अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर
सध्या जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशाची आर्थिक प्रगती जोमाने चालू असताना, आपली स्वत:चीही आर्थिक प्रगती तितक्याच वेगाने होत आहे का, याचेही अवलोकन करण्याची गरज आहे.
देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन नुकताच साजरा झाला. परकीय गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाला आहे; पण आपण सततच्या पैशासाठी कराव्या लागणार्या कामाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो आहोत का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला काम हे करावेच लागते.अशा दररोजच्या कामाच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळविण्यासाठी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळविले पाहिजे.
दररोज उठून पैशासाठी काम न करता पैशाने आपल्यासाठी काम केले पाहिजे. रोजच्या गरजासाठी लागणारा पैसा हा आपल्या खात्यामध्ये काम न करता आला पाहिजे. मनसोक्तआणि स्वच्छंदी जीवन जगता आले पाहिजे. असं स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती आपण प्रथम भक्कम केली पाहिजे. यासाठी काम करून मिळविलेल्या पैशातून जास्तीत जास्त पैसा योग्यवेळी, योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे, तरच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याकडे जाऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे स्वातंत्र्य फंड रोख स्वरूपात (बचत ठेव म्युच्युअल फंड शेअर्स इत्यादी) किती शिल्लक आहे? दरमहा खर्च किती आहे? यावरून तुम्ही किती दिवस आर्थिकद़ृष्ट्या स्वातंत्र्यात राहू शकता? याचे उत्तर मिळते. तसेच तुमच्याकडे किती पैसा शिल्लक आहे? तो किती दिवसांसाठी पुरेल? तितके दिवस तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते.
समजा, तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील आणि दरमहा 40,000/ रुपये खर्च असेल, तर दिवसाला 1,335 रु. दर दिवसाला सरासरी खर्च येतो. यावरून 10 लाख रु.तून प्रतिदिनाचा खर्च 1,335 रु. भागाकार केला असता, तुम्हाला 800 दिवसांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. किंवा महिना 40 हजार खर्च गृहीत धरला, तर 25 महिने इतकेच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. मग तुमच्या कडे किती पैसा आहे आणि किती दिवस तुम्ही आर्थिक स्वातंत्र्यामध्ये राहू शकता, हे आराखडा मांडून पाहा. जीवनात आर्थिक स्वातंत्र्याचा तुम्ही जेव्हा विचार करता, तेव्हा त्यात स्वातंत्र्याचा काळ सुरू झाला की, शेवटच्याश्वासापर्यंत आर्थिक स्वातंत्र्यात मनसोक्तजगता आले पाहिजे, आणि असे नियोजन केले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य सुरू करणार तेथून पुढे आयुष्यभर पुरेल इतक्या पैशाची जोडणी केली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.
करिअरच्या प्रारंभापासून दोन प्रकारची लोकं असतात. 1) खर्चास प्राधान्य देणारे आणि, 2) गुंतवणुकीस प्राधान्य देणारे. आवश्यक गोष्टींवर पैसा खर्च करून, अनावश्यक खर्च टाळून गुंतवणुकीस प्राधान्य देऊन भांडवली बाजारात गुंतवणूक करत असाल, तरच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य सहजपणे मिळविता येते, अन्यथा कसलीही काटकसर नाही. मौजमजा करणारे 74% लोक आजही मरेपर्यंत इच्छा नसतानाही काम करताना आपल्याला दिसतात. अशा लोकांना दररोज वेगवेगळ्या कामावर जावेच लागते. त्यांना जवळ पैसा नाही, म्हणून कुटुंबात किंमत नाही अन् समाजात मान-सन्मान नाही. अशी त्यांची दयनीय अवस्था होते.
परिपूर्ण आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करताना, खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.
तुमचे सध्याचे वय किती आहे?
जोडीदाराचे वय किती आहे ?
कोणत्या वर्षापासून आर्थिक स्वातंत्र्य घेणार ?
सध्याचा खर्च किती आहे?
महागाई किती टक्क्यांनी वाढते?
गुंतवणूक किती टक्क्यांनी वाढते?
अपेक्षित आयुष्यमान किती वर्षे?
वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली की, आर्थिक स्वातंत्र्यासाठी मला आर्थिक पाया भक्कम करावा, त्यासाठी किती रकमेची गरज भासते, हे काढता येते. उदाहरणार्थ, अमित यांचे वय 40 आहे. त्यांचा दरमहा 25 हजार रुपये खर्च आहे, आणि वयाच्या 55 वर्षी त्यांना आर्थिक स्वातंत्र्यात मनसोक्तपणे जगायचे आहे.
5 वर्षे पती-पत्नी मधील अंतर आहे. 55 वर्षांपासून 80 वर्षांपर्यंत दरमहा 7% महागाईनुसार लागणारा खर्च खालील प्रमाणे असेल.
50 व्या खर्च 50,000 रु.
55 व्या खर्च 70,000 रु.
60 व्या खर्च 99, 000 रु.
65 व्या खर्च 1,49,000 रु.
70 व्या खर्च 1,96,000 रु.
75 व्या खर्च 2,73,000 रु.
तर आजचा 25000 रुपये खर्च हा वाढणार्या महागाईनुसार सातत्याने वाढत राहणार आहे. हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. वाढत्या खर्चानुसार मिळणारा पैसा वाढत जायला हवा. यासाठी कोणत्या वर्षी किती पैसा लागणार आहे, याचा अंदाज घेतला पाहिजे.
भविष्यात व्याजाचे दर कमी होणार आहेत. त्यानुसार जर स्वातंत्र्य फंडावर 6% व्याजदर गृहीत धरले तर अमित यांना 55 नंतर आर्थिक स्वातंत्र्यात जगण्यासाठी किमान 2.60 कोटी इतका फंड निर्माण करावा लागेल. हे लक्षात घेऊन गुंतवणुकीचे नियोजन केले पाहिजे. वयाच्या कोणत्या वर्षापासून आर्थिक स्वातंत्र्य घ्यायचे, ही गोष्ट ठरविताना एकदा आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की, काही दिवस स्वातंत्र्य घेऊन परत कामाच्या गुलामगिरी मध्ये जायला नको, याचीही काळजी घेतली पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य काळात आपल्याला दर महिन्याला लागणारा पैसा सहजपणे आपल्या खात्यात आला पाहिजे. आणि वाढत्या महागाईच्या प्रमाणात नियमितपणे तो मिळाला पाहिजे. वाढत्या महागाईनुसार खर्चाचा आणि जोडीदाराचाही विचार केला पाहिजे.
आयुष्याच्या शेवटी सकाळी उठून पैशासाठी काम करायला लागू नये, या आर्थिक स्वातंत्र्याचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा आयुष्याच्या संध्याकाळी पैशासाठी मरमर काम करायची वेळ येते. शरीर साथ देत नाही आणि पैसा नसेल, तर कुटुंबातही किंमत राहत नाही. म्हणूनच चांगल्या सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची भेट घेऊन तुमच्या गरजांचा विचार करून आर्थिक सल्ला घ्यायला हवा.