

* गतसप्ताहात निफ्टीमध्ये एकूण 373 अंकांची वाढ नोंदवली गेली असून, निर्देशांक 25,114 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये 1.51% टक्क्यांची वाढ झाली. तसेच सेन्सेक्समध्ये एकूण 1193.94 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 81,904 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1.48% टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. साप्ताहिक बाजारात सर्वाधिक वाढ झालेल्या समभागांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (7.7%), बजाज फायनान्स लि. (7.0%), श्रीराम फायनान्स लि. (6.8%), इन्फोसिस लि. (5.6%) आणि अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (5.4%) या समभागांचा समावेश झाला. तर सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये ट्रेंट लि. (-7.2%), टायटन कंपनी लि. (-2.6%), एटरनल लि. (-2.4%), इंडसइंड बँक लि. (-2.2%) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (-2.0%) या समभागांचा समावेश झाला.
* ऑगस्ट 2025 मध्ये देशातील किरकोळ महागाई दर 2.07 टक्क्यांवर गेला असून, मागील 9 महिन्यांनंतर महागाईत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात हा दर 1.61 टक्के होता. मात्र, अन्नधान्य महागाई सलग तीन महिने ऋण (निगेटिव्ह झोनमध्ये) असून, ऑगस्टमध्ये ती -0.69 टक्के होती. कांदा, बटाटा, डाळी, मसाले व चिकन यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, तेल व तांदळाचे दर मात्र वाढले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या ठरवलेल्या मर्यादेत महागाई असल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्तकेली आहे.
* इन्फोसिस कंपनीने आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर बायबॅक (समभाग पुनः खरेदी) जाहीर केला असून, यासाठी कंपनीने रु. 18,000 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी अशा प्रकारच्या बायबॅकचा आधार घेत आहेत. याआधी विप्रोने रु.12,000 कोटींचा आणि टीसीएसने रु.17,000 कोटींचा बायबॅक पूर्ण केला होता. इन्फोसिसच्या निर्णयामुळे इतर कंपन्याही असेच पाऊल उचलू शकतात, अशी शक्यता विश्लेषकांनी व्यक्तकेली आहे. टीसीएससुद्धा लवकरच रु. 20,000 कोटींचा बायबॅक करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याआधीच्या बायबॅकनी कंपन्यांच्या शेअरच्या किमतींना आधार दिला असून, सध्याच्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचा निर्णय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
* ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडांतून येणार्या निधीचा प्रवाह जुलैच्या रु.42,702 कोटींपासून 22% नी घटून रु.33,430 कोटींवर आला आहे. एसआयपी गुंतवणूकही थोडीशी कमी होऊन रु.28,265 कोटींवर पोहोचली आहे. ही घट जरी फारशी मोठी नसली तरी गुंतवणुकीचा वेग मंदावल्याचे संकेत आहेत. याशिवाय, नवीन डिमॅट खाती उघडण्याचे प्रमाण मागील पाच वर्षांतील सर्वात कमी स्तरावर आले आहे, जे गुंतवणूकदारांच्या उत्साहात घट झाल्याचे दर्शवते. तरीही स्मॉल-कॅप आणि थीमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूक स्थिर राहिल्याने दीर्घकालीन विश्वास काही प्रमाणात टिकून आहे.
* ट्रम्प सरकारच्या बेभरवशाच्या आयात धोरणाची झळ खुद्द अमेरिकेलाच बसत असल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील ग्राहक महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) 2.9 टक्क्यांवर गेला असून, हा दर जानेवारीनंतरचा सर्वात जास्त आहे. जुलैमध्ये हा दर 2.7 टक्के होता. विशेषतः वाहन, कपडे आणि संबंधीत किमती वाढल्याने महागाईचा दर चढा राहिला. यामुळे फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कपात करणार नाही, असे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी दरही वाढून 4.3 टक्क्यांवर पोहोचला असून, हा मागील चार वर्षांतील उच्चांक आहे. रोजगारनिर्मितीचा वेग मंदावला असून, फक्तसुमारे 22,000 नवीन नोकर्या निर्माण झाल्या. वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक स्वरूपात होऊ शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.
* भारतातील रुपयाने डॉलरच्या तुलनेत इतिहासातला सर्वात नीचांक गाठला; गुरुवारी एक अमेरिकन डॉलरचे मूल्य रुपये 88.47 इतके झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीच्या सुमारे रु. 85.95 प्रति डॉलरच्या दरापासून रुपये सुमारे 3 टक्क्यांनी घसरण होऊन रुपया डॉलरच्या तुलनेत 88 च्या पुढे गेला आहे. चलन कमजोर पडण्याची काही मुख्य कारणे म्हणजे अमेरिकेने भारतावर नवीन व्यापार शुल्क लादले आहेत, परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून निधी बाहेर काढला आहे, आणि आयातीच्या मालखर्चासाठी वाढलेली डॉलरची मागणी. भारतीय रिझर्व्ह बँकेने अद्याप बाजारात हस्तक्षेप केला नाही, असे तज्ज्ञ म्हणतात आणि अर्थ विश्लेषकांचे असे प्रतिपादन आहे की, रुपया चलन थोडं थोडं कमकुवत होऊ देऊन भारताच्या निर्यात क्षेत्राला मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे अमेरिकेत पुन्हा एकदा महागाईने डोके वरती काढल्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आता व्याजदर कपात करण्याची शक्यता कमी आहे. यामुळे सोन्याचे भावदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले आणि रुपया कमकुवत होण्यात भर पडली. भारतातदेखील सोन्याच्या दराने प्रतितोळा 1 लाख 13 हजारांचा टप्पा पार केला.
* मोबाईल हप्त्यावर घेणारे आणि वेळेत हप्ते न भरणार्यांनी सावधान. कारण, रिझर्व्ह बँक अशा प्रकरणांमध्ये थकबाकीदाराचा फोन दूरध्वनीवरून लॉक करण्याची परवानगी कर्ज देणार्या कंपन्यांना देण्याचा विचार करत आहे. ही योजना मुख्यतः लहान रकमेच्या डिजिटल कर्जांसाठी असणार आहे, जिथे परतफेड न झाल्यास थेट फोन वापरण्याचा अधिकार तात्पुरता बंद केला जाईल; मात्र ही प्रक्रिया ग्राहकाच्या स्पष्ट संमतीनंतरच होणार असून, फोन लॉक करताना त्यामधील वैयक्तिक डेटा किंवा माहिती कर्जदार कंपनीकडून वापरता येणार नाही. रिझर्व्ह बँक फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये यासाठी काही सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करत असतानाच कर्ज परतफेडीचा शिस्तबद्ध मार्ग या नव्या प्रणालीमधून निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या हा नियम अंतिम झालेला नसून, तो सल्लामसलतीच्या टप्प्यात आहे.
* लॅरी एलिसन या ओरॅकल कंपनीच्या संस्थापकाने अल्प काळासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा पटकावला, एलॉन मस्कला मागे टाकत. लॅरी यांची संपत्ती एका दिवसात सुमारे 101 अब्ज डॉलरनी (सुमारे नऊ लाख कोटी रुपयांनी) वाढली, ज्यामुळे ती 393 डॉलर अब्जपर्यंत पोहोचली आहे. हे बदल ओरॅकल कंपनीच्या शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे झाले आहेत. विशेषतः, एआय क्लाऊड सेवांच्या करारांमुळे या कंपनीच्या समभागांचे भाव सुमारे 41 टक्क्यांपर्यंत वाढले; पण दिवसभरात नंतर शेअर्स किंचित खाली आल्यामुळे एलिसनचा हा आघाडीचा क्रमांक टिकून राहिला नाही, शेअर बंद होताना तो पुन्हा दुसर्या स्थानावर गेला.
* भारतातील लोकप्रिय स्टार्टअप ‘अर्बन कंपनी’ चा आयपीओ शुक्रवारी 104 पट सबस्क्राईब झाला, जो 2025 मधील सर्वाधिक सबस्क्राईब झालेला आयपीओ ठरला आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडून 140.2 पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 74.04 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून 41 पट सबस्क्रिप्शन मिळाले. या आयपीओद्वारे कंपनीने 892 कोटी रुपये उभे केले आहेत, ज्यात अँकर गुंतवणूकदारांकडून मिळालेला निधी समाविष्टआहे. मिळालेल्या निधीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऑफिस स्पेस आणि इतर व्यवसायाच्या गरजांसाठी केला जाणार आहे. देश-विदेशातील मोठ्या गुंतवणूकदारांचा यावर चांगला प्रतिसाद मिळाला असून, नोर्गेस बँक, फिडेलिटी नोमुरा आणि अमुंडी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.
* भारताचे विदेश चलन गंगाजळी 5 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात डॉलर 4.03 अब्ज वाढून 698.26 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. ही वाढ मुख्यतः सोन्याच्या राखीव साठ्यात झालेल्या डॉलर 3.53 अब्जच्या वाढीमुळे झाली आहे. सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे आरबीआयने आपली सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे, ज्यामुळे एकूण गंगाजळीमध्ये सुधारणा झाली आहे. तथापि, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या करामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव आला आहे, ज्यामुळे डॉलर 11.7 अब्जपर्यंत परकीय गुंतवणूक बाहेर गेली आहे. विश्लेषकांच्या मते, आयातदारांच्या डॉलरच्या मागणीमुळे आणि परकीय गुंतवणुकीच्या कमी येण्यामुळे रुपयाचे मूल्य दबावाखाली राहण्याची शक्यता आहे.