

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी आजही बहुतेकांना एकतर माहिती नसते किंवा त्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेविषयी ते अनभिज्ञ असतात. याचा परिणाम म्हणजे या योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागते. आयुष्मान भारत योजनेबाबतही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप नोंदणीच न केल्याचे दिसून आले आहे. ही नोंदणी कशी करावी, याविषयी...
पीएमजेएवाय अर्थात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना समाजातील असुरक्षित घटकांसाठी आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 5 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देते. यामध्ये उत्पन्न मर्यादेची कसलीही अट नाही. या योजनेत नावनोंदणी कशी केली जाते, याविषयी अनेकांना माहिती नसते. त्याविषयी...
ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अधिकृत वेबसाईटवरून आयुष्मान भारत अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर पुढे जाण्यासाठी आपल्या सोयीची भाषा निवडावी.
यानंतर लाभार्थी म्हणून लॉगिन करा. या पर्यायावर ‘कॅप्चा’ आणि मोबाईल नंबर टाकून क्लिक करणे आवश्यक आहे. मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) टाका. लॉग इन केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या नावनोंदणीसाठी होम स्क्रीनच्या तळाशी जा.
तेथे आधार क्रमांक एंटर करा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी वापरून त्याचे प्रमाणीकरण करा. त्यानंतर निवासस्थान प्रविष्ट करा. ‘कॅप्चा’ प्रविष्ट केल्यानंतर एक शोध पर्याय सक्रिय केला जातो, ज्यावर क्लिक केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक योजनेत आपले नाव आधीच नोंदणीकृत आहे की नाही, हे तपासले जाते. आपले नाव नसल्यास ज्येष्ठ नागरिकाने नव्याने नाव नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. इथे ओटीपी पडताळणीची आणखी एक फेरी पार पडेल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पडताळणीसाठी त्यांचा लाईव्ह फोटो क्लिक करण्याची सूचना दिसेल.
हा फोटो काढून झाल्यानंतर ओटीपी पडताळणीसाठी मोबाईल नंबर, शहर, राज्य, पत्ता, प्रभाग तपशील, पिन कोड इत्यादी तपशील प्रविष्ट करणे आणि सबमिट करणे आवश्यक आहे.
एकदा सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर वापरकर्ता मंजुरीसाठी अर्ज सबमिट करू शकतो. एकदा मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड जारी केले जाते. हे कार्ड जपून ठेवणे आवश्यक आहे. कारण, या कार्डच्या आधारे ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.