PAN card loan | तुमच्या पॅन कार्डवर कुणी कर्ज घेतलेय का?

वेळीच सावध व्हा; ‘अशी’ करा तपासणी आणि तक्रार
PAN card loan |
PAN card loan | तुमच्या पॅन कार्डवर कुणी कर्ज घेतलेय का? Pudhari File Photo
Published on
Updated on

सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच आर्थिक फसवणुकीचे धोकेही वाढलेले आहेत. सायबर गुन्हेगार आता तुमच्या ओळखीचा पुरावा असलेल्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर कर्ज उचलत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. मात्र, थोडी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही या फसवणुकीला बळी पडण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.

तुमच्या पॅन कार्डवर कोणी परस्पर कर्ज घेतले आहे का, हे तपासण्याचा सर्वात सोपा आणि अधिकृत मार्ग म्हणजे तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ तपासणे. क्रेडिट रिपोर्ट हा तुमच्या आर्थिक व्यवहारांचा आरसा असतो. तुम्ही घेतलेली सर्व कर्जे, क्रेडिट कार्डस् आणि त्यांची परतफेड यांचा तपशील यात नोंदवलेला असतो.

क्रेडिट ब्युरोची मदत घ्या : भारतात CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark यांसारख्या प्रमुख क्रेडिट ब्युरो संस्था आहेत. या संस्था तुमच्या पॅन कार्डशी जोडलेल्या प्रत्येक कर्जाची आणि क्रेडिट कार्डची माहिती जपून ठेवतात.

असा मिळवा रिपोर्ट :

यापैकी कोणत्याही क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, पॅन कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर यांसारखी माहिती भरा. ओळख पटवण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर किंवा OTP टाकल्यानंतर तुमचा क्रेडिट रिपोर्ट तयार होईल. वर्षातून एकदा हा रिपोर्ट विनामूल्य मिळवता येतो.

रिपोर्ट काळजीपूर्वक तपासा : या रिपोर्टमध्ये तुम्हाला नावावर असलेल्या सर्व कर्ज खात्यांची आणि क्रेडिट कार्डस्ची यादी दिसेल. प्रत्येक नोंद काळजीपूर्वक तपासा.

फसवणूक कशी ओळखाल?

क्रेडिट रिपोर्ट पाहताना जर तुम्हाला खालील गोष्टी आढळल्या, तर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याची दाट शक्यता असते.

अनोळखी कर्ज : रिपोर्टमध्ये असे एखादे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड दिसत आहे, ज्यासाठी तुम्ही कधीही अर्ज केलेला नाही.

चुकीची माहिती : कर्जाच्या तपशिलात बँकेचे किंवा कर्ज देणार्‍या संस्थेचे नाव अनोळखी आहे.

कर्जाची चौकशी : तुम्ही अर्ज न करताही अनेक बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून तुमच्या नावावर कर्जाची चौकशी (Loan Inquiry) झाल्याचे रिपोर्टमध्ये दिसत आहे.

बनावट कर्ज आढळल्यास काय कराल?

रिपोर्टमध्ये बनावट कर्ज दिसल्यास घाबरून न जाता तातडीने खालील पावले उचला.

संबंधित संस्थेशी संपर्क साधा : ज्या बँकेने किंवा वित्तीय संस्थेने ते कर्ज दिले आहे, त्यांच्याशी त्वरित स्वत: संपर्क साधा. त्यांना सांगा की, हे कर्ज तुम्ही घेतलेले नाही आणि ही एक फसवणूक आहे.

पुरावे सादर करा : संबंधित संस्था तुमच्याकडून ओळख पटवण्यासाठी काही कागदपत्रे आणि एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) मागू शकते, ज्यात तुम्ही ते कर्ज घेतले नसल्याचे स्पष्ट नमूद केलेले असेल.

सायबर पोलिसांत तक्रार करा : तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनच्या सायबर क्राईम सेलमध्ये किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) ऑनलाईन तक्रार दाखल करा. तक्रारीसोबत क्रेडिट रिपोर्ट आणि इतर पुरावे जोडा.

क्रेडिट ब्युरोला कळवा : ज्या क्रेडिट ब्युरोसंस्थेच्या रिपोर्टमध्ये हे कर्ज दिसले आहे, त्यांनाही या फसवणुकीबद्दल लेखी स्वरूपात कळवा. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होईल.

पॅन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी...

माहिती शेअर करू नका : कोणत्याही अनोळखी वेबसाईट, अ‍ॅप किंवा व्हॉटस्अ‍ॅप मेसेजवर तुमच्या पॅन कार्डचा फोटो किंवा नंबर शेअर करू नका.

पॅन कार्ड हरवल्यास : तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर त्याची तक्रार दाखल करा आणि नवीन कार्डसाठी तत्काळ अर्ज करा.

नियमित तपासणी : दर तीन ते चार महिन्यांनी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल वेळीच तुमच्या लक्षात येईल.

ऑनलाईन सुरक्षा : ऑनलाईन बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी मोठा आणि सुरक्षित पासवर्ड वापरा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news