हॉलमार्किंग आणि सोने खरेदी | पुढारी

Published on
Updated on

डॉ. विजय ककडे

पारंपरिक सुवर्ण विक्री व्यवसाय हा विश्वास आणि गुणवत्ता यावर असला तरी आपण घेतलेल्या दागिन्यांमध्ये नेमके सोने किती आहे आणि इतर धातूंचे प्रमाण किती आहे याची माहिती ग्राहकाला मिळत नव्हती. इतकेच नव्हे तर एका सोनाराचे दागिने दुसरा सोनार घेत असताना त्यावर तूट आणि शुद्धता याबाबत एकमत होत नसे. त्यामुळे ज्या सोनाराकडून दागिने घेतले त्या सोनाराकडचे पुनर्विक्रीसाठी द्यावे लागत असे. नव्या हॉलमार्किंग व्यवस्थेमुळे गुणवत्तेची हमी मिळणार असून सर्व सोनार यांना हॉलमार्क प्रमाणे सोन्याची शुद्धता स्वीकारावी लागेल. 

भारतीयांचे सुवर्णप्रेम सातत्याने वाढत असून 1982 मध्ये भारत 65 टन सोन्याची आयात करत होता. ही आयात आता आठशे ते बाराशे टनापर्यंत वाढली आहे. लग्न समारंभ हे सोन्याच्या दागिन्यांशिवाय होऊच शकत नाहीत. तसेच सोने हे बचतीचे किंवा आपत्तीच्या काळात मदतीचे साधन म्हणून वापरले जाते. एकूण सोन्यापैकी 80 टक्के सोने हे दागिने बनविण्यासाठी तर पंधरा टक्के सोने गुंतवणुकीसाठी आणि पाच टक्के आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरले जाते. या उद्योगात संघटित क्षेत्रातील पंधरा हजारहून अधिक पेढ्या कार्यरत असून साडेचार लाख सोनार आणि एक लाखाहून अधिक सुवर्णकार यात गुंतलेले आहेत. पारंपरिक सुवर्ण विक्री व्यवसाय हा विश्वास आणि गुणवत्ता यावर असला तरी आपण घेतलेल्या दागिन्यांमध्ये नेमके सोने किती आहे आणि इतर धातूंचे प्रमाण किती आहे, याची माहिती ग्राहकाला मिळत नव्हती. इतकेच नव्हे, तर एका सोनाराचे दागिने दुसरा सोनार घेत असताना त्यावर तूट आणि शुद्धता याबाबत एकमत होत नसे. त्यामुळे ज्या सोनाराकडून दागिने घेतले, त्या सोनाराकडचे पुनर्विक्रीसाठी द्यावे लागत असे. नव्या हॉलमार्किंग व्यवस्थेमुळे गुणवत्तेची हमी मिळणार असून सर्व सोनार यांना हॉलमार्कप्रमाणे सोन्याची शुद्धता स्वीकारावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे दागिने गहाण ठेवत असताना बँक, वित्त संस्था यांनादेखील शुद्धतेबाबत आता खात्री आणि कर्ज मिळवणे सोपे होईल. सोने कर्ज व्यवहार याबाबत अनेक वित्तीय संस्थादेखील असलेल्या दिसतात. याचे कारण सोन्याच्या गुणवत्तेची हमी देणारी अधिकृत व्यवस्था उपलब्ध  नव्हती.

 

आंतरराष्ट्रीय निकषानुसार हॉलमार्कबाबत  9 कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंत हॉलमार्क उपलब्ध होतात. परंतु भारतात अद्यापि इतकी विविधता नाही. नंतरच्या कालखंडात ती येऊ शकेल. 22 कॅरेटचे सोने याचा अर्थ, त्या दागिन्यांमध्ये 24 भागापैकी 22 भाग सोन्याचे व दोन भाग इतर धातूचे आहेत, असा त्याचा अर्थ होतो. दागिने बनवताना शुद्ध सोन्याचे बनवणे शक्य नसल्यास त्यामध्ये इतर धातू मिसळावे लागतात. हे प्रमाण वाढेल तसे कॅरेट क्रमांक खाली येतो. नऊ कॅरेट याचा अर्थ 24 भागापैकी 9 भाग सोन्याचे व 15 भाग इतर धातूचे असा त्याचा अर्थ होतो. आपण आता शुद्ध सोन्याचे पैसे देऊन दागिने घेऊ शकतो. ही हॉलमार्किंगची सर्वात फायद्याची बाब आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका याठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा जास्त उपयोग होतो.

भारतात सोन्याचे दागिने आणि वस्तू यांच्या या गुणवत्तेची हमी देणारा महत्त्वाचा कायदा म्हणून हॉलमार्किंग 2016 मध्ये मंजूर करण्यात आला. तथापि त्याची अंमलबजावणी आता 1 जून 2021 पासून सर्वत्र केली जाणार आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. तसेच सोने खरेदीतील गैरप्रकार थांबण्यासही यामुळे मदत होईल. मात्र हा कायदा ज्या सुवर्णकार यांची उलाढाल चाळीस लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना यातून वगळले आहे. तसेच 18, 22, 23, 24 कॅरेटसाठी हॉलमार्किंग क्रमांक देण्यात आले आहेत. सध्या 256 जिल्ह्यातून हॉलमार्किंगसाठी आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध असून ऑगस्ट 2021 पर्यंत हॉलमार्किंग नसले तरी त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र 2021 नंतर ज्यांची उलाढाल चाळीस  लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना हॉलमार्कचा स्वीकार करावा लागेल. हॉलमार्किंगमधून घड्याळे पेन तसेच काही विशिष्ट प्रकारचे दागिने जसे जदू, कुंदन यांना वगळण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडले जाणारे दागिने हॉलमार्कपासून मुक्‍त आहेत.

हॉलमार्ककरिता 35 रुपये प्रती नग इतका खर्च ग्राहकाला द्यावा लागेल. ग्राहकाला सोन्याचा दागिना मिळत असताना त्याला पुढील बाबींची माहिती तपासून पाहावी लागेल. त्यावरील बीआय एसओ मार्क तसेच कॅरेट आणि हॉलमार्कचा क्रमांक व सुवर्णकाराचा क्रमांक एक त्यावर असेल. ग्राहकांना आपल्या दागिन्यांवर ही माहिती पाहता येईल. कल्याण ज्वेलर्स यांनी 'या कायद्यामुळे दीर्घकाळात फायदे होणार असून ग्राहकांना गुणवत्तेची हमी मिळणार आहे. तसेच सुवर्ण व्यवसाय हा अधिक संघटित होईल,' अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. सोने हे गुंतवणुकीचे साधन म्हणून फारसे प्रभावी ठरत नाही. कारण सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि भाव वाढ यांची तुलना केल्यास सोने महागाईविरोधात साधन म्हणून यशस्वी ठरते; परंतु त्याचा परतावा फारच आकर्षक नाही. तथापि, याला पर्याय म्हणून शासनाचे सुवर्ण रोखे किंवा इटीएफ स्वरूपात गुंतवणूक करणे अधिक सोयीचे ठरते.

सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा पेपर गोल्ड स्वरूपात केली जाणारी गुंतवणूक अधिक सुरक्षित, सोयीस्कर व लाभकारक ठरते. याच्या शुद्धतेबाबत काळजी करण्याची आवश्यकता नसते. तसेच चोरीस जाणे अथवा सांभाळण्याचा खर्च नसतो.

(लेखक शिवाजी विद्यापीठ येथे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत.)

कर्ज सहजरीत्या

हॉलमार्कचा आणखीन एक फायदा म्हणजे आपणास जेव्हा कर्जाची गरज असेल तेव्हा असे कर्ज सहजरीत्या व सोन्याच्या किमतीनुसार उपलब्ध होते. त्याची शुद्धता प्रमाणित असल्याने कोणत्याही वित्तसंस्था आता सहजपणे त्यावर कर्ज देतात. सर्वसामान्य सुवर्ण खरेदीदार आपणास अडचणीच्यावेळी पैशाची सोय होण्यासाठी सोन्यावर कर्ज घेत असतात. त्यांना हॉलमार्कचे सोने हे अत्यंत सोयीस्कर ठरते. आपणास हव्या त्या कॅरेटचे सोने खरेदी करणे व त्यासाठी सोन्याची ठरलेली किंमत देणे हे हॉलमार्कमुळे शक्य होते. 24 कॅरेट सोन्याचा दर देऊन आपण 24 कॅरेटचे सोने घेऊ शकतो व तेवढेच शुद्धतेचे आपण विकू शकतो. यामध्ये शुद्ध सोने देत असल्याने आपली फसवणूक होत नाही. केवळ एक कॅरेटचा जरी फरक पडला तरी मोठ्या प्रमाणात किंमत बदलते. सोन्यातील भेसळ, फसवणूक याचे महत्त्वाचे साधन म्हणजे कॅरेटमध्ये फसवणूक करणे. ते आता होणार नाही. ग्राहकाला त्याच्या किमतीचा योग्य मोबदला देणारी ही व्यवस्था निश्चितपणे स्वागतार्ह आहे. आपण आता सोने खरेदी करताना स्वतः हॉलमार्कचा आग्रह धरणे आवश्यक आहे. यासाठी थोडी अधिक किंमत म्हणजे दागिने 35 रुपये व जीएसटी म्हणजे साधारण पन्नास रुपये अधिक द्यावे लागतात. पण त्यातून पुढच्या पन्नास अडचणी कायमच्या कमी होतात. हा फायदा सर्वांचा असल्याने सोने-चांदी अशा मागण्या बाबतीत राष्ट्रीय मानक संस्थेसंस्थेने तयार केलेला हॉलमार्क असलेले दागिने हे सर्वांना फायद्याचे आहेत. याचा सुवर्ण बाजारपेठेसह सुवर्ण उद्योगातील सर्वांनाच फायदा होईल.

हॉलमार्किंग महत्त्वाचे फायदे  

हॉलमार्किंगचा फायदा सोन्याच्या सर्व प्रकारच्या व्यवहारावर होणार असून सामान्य ग्राहकाला त्याचे काही महत्त्वाचे फायदे  मिळतात.

* सोन्याची गुणवत्ता आतापर्यंत विश्वासावर आधारित होती. तो अनेक वेळा हा विश्वास योग्य नव्हता. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. हॉलमार्कसह घेत असलेल्या सोन्याचे मूल्य निश्चित गुणवत्तेचे आहे, याची खात्री मिळते. 

* सोन्याची पुनर्विक्री करीत असताना त्याच गुणवत्तेचे किंवा कॅरेटचे पैसे त्याला मिळणार आहेत, हा दुसरा फायदा. कोणताही सोनार त्यापेक्षा कमी गुणवत्ता ठरवून कमी किंमत देऊ लागला तर त्याच्या विरोधात कोर्टात कारवाई  करता येऊ शकेल.

* आपले सोने आपण देशभर कोणत्याही सोनाराला विकू शकतो, हा आणखी एक फायदा आहे. 

हॉलमार्कचे दागिने घेत असताना त्याबाबत पुढील चार बाबी पाहणे आवश्यक आहे.

* आपण घेत असलेला दागिना बी.आय.एस. म्हणजे हॉलमार्क केलेला आहे का, हे पहावे.

* त्याचे कॅरेट जेवढे असेल तेवढीच किंमत त्याला द्यायची आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर सर्वत्र सारखा असल्याने येथे फसवणूक होत नाही.

* सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क क्रमांकदेखील पाहता येतो व तो पाहूनच दागिना घ्यायचा असतो.

* ज्या सोनाराकडून आपण दागिना घेतो, त्याचा क्रमांकदेखील या दागिन्यांवर असतो.

    आपल्या दागिन्याचे बिल घेताना वरील सर्व बाबी तपासून घेतल्यास भविष्यकाळात कोणतीही अडचण येत नाही.

जुन्या दागिन्यांचे काय?

 याबाबत आणखीन एक प्रश्न निर्माण होतो; तो म्हणजे, आपल्या जुन्या दागिन्यांचे काय?

 आपले जुने दागिने आपण जेव्हा नव्याने करतो तेव्हा त्यावर हॉलमार्क हवा असल्यास तो मिळू शकतो, पण ही एक ऐच्छिक बाब आहे. त्यासाठी सक्‍ती नाही. मात्र दागिने विकताना हॉलमार्क असेल, तर आपली चांगली सोय होते. हॉलमार्कचे दागिने वापरून काही प्रमाणात झिजतात व तेवढ्या प्रमाणात त्याची किंमत कमी होणे साहजिक आहे. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news