मृदुला फडके
कोरोना संसर्गाच्या काळात सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडचे संकट निर्माण झाले तर खासगी रुग्णालयांनी आयसीयू खर्चावर दररोज चाळीस ते पन्नास हजार रुपये शुल्क आकारले. अशा वेळी नागरिकांसमोर पैशाचे संकट उभे राहिले आणि अनेकांना नातेवाइकांचे दरवाजे ठोठवावे लागले, सोने गहाण ठेवावे लागले. विशेष म्हणजे बहुतांश जणांकडे कौटुंबिक आरोग्य विमा असतानाही नागरिकांना पैशाची तरतूद करावी लागली. कोरोना लाटेत एकाच कुटुंबातील तीन ते चार जण आजारी पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विम्याची मर्यादा कुटुबांतील एक-दोन सदस्यांवर खर्च झाली. उर्वरित सदस्य आजारी पडल्यानंतर त्यांचा खर्च पॉलिसीअंतर्गत करणे शक्य राहिले नाही. नाइलाजाने लोकांना कर्ज काढून उपचार करावे लागले. भविष्यात अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला अगोदर पासूनच सज्ज राहणे गरजेचे आहे. यानुसार विमा योजनेचा पुनर्विचार करायला हवा. कारण संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच देणारा कॅशलेस प्लॅन हा अशा वेळी फारसा उपयुक्त सिद्ध होत नाही.
या संकटातून कसे वाचावे
संपूर्ण कुटुंबाचे ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स घेणार्या लोकांनी आपली विमा योजना अपग्रेड करणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबात अधिक वयोगटातील किती व्यक्ती आहेत, याचे आकलन करावे. साहजिकच आई-वडिलांचे वय अधिक असते. त्यामुळे ग्रुप इन्श्युरन्सला अपग्रेड करताना आई-वडिलांचा समावेश करावा आणि त्याची मर्यादा वाढवावी. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे कवच वाढवणे गरजेचे आहे. कारण वृद्धावस्थेशी निगडित अनेक आजारांवरील उपचारापोटी पैसे खर्च होतात. विम्याची मर्यादा वाढवल्यानंतर त्या योजनेचा विमा कवच लगेच सक्रिय होतो आणि त्यात वेटिंग पीरियडची झंझटही नसते.
कोरोनासाठी वेगळा प्लॅन
विमा कंपन्यांनी कोरोना कवच किंवा कोरोना सुरक्षा नावाने प्लॅन सुरू केला आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसाठी कोरोना संसर्गाशी निगडित विशेष प्लॅन वेगळ्या स्वरूपात घेता येऊ शकतो. कुटुंबातील अन्य सदस्यांच्या सामूहिक विम्याबरोबरच कोरोना संसर्गासाठी वेगळा प्लॅन घेतल्याने हप्त्याची रक्कम निश्चित वाढेल, परंतु कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपचार करताना कोणतिही अडचण येणार नाही. कोरोनाशी निगडित पॉलिसीत होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्च देखील मिळतो. यासाठी विमा कंपनीला काही व्हेरिफिकेशन करावे लागते. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. परंतु कोरोना पॉलिसीत घरी केलेल्या उपचाराचा खर्च दिला जात असल्याने ज्येष्ठांना अडचणी येत नाहीत.
ज्येष्ठांसाठी वेगळी योजना
कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा प्रदान करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. वृद्धावस्थेत अनेक प्रकारचे आजार होतात आणि शेवटी सामूहिक विमा योजनेंतर्गत योग्य उपचार होत नाहीत. या कारणामुळेच सामूहिक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये प्रदान केलेली रक्कम ही पुरेशी ठरत नाही. शेवटी ज्येष्ठ सदस्यांसाठी वेगळी हेल्थ इन्श्युरन्स योजना घेणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या सामूहिक प्लॅनचा हप्ता काही प्रमाणात कमी राहील.
कॅशलेसवर लक्ष
हेल्थ इन्श्युरन्स जर प्रथमच खरेदी करत असाल तर आपली पॉलिसी कॅशलेस असणे गरजेचे आहे. कॅशलेस पॉलिसी असल्याने पॉलिसीधारकाला रुग्णालयात नेताच तातडीने उपचार सुरू होतात. रुग्णालयदेखील बिलाबाबत निश्चिंत राहते आणि उपचारात अडचणी येत नाहीत. कॅशलेस पॉलिसी सुविधा देशातील प्रत्येक शहरातील मोठ्या रुग्णालयात उपलब्ध असतात. कंपन्या आणि रुग्णालय यांच्यात करार असतो आणि त्यानुसार कॅशलेस उपचाराची सोय करण्यात येते. उभयतात करार असल्याने दावे सुरळीतपणे निकाली लागतात आणि त्यामुळे पॉलिसीधारकावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर उपचारात कोणतीही अडचण येत नाही.
हेल्थ प्लॅन सर्वांसाठी गरजेचा
कोरोना महासंकटानंतर हेल्थ इन्श्युरन्स घेणार्यांची संख्या वेगाने वाढली आहे. एका अहवालानुसार गेल्या एक-दीड वर्षात नव्याने पॉलिसी घेणार्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक व्यक्तींनी लवकरात लवकर आरोग्य विमा उतरवणे गरजेचे आहे. कारण वयाची पासष्टी ओलांडलेल्या नागरिकांना हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या या पॉलिसी विकत नाहीत.