Stock Market Mistakes | तेजीतही कोसळणार्या समभागातून काय शिकावे?
हेमचंद्र फडके
निर्देशांक वर जात असले तरी प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक शेअर त्याच प्रमाणात वाढतो असे नसते. काही कंपन्यांचे व्यवसाय चक्र, आर्थिक निकाल, कर्जाची पातळी, व्यवस्थापनाचे निर्णय किंवा उद्योगातील बदल यांचा परिणाम नकारात्मक असू शकतो. त्यामुळे तेजीतही अनेक शेअर्स घसरतात.
गत एक वर्षात भारतीय शेअर बाजाराने प्रभावी तेजी अनुभवली आहे. निफ्टी 50 सुमारे 11 टक्क्यांनी वाढला आहे, तकर निफ्टी 500 निर्देशांकानेही 9 टक्क्यांच्या आसपास वाढ नोंदवली आहे. अनेक शेअर्स त्यांच्या वर्षातील उच्चांकाजवळ फिरत आहेत आणि व्यापक बाजारात आशावादाचे वातावरण दिसत आहे. परंतु, या तेजीतही काही शेअर्सनी उलट दिशेने मोठी घसरण दाखवली आहे. व्यापक तेजी असूनही हे शेअर्स का पडले, याची कारणे, त्यांच्यातील धोके आणि त्यातून गुंतवणूकदारांनी काय शिकावे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
बाजार तेजीत असतानाही घसरण का होते?
निर्देशांक वर जात असले तरी प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक शेअर त्याच प्रमाणात वाढतो असे नसते. काही कंपन्यांचे व्यवसाय चक्र, आर्थिक निकाल, कर्जाची पातळी, व्यवस्थापनाचे निर्णय किंवा उद्योगातील बदल यांचा परिणाम नकारात्मक असू शकतो. त्यामुळे तेजीतही अनेक शेअर्स घसरतात. ही परिस्थिती गुंतवणूकदारांना विविधीकरणाचे महत्त्व आणि मूलभूत तपासणीची गरज अधोरेखित करते.
खालील कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली असून, त्यापैकी प्रत्येकाचा स्टॉक वर्षातील उच्चांकापेक्षा निम्म्यापेक्षाही कमी भावाला आला आहे.
1) आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल : या कंपनीचा शेअर तब्बल 76 टक्केघसरला आहे. वर्षातील सर्वोच्च पातळी 325 रुपयांवरून तो 78 रुपयांपर्यंत आला. रिटेल क्षेत्रातील तीव्र स्पर्धा, मार्जिनवरचा दबाव आणि खर्चातील वाढ याचा परिणाम या घसरणीत दिसतो.
2) तेजस नेटवर्क्स : उच्चांक 1403 रुपयांवरून हा शेअर साठ टक्क्यांहून जास्त कोसळत 494 रुपयांवर आला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणीतील चढ-उतार आणि प्रकल्पांच्या वेळेत होणार्या बदलांचा परिणाम या किमतीत दिसतो.
3) एसकेएफ इंडिया ः या कंपनीचा शेअर वर्षातील 5210 रुपये या सर्वोच्च पातळीवरून जवळजवळ 1880 रुपयांपर्यंत घसरला आहे. ही 64 टक्क्यांची घसरण आहे.
4) प्राज इंडस्ट्रीज ः उच्चांक 875 रुपयांवरून तो 310 रुपयांवर आला असून सुमारे 68 टक्क्यांची घसरण नोंदली आहे. ऊर्जासंबंधित तंत्रज्ञान आणि बायोफ्युएल प्रकल्पांच्या गतीतील बदल येथे प्रमुख घटक आहेत.
5) वेदांत फॅशन्स ः या कंपनीचा शेअर वर्षातील 1512 रुपयांवरून 596 रुपयांवर आला आहे. ही घसरण अंदाजे 62 टक्केआहे. ग्राहक खर्चातील अस्थिरता आणि रिटेल क्षेत्रातील बदल यामागे आहेत.
6) ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ः इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ही कंपनी मोठ्या अपेक्षांनी पुढे आली होती; परंतु तिचा शेअर 57 टक्क्यांची घसरण दर्शवत 103 रुपयांवरून 36 रुपयांवर आला आहे. उत्पादन, वितरण आणि तंत्रज्ञानातील आव्हाने या घसरणीचे कारण ठरतात.
7) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर : या कंपनीचा शेअर 423 रुपयांवरून 154 रुपयांवर आला असून, सुमारे 64 टक्क्यांची घसरण नोंदली आहे. कर्जाचा भार, प्रकल्प अडथळे आणि व्यवसायातील अनिश्चितता याचा परिणाम स्पष्टक दिसतो.
गुंतवणूकदारांसाठी तीन महत्त्वाचे धडे
निर्देशांक वाढतो म्हणून तुमचे पोर्टफोलियो सुरक्षित असेलच असे नाकही. निर्देशांक काही कंपन्यांवर आधारित असतात. परंतु, वैयक्तिक पोर्टफोलियोतील प्रत्येक शेअर वेगळे वागतो. त्यामुळे कंपनीचे कर्ज, नफा, उद्योगाचा चक्र, व्यवस्थापनाची गुणवत्ता या गोष्टींची तपासणी न करता फक्तभाव पाहून गुंतवणूक केल्यास धोका वाढतो. म्हणून नियमित पुनरावलोकन आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सखोल तपासणी आणि जोखमीचे मोजमाप अनिवार्य आहे. वाढत्या बाजारातही योग्य शेअर निवडणे, विविधीकरण करणे आणि पोर्टफोलियोला सतत तपासणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.

