Insurance Premium | विम्याचा हप्ता थकलाय?

Insurance Premium
Insurance Premium | विम्याचा हप्ता थकलाय?
Published on
Updated on

मानसी जोशी

धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा महत्त्वाच्या कामांचा विसर पडतो. व्यावसायिक दौरे, कौटुंबिक आणीबाणी किंवा कामाचा अतिरिक्तताण यामुळे विम्याचा हप्ता (प्रीमियम) भरायचा राहून जाणे, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. मात्र, अशा वेळी तुमची पॉलिसी लगेच बंद पडते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. भारतातील बहुतांश विमा योजनांमध्ये ‘ग्रेस पीरियड’ म्हणजेच सवलतीचा कालावधी दिलेला असतो, जो ग्राहकांसाठी एक सुरक्षा कवच ठरतो.

काय असतो हा ग्रेस पीरियड?

सोप्या भाषेत सांगायचे तर, विम्याचा हप्ता भरण्याची मूळ मुदत संपल्यानंतर कंपनीकडून जे अतिरिक्त 15 ते 30 दिवस दिले जातात, त्याला ‘ग्रेस पीरियड’ म्हणतात. या काळात प्रीमियम भरलेला नसला तरीही तुमचे विमा संरक्षण सुरूच राहते. एखादी अघोषित आपत्ती ओढवल्यास हा कालावधी अक्षरशः जीवदान देणारा ठरू शकतो.

विविध विमा प्रकारांमधील सवलत

विम्याच्या प्रकारानुसार हा कालावधी बदलत असतो. जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोन्ही क्षेत्रांत साधारणपणे 15 ते 30 दिवसांची सवलत मिळते आणि या काळात विमा संरक्षण पूर्णतः सक्रिय असते. वाहन विम्याच्या बाबतीत मात्र हा कालावधी शून्य ते 30 दिवसांपर्यंत असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, वाहन विम्यामध्ये सवलतीच्या काळात विमा संरक्षण सक्रिय राहीलच याची खात्री देता येत नाही. कारण, ते संबंधित विमा कंपनीच्या अटींवर अवलंबून असते.

पॉलिसी लॅप्स होणे म्हणजे नक्की काय?

जर तुम्ही या सवलतीच्या कालावधीतही हप्ता भरला नाही, तर तुमची पॉलिसी ‘लॅप्स’ होते म्हणजेच ती रद्द केली जाते. पॉलिसी एकदा रद्द झाली की, तोपर्यंत जमा केलेले सर्व लाभ आणि विमा संरक्षण संपुष्टात येते. रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करणे ही एक जटिल प्रक्रिया असू शकते. यासाठी विमा कंपन्यांकडून दंड आकारला जाऊ शकतो, पुन्हा वैद्यकीय चाचण्या घेण्याची सक्ती केली जाऊ शकते किंवा काही प्रसंगी तुमचा नूतनीकरणाचा प्रस्ताव नाकारला जाण्याचीही शक्यता असते.

एका उदाहरणावरून हे समजून घेऊया. समजा, श्रीयुत गुप्ता यांच्या मुदत विम्याचा (टर्म पॉलिसी) हप्ता 10 जून रोजी भरायचा होता. कामाच्या व्यापात ते हा दिवस विसरले आणि त्यांना 25 जून रोजी याची आठवण झाली. त्यांच्या पॉलिसीमध्ये 30 दिवसांचा सवलतीचा कालावधी असल्यामुळे 25 जूनला हप्ता भरूनही त्यांची पॉलिसी सुरक्षित राहिली. मात्र, त्यांनी हा हप्ता 10 जुलैपर्यंत भरला नसता, तर त्यांची पॉलिसी कायमची बंद पडली असती. सवलतीचा कालावधी हा कठीण प्रसंगी मदतीसाठी असतो, त्याचा वारंवार वापर करणे टाळले पाहिजे. विम्याचा हप्ता वेळेवर भरणे हाच आर्थिक स्थैर्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. नियमांची योग्य जाण ठेवून आणि पूर्वनियोजन करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवू शकता आणि नाहक मानसिक ताण टाळू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news