्यात तो पावणेचार टक्के वाढला. Sobha चा शेअर पावणे तेरा टक्के वाढला. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने निव्वळ नफ्यात 500 टक्के वाढ नोंदवली होती. त्याचीच पुनरावृत्ती गुंतवणूकदारांना अपेक्षित आहे. सप्ताहाच्या अखेरीस हा शेअर 1685 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे तिमाही सेल्स बुकिंग 11 टक्क्यांनी वाढून All Time High ला पोहोचले. विशेषतः Sobha Aurum या ग्रेटर नोईडामधील प्रोजेक्टला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. गोदरेज प्रॉपर्टीज आणि प्रेस्टीज इस्टेट हे शेअर्सही अनुक्रमे साडेसात आणि पावणेपाच टक्के वाढले.
निफ्टी फार्मा इंडेक्सही दोन टक्के वाढला. जेव्हा जेव्हा बाजारात मंदीची किंवा करेक्शन येण्याची चर्चा होते तेव्हा फार्मा शेअर्स वाढतात. ग्लेनमार्क, मॅनकाईंड, लुपिन हे शेअर्स वाढले. परंतु, बायोकॉन आणि मॅनकाईंड फार्मामधील तेजी लक्षणीय आहे. आनंद राठी वेल्थ गेल्या तीन महिन्यांमध्ये पन्नास टक्के वाढला आहे. अतिशय मजबूत फंडामेंटल्स असणारी ही कंपनी आहे. सलग 14 तिमाहींमध्ये कंपनीने पॉझिटिव्ह निकाल दिले आहेत. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट ग्रोथ रेट 35 टक्के आहे, तर ROE 38.37 टक्के आहे. कंपनीचा शुक्रवारचा बंद भाव रु.2631.20 आहे. दर्जेदार पोर्टफोलिओमध्ये या शेअरला स्थान अवश्य मिळायला हवे.
हा लेख लिहीत असतानाच मार्केटचा डाऊनट्रेेंड फिरविण्याची क्षमता असलेली एक सुखद बातमी आली आणि ती म्हणजे रिलायन्सचे निकाल! रिलायन्स आणि एचडीएफसी बँक यांच्या निकालामुळे संपूर्ण बाजाराचे लक्ष असते. रिलायन्सच्या नेट प्रॉफिटमध्ये 78 टक्के वाढ झाली. तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता 19,859 कोटी रुपयांचा तर प्रत्यक्ष निव्वळ नफा आला 26,994 कोटी रुपये. रिलायन्सची उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्मस्नेही दमदार निकाल सादर केले. प्रॉफिटमध्ये 25 टक्के वाढ तर ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये 19 टक्के वाढ. JSW Steel ही मेटल सेक्टरमधील अतिशय महत्त्वाची कंपनी. तिचा निव्वळ नफा दुपटीपेक्षा अधिक वाढला. ठरश्रश्रळी Rallis India चा निव्वळ नफा 98 टक्के वाढला आणि हा शेअर 52 Week High कळसह ला पोहोचला. इंडियन ओव्हरसीज या सरकारी बँकेने अतिशय चांगले निकाल सादर केले. तिच्या निव्वळ नफ्यात 76 टक्के वाढ झाली.
आयसीआयसीआय बँकेचे निकाल शनिवारी बँकेने सादर केले. बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक धर्तीवर साडेपंधरा टक्के वाढ झाली. ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये 13.6 % तर नेट इंटरेस्ट इन्कममध्ये 10.6 % वाढ झाली. एचडीएफसी बँकेनेही आपले निकाल जाहीर केले. प्रॉफिटमध्ये 12.2 % वाढ तर नेट इंटरेस्ट इन्कममध्ये 6% वाढ झाली. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1ः1 प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा करण्यात आली. रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे निकाल पाहता सोमवारी बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे.
जेफरीज् या प्रसिद्ध ग्लोबल ब्रोकरेज फर्मने पहिल्या तिमाही निकालांच्या अनुषंगाने खालील केमिकल्स कंपन्यांची नावे आपल्या Top Picks च्या यादीमध्ये समाविष्ट केली आहेत Navin Fluorine, PI Industries, SRF आणि Anupam Rasayan. अतिशय चांगले फंडामेंटल्स असलेले काही शेअर्स बाजाराच्या करेक्शनमध्ये किंवा इतर काही नैमित्तिक कारणांनी खूप घसरणीला लागतात. जेव्हा बाजार इथून पुढे तेजी दाखवणार की बाजारात करेक्शन येणार अशी संभ्रमित अवस्था येते, तेव्हा अशा शेअर्समध्ये गुंतवणुकीचा विचार करावा. कारण, तेजी आली तर अशा Most Beaten शेअर्समध्ये सर्वप्रथम खरेदी होते आणि बाजारात करेक्शन आले तरी आधीच खूप खाली गेल्यामुळे अशा शेअर्समध्ये Downside Risk कमी होते.