यंदाच्या वर्षी 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विवरण भरणार्या मंडळींची (ITR Filing 2024) संख्या 7.28 कोटींच्या वर पोहोचली असून, हा आकडा विक्रमी मानला जात आहे. तरीही असंख्य करदाते, नोकरदार, व्यापारी वर्ग आयटीआर भरण्यापासून वंचित राहतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने आयटीआर दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत प्राप्तिकर रिटर्न भरू शकला नसाल, तर आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी कर सल्लागाराशी चर्चा करून पुढची प्रक्रिया करू शकता.
प्राप्तिकर खात्याच्या जबर दंडापासून वाचण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी वेळेत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे गरजेचे आहे. अर्थात, 31 जुलै ही तारीख चुकली असेल तर घाबरू नका. यात सुधारणा करण्यासाठी आपल्याकडे आणखी काही पर्याय आहेत. आपण ठरलेल्या वेळेत किंवा त्याच्या अगोदर आयटीआर भरण्यास अपयशी ठरत असाल तर काय करावे?
प्राप्तिकर विवरण भरण्याची तारीख चुकली असेल, तर विलंबासह रिटर्न फाईल दाखल करू शकता. प्राप्तिकर कायदा कलम 139 (4) नुसार निश्चित केलेल्या तारखेच्या आत आयटीआर भरण्याचा पर्याय आहे. मात्र, विलंबासह रिटर्न दाखल करताना काही गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे. अशा वेळी विलंब शुल्क आणि थकबाकी रकमेवर व्याज आकारणी होऊ शकते.
शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर भरू शकलो नाही, तर पेनल्टी आणि व्याज शुल्क आकारणी होऊ शकते. विलंबासह फाईल दाखल करताना आकारण्यात येणारे शुल्क हे एकूण उत्पन्न आणि विलंबाचे दिवस यावर आधारित असते. याशिवाय आपल्यावर कर थकबाकी असेल आणि ते भरली गेली नसेल, तर थकबाकीवर व्याज आकारणी होऊ शकते.
वेळेच्या अगोदर आयटीआर दाखल केला असेल; मात्र त्यात काही चुका राहिल्या असतील, तर दुरुस्तीसह रिटर्न भरण्याचा पर्याय निवडू शकता. हा पर्याय चुका दुरुस्ती करणे किंवा अर्धवट माहिती भरली असेल, तर त्याचा उल्लेख करण्याची परवानगी दिली जाते. अर्थात, मूळ फायलिंगच्या तारखेपासून निश्चित केलेल्या वेळेच्या आतच सुधारित रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे.
आपल्याकडून आयटीआर वेळेत दाखल न करण्याचे सयुक्तिक कारण असेल, जसे की, आरोग्य आणीबाणी किंवा अन्य अपरिहार्यता स्थितीमुळे उशीर होत असेल तर अर्ज प्राप्तिकर खात्याकडे प्रत्यक्षपणे किंवा ऑनलाईनवर करू शकता. यानुसार मूल्यांकन अधिकारी ते कारण मान्य करायचे की नाही, हे ठरवतो आणि कारणात तथ्य वाटत असेल तर तो पेनल्टी माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
प्राप्तिकर विवरण भरताना चुका होऊ नयेत यासाठी कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकौटंस्कडून सल्ला घेणे योग्य ठरेल. या प्रक्रियेच्या काळात तो आपल्याला मार्गदर्शन करू शकेल. कोणत्याही कराचे आकलन करण्यासाठी कॅलक्युलेशन करताना तो मदत करेल आणि यानुसार तो रिटर्न भरण्यासाठी मदत करू शकतो. अर्थात, आयटीआर फाईल करण्याची तारीख चुकणे हे मानसिक तणाव निर्माण करणारे राहू शकते. मात्र, त्याबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. विलंबासह का होईना, सुधारित का होईना आणि दंडासह का असेना, तत्काळ आयटीआर भरण्याचा प्रयत्न करा. नोकरदार असाल, तर कंपनीकडून फॉर्म-16 मिळाल्यानंतर वेळ न दवडता आयटीआर भरण्याबाबत आग्रही राहावे. अनावश्यक कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी वेळेत आयटीआर भरण्याबाबत दक्ष राहावे. आयटीआर भरण्याची प्रक्रिया खूपच सुलभ असून, भविष्यातील चुका टाळण्यासाठी करसल्लागाराची मदत घ्या.