

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे २०१५ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतके होते. २०२५ पर्यंत ४.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. भारताच्या १०५% वाढीचा दर दर्शवतो, जो अमेरिका (६६%) आणि चीन (७६%) सारख्या जागतिक दिग्गजांपेक्षाही वेगवान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सक्रिय आर्थिक धोरणांमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे, असा दावा भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'आयएमएफ'चा अहवाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पाेस्ट करत केला आहे. (GDP Growth)
"स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही मागील सरकारने केलेली ही कामगिरी अतुलनीय आहे. मोदी सरकारच्या धाडसी सुधारणा आणि व्यवसाय सुलभतेवर लक्ष केंद्रित केल्याने भारत जागतिक महासत्तांपेक्षा पुढे जात आहे," असे अमित मालवीय यांनी त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये नमूद केले आहे.
भारताच्या विकास दरात झालेल्या आश्चर्यकारक वाढीमागे अनेक घटक जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. याव्यतिरिक्त, एक मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम आणि आयटी क्षेत्राच्या सतत प्रगतीमुळे आर्थिक वाढीला चालना मिळाली आहे. भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करत आहे. अमेरिकेचा जीडीपी $३०.३ ट्रिलियन आणि चीनचा $१९.५ ट्रिलियन पर्यंत पोहोचत असताना, भारताचा विकास दर इतर देशांपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे.