

पूर्वी फक्त मोठे व्यापारी किंवा धनाढ्य लोकांच्या व्यवहारांवर आयकर विभाग लक्ष ठेवत असे. मात्र, आता स्टेटमेंट ऑफ फिनान्शियल ट्रॅन्ड्रॉक्शन अंतर्गत सामान्य लोकांचे सेव्हिंग किंवा सॅलरी अकाऊंटही आयकर विभागाकडून तपासले जातात. म्हणजेच, तुमच्या दैनंदिन खात्यांवरील काही विशिष्ट व्यवहारांवरही इन्कम टॅक्स विभाग थेट नजर ठेवतो. बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड कंपन्या आणि मालमत्ता नोंदणी कार्यालये दरवर्षी याविषयीची माहिती आयकर विभागाला पाठवतात. यामागचा उद्देश कर चोरी थांबवणे आणि बेकायदेशीर व्यवहार शोधणे हा आहे.
तुम्ही एका वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेत जमा केली असेल, मग ती एकाच वेळी असो वा अनेक वेळा; तर बँक ती माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाला देते. जर तुम्ही ही रक्कम आपल्या आयटीआरमध्ये दाखवली नसेल, तर नोटीस मिळण्याची शक्यता असते.
तुमची अधिकृत कमाई कमी दाखवलेली असेल, पण तुम्ही दर महिन्याला मोठ्या रकमांचे क्रेडिट कार्ड बिल भरत असाल, तर विभागाला शंका येऊ शकते की तुमचे प्रत्यक्ष उत्पन्न दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
तुम्ही वारंवार मोठ्या रकमांची रोकड जमा करत असाल किंवा काढत असाल आणि त्यामागे स्पष्ट कारण नसेल, तर तो व्यवहार संशयास्पद मानला जाऊ शकतो. विशेषतः जेव्हा रक्कम लाखोंमध्ये असेल तेव्हा त्याबाबत अधिक शंका घेतली जाऊ शकते. तीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता विकत घेणे किंवा विकणे ही माहिती आपोआप इन्कम टॅक्स विभागापर्यंत पोहोचते. अशा व्यवहारांवर विभाग विशेष लक्ष ठेवतो.
तुम्ही परदेश प्रवास, शिक्षण किंवा फॉरेक्स कार्डवर १० लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल, तर ही माहिती एसएफटी रिपोर्टमध्ये नोंदवली जाते. जर एखादे जुने, बंद पडलेले किंवा दीर्घकाळ वापरात नसलेले खाते अचानक मोठ्या रकमेसह तुमच्याकडे अनेक सेव्हिंग अकाऊंट असतील आणि तुम्ही एखाद्या खात्यातील व्याज किंवा ट्रान्झंक्शनची माहिती लपवली असेल, तर पॅन आणि आधार लिंकिंगच्या मदतीने विभाग ती सहज पकडू शकतो.
तुमच्या खात्यात मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तीकडून मोठी रक्कम आली आणि तुमच्याकडे तिचा कोणताही पुरावा नसेल, तर ती रक्कम अघोषित उत्पन्न म्हणून गणली जाऊ शकते.
तुम्ही आपल्या खात्यातून तिसऱ्या व्यक्तीसाठी व्यवहार करत असाल, तर त्याला 'बेनामी व्यवहार' किंवा 'मनी लॉन्डरिंग' समजले जाऊ शकते. यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. हे लक्षात घेता सेव्हिंग अकाऊंटचा वापर करताना प्रत्येक व्यक्तीने पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
वारंवार मोठ्या रकमांचे व्यवहार करताना योग्य कागदपत्रे आणि व्यवहाराचे कारण स्पष्ट ठेवले पाहिजे. अन्यथा, अगदी सामान्य व्यवहारावरूनसुद्धा इन्कम टॅक्स विभाग तुमच्याकडे नोटीस पाठवू शकतो. त्यामुळे आरबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाचे नियम जाणून, नियमानुसार व्यवहार करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.