भरत साळोखे
"An investment in knowledge pays the best interest" असे बेंजामिन फ्रँकलीनचे एक सुप्रसिद्ध वचन आहे. शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना किंबहुना गुंतवणूक करून थोडा काळ लोटल्यावर याची तंतोतंत प्रचिती येते. आपल्याला दोन अपत्ये असतील, तर आपण ज्यामध्ये गुंतवणूक करू तो म्युच्युअल फंड हे आपले तिसरे अपत्य आहे, अशा भावनेने आपण त्याकडे पाहिले पाहिजे. कारण, आपल्या सेवानिवृत्तीच्या काळात, अडीअडचणींच्या काळात किंवा उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासात आपले हे तिसरे अपत्यच आपल्याला साथ देत असते.
असे असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी कोणते म्युच्युअल फंड उत्कृष्ट आहेत, याचा अभ्यास करूनच आपण गुंतवणूक केली पाहिजे. त्यापूर्वी गुंतवणुकीचे आपले उद्दिष्ट, कालावधी आणि आपली जोखीम स्वीकारण्याची क्षमता या बाबींचा विचार करून कुठल्या प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक करावी, हे ठरविले पाहिजे. म्यच्युअल फंडाचे वर्गीकरण करताना त्याचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत.
1) Equity Funds
2) Debt Funds
3) Money Market Funds
वरीलपैकी Equity Fund मधील गुंतवणूक ही NSE व BSE वर नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्समध्ये होते. Debt Fund मधील गुंतवणूक ही Debt किंवा Fixed Income Securities (उदा. ट्रेझरी बिल्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट बाँडस् वगैरे) मध्ये होते, तर Money Market Fund मधील गुंंतवणूक ही Short Term Money Market Securities (उदा. ट्रेझरी बिल्स, कमर्शिअल पेपर्स) मध्ये होते.
आता वरीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये आपण गुंतवणूक करावी? तर हे ठरते मुख्यत्वे आपल्या कालावधीवर. आपल्याला जर 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर Money Market Funds मध्ये गुंतवणूक करावी. आपल्याकडे 1 वर्षापासून 3 वर्षांपर्यंतचा कालावधी असेल, तर Debt Fund मध्ये गुंतवणूक करावी आणि तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर Equity Fund मध्ये गुंतवणूक करावी.
या तीनही प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये जोखीम असते; मात्र या जोखमीचे स्वरूप आणि तीव्रता यामध्ये फरक असतो. Money Market Funds मध्ये नगण्य किंवा अत्यल्प जोखीम असते. Debt Funds मधील गुंतवणुकीपेक्षा कमी (Credit risk, interest risk) असते, तर Equity Funds मधील गुंतवणुकीला सर्वाधिक जोखीम असते.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की म्युच्युअल फंडांचे वरील मुख्य तीन प्रकारांमध्येही उपप्रकार आहेत. म्हणजे इक्विटी फंडाचे, डेट फंडाचे आणि मनी मार्केट फंडाचेही अनेक उपप्रकार आहेत आणि नुकतेच सेबीने (Securities Exchange Board of India) हे वर्गीकरण अतिशय काटेकोर आणि ग्राहकांना समजण्यासाठी सुलभ असे केले आहे. त्याचा थोडा जरी अभ्यास केला, तरी आपल्या उद्दिष्टानुसार आणि कालावधीनुसार आपण कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी, हे ठरवू शकतो. त्यामुळे जोखीम पूर्ण नाहिशी होत नसली, तरी आपण तिचे उत्तम प्रकारे नियोजन (Risk Management) करू शकतो.
हे उपप्रकार कोणते आहेत आणि आपण त्यातील कोणता उपप्रकार निवडावा, याची माहिती आपण पुढील लेखात घेऊ.