

एनएफओमध्ये काही अंतर्निहित जोखीम असतेच. ती गुंतवणुकीपूर्वी गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवी. स्थापित फंडांच्या तुलनेत, या फंडांकडे कोणताही ऐतिहासिक डेटा नसतो. त्याचप्रमाणे, सुरुवातीच्या काळात एसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे ‘एयूएम’ची कमी असल्यामुळे त्यांचे खर्चाचे प्रमाण अधिक असू शकते. यामुळे परताव्यावर परिणाम होतो.
शेअर बाजारातील अलीकडील घसरणीचा प्रभाव म्युच्युअल फंडांवर स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः, नुकत्याच सुरू केलेल्या इक्विटी न्यू फंड ऑफरवर (एनएफओ) तो अधिक प्रमाणात जाणवत आहे. गेल्या काही वर्षांत फंड हाऊसेसनी अनेक थीमॅटिक आणि सेक्टर-केंद्रित योजना सुरू केल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केली. मात्र, आता या फंडांना नुकसान सहन करावे लागत आहे आणि त्यांच्या नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) इश्यू प्राईसच्याही खाली घसरल्या आहेत. गेल्या दोन तिमाहींमध्ये सुरू झालेले जवळपास 90 टक्के एनएफओ हे सेक्टोरल किंवा थीमॅटिक किंवा पॅसिव्ह इंडेक्स फंडस्च्या श्रेणीत येतात. अलीकडील बाजारातील घसरणीचा प्रभाव संरक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांसारख्या थीम्सवर झाला आहे. मोमेंटम फंडस्सारख्या फॅक्टर बेस्ड फंडांनी मागील सहा महिन्यांत 20 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली आहे.
वास्तविक पाहता एनएफओजमध्ये काही अंतर्निहित जोखीम असतेच. ती गुंतवणुकीपूर्वी गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवी. स्थापित फंडांच्या तुलनेत, या फंडांकडे कोणताही ऐतिहासिक डेटा नसतो. त्याचप्रमाणे, सुरुवातीच्या काळात एसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे एयूएमची कमी असल्यामुळे त्यांचे खर्चाचे प्रमाण अधिक असू शकते. यामुळे परताव्यावर परिणाम होतो. अनेक गुंतवणूकदारांनी उच्च जोखमीचे सेक्टोरल आणि थीमॅटिक एनएफओज निवडले आहेत. पण, त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ मर्यादित क्षेत्रांमध्ये केंद्रित असतात. फंड मॅनेजर्सला त्यांच्या गुंतवणूक निर्देशांमुळे कमकुवत कामगिरीच्या परिस्थितीत इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा नसते. शिवाय, सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड हे चक्रीय किंवा सायक्लिकल स्वरूपाचे असतात. त्यामुळे बाजार उच्चांकावर असताना प्रवेश करणार्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात कमी परताव्याचा सामना करावा लागू शकतो.
हे लक्षात घेता फंडांच्या जोखीम प्रोफाईलचे मूल्यमापन करणे गरजेचे ठरते. गुंतवणूकदारांनी स्वतःच्या वित्तीय उद्दिष्टांशी एनएफओ जुळतात का, हे तपासले पाहिजे. फंडांच्या उद्दिष्टांबद्दल आणि त्याच्या धोरणांबद्दल समजून घेतले पाहिजे. तो ग्रोथ, व्हॅल्यू, पॅसिव्ह किंवा अॅक्टिव्ह प्रकारातील आहे का, आणि तो त्यांच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेशी आणि आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे का, या बाबी जाणून घेतल्या पाहिजेत. यामध्ये जोखीम स्वीकारण्याची क्षमता हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्मॉल-कॅप फंड, सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड, तसेच मोमेंटम फंड यांसारख्या फॅक्टर-बेस्ड धोरणांमध्ये जास्त जोखीम असते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी जोखीम प्रोफाईलचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्टोरल आणि थीमॅटिक एनएफओंमध्ये गुंतवणूक करताना योग्य प्रवेश आणि निर्गमन म्हणजेच एंट्री आणि एक्झिट अचूक असणे आवश्यक आहे. सेक्टोरल आणि थीमॅटिक एनएफओ मर्यादित गुंतवणूक धोरण स्वीकारतात. त्यामुळे त्यांचे एक्सपोजर काही विशिष्ट क्षेत्रांमध्येच असते. अशा फंडांमध्ये यशस्वी गुंतवणुकीसाठी योग्य वेळी प्रवेश आणि निर्गमन करणे महत्त्वाचे ठरते. गुंतवणूकदारांकडे वेळ, अभ्यासूपणा किंवा यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची क्षमता नसेल, तर त्यांनी डायव्हर्सिफाईड पर्यायांचा विचार करावा. सिंगल फॅक्टर धोरणांमध्ये देखील अचूक टायमिंग आवश्यक असते. डायव्हर्सिफाईड इक्विटी एनएफओमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनी आपला गुंतवणूक कालावधी तपासून पाहावा. इक्विटी-आधारित योजनांसाठी गुंतवणूकदारांनी किमान 5 ते 7 वर्षांचा होल्डिंग कालावधी ठेवली पाहिजे. स्मॉल-कॅप फंडस्साठीही कालावधी 10 वर्षांपेक्षा जास्त ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच गुंतवणूकदारांनी चांगल्या ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या फंडांना प्राधान्य द्यावे.