अपर्णा देवकर
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच ते बचत करतात, तसेच गुंतवणूक करून त्या पैशात वाढदेखील करू इच्छितात. मुलांसाठी बाजारात अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. परंतु, गतवर्षी सुरू झालेली ‘एनपीएस वात्सल्य योजना’ या सर्व योजनांपेक्षा अधिक फायदेशीर मानली जात आहे.
एनपीएस वात्सल्य योजना’ या योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो, ज्यामुळे तुमची थोडीशी रक्कमही दीर्घकाळानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी तयार करू शकते. एनपीएस वात्सल्य योजनेंतर्गत 18 वर्षांखालील मुलाचे खाते उघडता येते. जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतर त्वरित हे खाते उघडले, तर 18 वर्षांपर्यंत हे खाते ‘वात्सल्य योजना’च्या अंतर्गत राहील आणि नंतर ते सामान्य एनपीएस खात्यात रूपांतरित होईल. तथापि, दोन्ही प्रकारच्या खात्यांवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत राहतो. मूल 18 वर्षांचे झाल्यावर पालक या योजनेतून बाहेर पडू शकतात. त्यानंतर अट अशी आहे की, मॅच्युरिटीवरील एकूण रकमेच्या किमान 80 टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये पुन्हा गुंतवावी लागेल आणि तुम्ही फक्त20 टक्के रक्कम काढू शकता.
एनपीएस वात्सल्य योजनेचा लाभ मुलाच्या उच्च शिक्षणात, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही मोठ्या गरजेतही मिळणार आहे. तुम्हाला वर्षाला किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही मुलांसाठी एनपीएस वात्सल्यमध्ये थोडीशी रक्कमही गुंतवत राहिलात, तर मूल 18 वर्षांचं होईपर्यंत तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. तुम्ही यामध्ये 1000 रुपयांपासूही सुरुवात करू शकता.
समजा, वयाच्या 19 ते 60 व्या वर्षांपर्यंत मुलानेही त्यात दरमहा 1000 रुपये गुंतवले, तर 60 वर्षांच्या कालावधीत एनपीएस वात्सल्य योजनेत 7.20 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. पण, यावर तुम्हाला जवळपास 3.76 कोटी रुपयांचं व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे तुमचा एकूण कॉर्पस 3.83 कोटी रुपये होईल. समजा, वयाच्या 60 व्या वर्षांनंतर मुलांनी एनपीएस वात्सल्य खात्यातील सर्व पैसे अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतले असे समजूया. त्या प्लॅनमधील व्याजदर फक्त5-6 टक्के असला तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त19 ते 22 लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा दोन लाख रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत.

