

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियाच्या एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंक (LG Electronics Inc) आता त्यांची भारतीय उपकंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे. LG Electronics India ने त्यांच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी बाजार नियामकाकडे मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. हा देशातील आतापर्यंतचा चौथा सर्वात मोठा IPO असेल. तसेच एका कोरियन कंपनीचा हा दुसरा सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोरियन कंपनी ह्युंदाईदेखील आयपीओ बाजारात आणला होता.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, या कंपनीला आयपीओच्या माध्यमातून १५,२३७ कोटी रुपये (१.८ अब्ज डॉलर) उभे करायचे आहेत. "ही खरोखरच मोठी डील आहे आणि इश्यूचा आकार १५,२३७ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे." या आयपीओच्या आकारामुळे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा पब्लिक इश्यू देशातील ५ सर्वात मोठ्या आयपीओच्या यादीत सामील होईल. या यादीत ह्युंदाई मोटर इंडिया, एलआयसी, पेटीएम आणि कोल इंडिया यांचा समावेश आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या इश्यू पूर्णतः ऑफर फॉर सेल आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्सनुसार (DRHP), या ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून १०.१८ कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या डीलसाठी मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन, ॲक्सिस कॅपिटल, बोफा सिक्योरिटीज आणि सिटीग्रुप सारख्या गुंतवणूक बँका काम करत आहेत.
"आमच्या कंपनीला अपेक्षा आहे की इक्विटी शेअर्सच्या लिस्टिंगमुळे आमची ब्रँड प्रतिमा उंचावेल आणि भारतातील इक्विटी शेअर्ससाठी तरलता आणि सार्वजनिक बाजारपेठ मिळेल," असे DRHP मध्ये LG Electronics India ने नमूद केले आहे.
यापूर्वी दक्षिण कोरियातील आणखी एक प्रमुख कंपनी ह्युंदाई मोटर्सचे (Hyundai Motors Company) लोकल युनिट Hyundai Motor India ने त्यांचा IPO लाँच केला होता. हा आयपीओ ३.३ अब्ज डॉलर म्हणजेच २७,८५६ कोटी रुपयांचा होता.