म्युच्युअल फंडामध्ये असेट अलोकेशनचे महत्त्व

Published on
Updated on

देवेंद्र किशोर नाईक

वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मालमत्ता वाटपाचे (असेट अलोकेशनचे) अनन्यसाधारण  महत्त्व आहे. आज आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक लोकप्रिय साधन आहे. सखोल अभ्यास करून विविध प्रकारचे म्युच्युअल फंड एकत्र केले असता एक चांगला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार होऊ शकतो. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपण विविध प्रकारे पैशाची गुंतवणूक करू शकतो.  उदा : इक्विटी (स्टॉक), कर्ज / Debt  (बॉन्ड्स), रोख आणि रोख समकक्ष (ट्रेझरी बिले), कमोडिटी / मौल्यवान धातू  (सोने) इत्यादी म्युच्युअल फंड प्रचलित आहेत. आपण ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये रक्कम गुंतवणे, तसेच कुठल्या गुंतवणूक प्रकारात किती व कशी रक्कम गुंतवणे याचे तंत्र म्हणजे असेट अलोकेशन आहे.

असेट अलोकेशनची कार्यपद्धती :

उदाहरणाद्वारे असेट अलोकेशनची कार्यपद्धती समजून घेऊया. गृहीत धरा की एका गुंतवणूकदाराने त्याचे उद्दिष्ट व जोखीम क्षमतेनुसार इक्विटी म्युच्युअल फंडात 70 टक्के, कर्ज (debt) फंडात 15 टक्के आणि सोन्याच्या (Gold) फंडात 15 टक्के रक्कम गुंतवणूक केली आहे. एक वर्षानंतर जर शेअर बाजारामध्ये वाढ झाली तर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या वाटपामध्ये वाढ होणे अपेक्षितच आहे. आता ह्या वाढीमुळे उदारणार्थ इक्विटी म्युच्युअल फंडाचे  वाटप 90 टक्क्यांवर गेले असेल तर ते  पुन्हा 70 टक्क्याच्या मूळ स्तरावर आणले पाहिजे. हे आवश्यक आहे. अन्यथा जर इक्विटी (शेअर बाजार) घसरले तर त्याचा वाईट परिणाम संपूर्ण पोर्टफोलिओवर जास्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे इक्विटीचे वाटप जर  60% इतके कमी झाले, तर debt (कर्ज) फंडाचा वापर करून  ते त्याच्या मूळ वाटपावर म्हणजेच  70% वर न्यावे लागेल.

असेट अलोकेशनचे  फायदे :

असेट अलोकेशनचा  मुख्य  फायदा  म्हणजे इष्टतम विविधीकरण (ऑप्टिमम डायव्हर्सिफिकेशन). कृपया लक्षात घ्या की मालमत्ता वाटप म्हणजेच असेट अलोकेशन हे कुठल्या परताव्याची हमी देत नाही. वेळोवेळी अधिक चांगल्या जोखीम-समायोजित (रिस्क अ‍ॅडजस्टेड) परतावा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 

भिन्न कालावधीत भिन्न असेट/गुंतवणूक चांगली कार्य करतात. आपली आर्थिक उद्दिष्टे, कालावधी आणि जोखीम यावर अवलंबून असलेल्या म्युच्युअल फंडाच्या  पोर्टफोलिओची स्थिरता सुनिश्चित करण्याचा मार्ग म्हणजे असेट अलोकेशन करणे. उदाहरणार्थ, 2007 ते  2009 मधील मंदीच्या परिस्थितीत बर्‍याच  देशातील इक्विटी (शेअर) बाजारात वाईट कामगिरी झाली, परंतु सोन्याच्या किंमती वाढल्या. अशा प्रकारे, ज्या गुंतवणूकदाराने फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक केली त्याच्यापेक्षा जास्त परतावा हा सोने आणि इक्विटी या दोन्ही प्रकारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना झाला. बाजारात कधी कुठली असेट/ गुंतवणूक काम करेल हे सांगणे कोणालाही अवघड आहे. उदाहरणार्थ, इक्विटी वर असू शकतात, तर कर्ज (debt) खाली आणि उलट असू शकते. तथापि, जर तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या असेटमध्ये पसरली असेल तर तुम्हाला कमी फटका बसेल आणि उत्तम जोखीम-समायोजित (रिस्क अ‍ॅडजस्टेड) परतावा मिळेल. यशस्वी गुंतवणूक व्यवस्थापक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असे सूचित करतात की म्युच्युअल फंडातील पोर्टफोलिओचे यश हे एखाद्या विशिष्ट स्कीम किंवा प्रॉडक्ट निवडणुकीपेक्षा असेट अलोकेशन आणि गुंतवणूक धोरण ह्यावर जास्त आधारित आहे.

Don't put all eggs in one basket  – सर्वच अंडी एकाच टोपलीत ठेवू नये, हे वाक्य गुंतवणूक जगतात खूप प्रख्यात आहे.  म्हणजे एकाच गुंतवणूक प्रकारात संपूर्ण गुंतवणूक करू नये.

जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक लक्ष्ये कालांतराने बदलत असतात, म्हणून असेट अलोकेशन, नवीन आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता ह्यांचा समन्वय साधणे आणि किमान 6-8 महिन्यांत त्याची समीक्षा (review) करणे महत्त्वाचे आहे.

असेट अलोकेशनचे प्रकार : 

असेट अलोकेशनचे तीन प्रकार आहेत – टॅक्टिकल असेट अलोकेशन, स्ट्रॅटेजिक असेट अलोकेशन आणि डायनॅमिक असेट अलोकेशन. 

1. टॅक्टिकल असेट अलोकेशन हे बाजाराच्या संभाव्य वर्तनावर आधारित आहे.  उदाहरणार्थ, विशिष्ट  उद्योग आणि शेअर बाजाराच्या सकारात्मक अपेक्षांमुळे इक्विटीत किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात  जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे म्हणजे टॅक्टिकल असेट अलोकेशन.  

2. स्ट्रॅटेजिक (धोरणात्मक) असेट अलोकेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक उद्दिष्टांना जोडलेले वाटप. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोर्टफोलिओकडून आवश्यक परतावा विचारात घेण्यात येतो. तसेच जोखीम सहनशीलता, जोखीम क्षमता, वय आणि कालावधी इत्यादी गोष्टी ध्यानात ठेवल्या जातात.  

3. डायनॅमिक असेट अलोकेशन हे  विविध असेट वर्गामध्ये अलोकेशन करण्यासाठी पूर्व-नियोजित नमुना (प्रतिकृती) वापरते. डायनॅमिक असेट अलोकेशन करताना म्युच्युअल फंड पोर्टफोलिओची कामगिरी आणि विशिष्ट असेट वर्गाचे मूल्यांकन यासारख्या घटकांना अधिक महत्त्व दिले जाते.

असेट अलोकेशन ही एक कला तर आहेच, पण ते एक प्रकारचे विज्ञानपण आहे. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाद्वारे असेट अलोकेशन भिन्न असू शकते. असेट अलोकेशन हा वैयक्तिकृत विषय आहे. त्यात वय, वेळ, जोखीम घेण्याची क्षमता, कमी कालावधीत लागणारी रोकड रक्कम, आर्थिक गरजा, गुंतवणुकीचा अनुभव इत्यादी विविध घटकांचा समावेश आहे.   

दी रूपी ट्री

सेबी नोंदणीकृत

गुंतवणूक सल्लागार 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news