

कर्मचारी भविष्य निधी संस्था म्हणजेच EPFO ही केवळ बचतीसाठीची स्कीम नाही, तर कर्मचाऱ्यांसाठी वृद्धापकाळातील मोठा आधार आहे. अनेक कर्मचारी असा समज करून बसलेले असतात की, पगारातून फक्त 12% इतकीच PF कपात होऊ शकते. पण प्रत्यक्षात नियम वेगळं सांगतात. रिटायरमेंट फंड मोठा करायचा असेल, तर EPFO कर्मचाऱ्यांना ‘स्वैच्छिक योगदान’ (Voluntary Contribution) करण्याची मुभा देते. म्हणजेच तुम्ही 12% पेक्षा अधिक रक्कमही PF मध्ये जमा करू शकता.
EPFO च्या माहितीप्रमाणे, PF मधील 12% कपात ही केवळ किमान अनिवार्य मर्यादा आहे. कर्मचारी इच्छित असल्यास या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम कपात करून घेऊ शकतात. या अतिरिक्त रकमेवरसुद्धा EPF दरानेच व्याज मिळतं आणि कंपाउंडिंग झाल्यामुळे रिटायरमेंट वेळी मोठा निधी तयार होतो.
तथापि, या नियमात एक मोठा मुद्दा आहे कंपनी म्हणजेच तुमचा नियोक्ता (Employer) 12% पेक्षा जास्त योगदान देण्यासाठी बाध्य नाही. कायद्यानुसार कंपनीला फक्त 12% इतकंच योगदान करावं लागतं. त्यामुळे, तुम्ही 12% पेक्षा जास्त रक्कम जमा केली, तरी अतिरिक्त रक्कम फक्त तुमच्या बाजूनेच जमा होईल; कंपनी त्यात भर घालणार नाही.
अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे वेतन मर्यादा. PF ची सामान्य गणना प्रत्येक कर्मचार्यासाठी 15,000 रुपयांच्या वेतन मर्यादेवर केली जाते. मात्र अनेक कर्मचार्यांचा पगार या मर्यादेपेक्षा अधिक असतो. अशा वेळी अनेकांना आपल्या ‘Actual Salary’ वर PF कापण्याची इच्छा असते. हे शक्य आहे, पण थेट अर्ज देऊन चालत नाही. EPF स्कीमच्या पॅरा 26(6) नुसार, यासाठी संबंधित Assistant PF Commissioner (APFC) किंवा Regional PF Commissioner (RPFC) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
परवानगी मिळाल्यानंतर PF तुमच्या वास्तविक पगाराप्रमाणे कापला जातो. यामुळे तुम्ही जास्त रक्कम PF मध्ये जमा करू शकता आणि रिटायरमेंट सेव्हिंग्स जलद गतीने वाढवू शकता.
तज्ज्ञ सांगतात की, दीर्घकाळासाठी PF मध्ये जास्त योगदान करणं हे अत्यंत फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. EPF वर मिळणारं व्याज सुरक्षित, स्थिर आणि करसवलतीसह असतं. त्यामुळे PF मधील स्वैच्छिक योगदान ही रिटायरमेंटसाठी एक मजबूत आर्थिक योजना ठरू शकते.
सारांश असा की, EPFO चे नियम लवचिक आहेत. रिटायरमेंटचा मोठा फंड तयार करायचा असल्यास 12% वर न थांबता अधिक योगदान करणे शक्य आहे. फक्त संबंधित परवानग्या आणि प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करणं आवश्यक आहे.