जून 2018 तिमाहीचे आता अनेक कंपन्यांचे विक्री व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. स्टरलाईट टेक्नॉलॉजीकडे 6034 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. तिचा तिमाहीचा ढोबळ नफा 292 कोटी रुपये आहे तर नक्त नफा 121 कोटी रुपये आहे. ढोबळ नफा गतवर्षीच्या तुलनेत 54 टक्केवर आहे व नक्त नफा 99 टक्क्याने वर गेला आहे. आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर शेअरचा भाव वाढून 327 रुपयांपर्यंत चढला. वर्षभरात तो 460 ते 500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे जिथे गुंतवणूक आवश्य व भरपूर हवी.
हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम कंपन्यांना या तिमाहीत वाढत्या वस्तू सूचीचा (Inventory)फायदा मिळेल व त्याचे रूपांतर नक्त नफा वाढण्यात होईल. हिंदुस्थान पेट्रोलियम सध्या 278 रुपयांना तर भारत पेट्रोलियम 392 रुपयाला उपलब्ध आहे. त्याचे किं/उ. गुणोत्तर 5.9 पट इतके उत्तम व आकर्षक आहे. वर्षभरात शेअर 380 रुपयांपर्यंत किमान जावा. तो 425 रुपयांपर्यंतही जाण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम वर्षभरात 500 रुपयांपर्यंत जावा. त्याचे किं/उ. गुणोत्तर 8.52 पट आहे. Oil Marketing Companies क्षेत्रातल्या या दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी खूप आवश्यक आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनही याच क्षेत्रात आहेत व सध्या 162 रुपयाला मिळाला आहे. त्याचे किं/उ. गुणोत्तर 6.92 पट आहे.
गेले काही दिवस 'मिडकॅप' व 'स्मॉल कॅप'कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. पण गेल्या शुक्रवारी संसदेत विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला होता; तो फेटाळला जाणे उघड होते. पण रालोआविरुद्ध विशेषतः पंतप्रधानांविरुद्ध विरोध आक्रमक आहेत. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेशमधल्या विधानसभांच्या निवडणुकात रालोआला बहुमतासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील अशी शक्यता आहे. त्यावेळच्या निकालामुळे धक्का बसू नये म्हणून पंतप्रधान त्याचवेळी लोकसभेच्या निवडणुकाही जाहीर करतील. पण हे सर्व तर्कवितर्क आहेत. त्याशिवाय महागाईचा बाऊ करून रिझर्व्ह बँक 2018 संपण्यापूर्वी दोनदा रेपो दर पाव टक्क्यात वाढवू शकेल. इतर चलनांच्या तुलनेत रुपया खूप घसरत आहे व काहीजणांना डॉलरच्यासंदर्भात त्याचा विनियम दर 70 रुपयांनी सीमा ओलांडू शकेल. सध्याची घसरण कमी व्हावी म्हणून रिझर्व्ह बँकेने 10 अब्ज डॉलर्स बाजारात ओतले आहेत. महागाई वाढण्याच्या शक्यतेला रिझर्व्ह बँक नुकतेच दुधाचे भाव वाढले आहेत. त्यातही दर व हमीदरात सरकारने केलेल्या वाढीचा आधार घेईल. एकूण शेअर बाजाराच्यादृष्टीने वातावरण आश्वासक नाही. फक्त पावसाळा समाधानकारक आहे ही एकच बाब आश्वासक आहे.
बजाज फायनान्सची या तीन महिन्यांची कामगिरी नेत्रदिपक आहे. जून 2018 तिमाहीचा तिचा नफा गतवर्षाच्या जूनपेक्षा 69 टक्क्याने वाढून 1018 कोटी रुपये झाला आहे. जून 2017 तिमाहीसाठी तो 602 कोटी रुपये होता. तिची ढोबळ अनार्जित कर्जे 1.39 टक्के आहेत व नक्त अनार्जित कर्जे 0.44 टक्के आहेत. यात यावेळी 16 टक्के वाढ दिसते. तरतुदीसाठी 327 कोटी रुपये आहे. घरांच्या कर्जांची जिंदगी धरून तिची व्यवस्थापनाखालील जिंदगी (Assets Under Management)93314 कोटी रुपये आहे. जून 2017 पेक्षा त्यात 35 टक्के वाढ दिसते. नक्त व्याजाचे उत्पन्न 2042 कोटी रुपयांवरून 2904 कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनीची बजाज हाऊसिंग फायनान्स ही पोट कंपनी जुलै 2017 मध्ये सुरू झाली. आकडे जाहीर झाल्यानंतर कंपनीचा शेअर 2746 रुपयांपर्यंत चढला. या भावाला किं/उ. गुणोत्तर 57.84 पट इतके वर आहे. शुक्रवारी 73 लक्ष शेअर्सचा व्यवहार झाला. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 2745 रुपये व 1511 रुपये होते.
दर तिमाहीला हा शेअर वरचा भाव दाखवत आहे. त्यामुळे हा शेअर आताही घेतला तरी चालेल. बजाज फायनान्सच्याप्रमाणेच बजाज फिनसर्व्ह या मूळ कंपनीचे आकडेही उत्तम आहेत. जून 2017 साठी तिचे उत्पन्न 7500.54 कोटी रुपये होते. नक्त नफा 584.53 कोटी रुपये होता. जून 2018 तिमाहीसाठी एकूण उत्पन्न 8767.73 कोटी रुपये होते. नक्त नफा 825.77 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन गेल्या जूनमध्ये 36.7 रुपये होते ते यावेळी 51.9 रुपये झाले आहे. बजाज फायनान्सचे शेअरगणिक उपार्जन जून 2017 तिमाहीसाठी 8.42 रुपये होते. यावेळी तिमाहीचे उपार्जन 14.53 रुपये झाले आहे.
गेल्या शुक्रवारी निफ्टीने पुन्हा 11 हजारची पातळी ओलांडली व तो 11 हजार 10 झाला. निर्देशांक शुक्रवारी 36496 वर बंद झाला. शुक्रवारी हेग 4123 रुपयांवर बंद झाला, तर ग्राफाईट इंडिया 1016 वर बंद झाला. हेग 4600 रुपयांपर्यंत चढू शकेल, तर ग्राफाईट 1250 रुपयांपर्यंत चढू शकेल. केपीआयटी टेक्नॉलॉजीजने 299 रुपयांचा उच्चांकी भाव दाखवत आहे. वर्षभरातील त्याचा किमान भाव 104 रुपये होता.
जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 122 रुपयाला सध्या उपलब्ध आहे. त्याचा वर्षभरातील उच्चांकी भाव 252 रुपये होता. सध्याचा भाव हा किमान भाव आहे. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर फक्त 5 पट दिसते. राजकीय वातावरण कसेही असले आणि जागतिक परिस्थितीही कशीही असली तरी शेअरबाजार गणेश चतुर्थीपासून नाताळपर्यंत उत्तमच राहील. जिंदाल स्टेनलेस सध्या 56 रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरातील त्याचा किमान भाव 132 रुपये होता. येत्या वर्षभरात पुन्हा हा उच्चांकी भाव दिसू शकेल. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 9 पट आहे.
चकाकता हिरा : फेडरल बँक
यावेळचा 'चकाकता हिरा' म्हणून 'फेडरल बँके'चा विचार करता येईल. सध्या बँकांमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे वाटेल,पण खासगी बँका राष्ट्रीकृत बँकांपेक्षा चांगल्या आहेत. कोटक महिंद्रा बँक, येस बँक, कर्नाटक बँक, आरबीएल बँक, नव्याने पदार्पण केलेली बंधन बँक, फेडरल बँका या त्यादृष्टीने चांगल्या आहेत. सध्या या बँकेच्या शेअरचा भाव 85 रुपयांच्या आसपास आहे व वर्षभरात तो 110 रुपयांपर्यंत जावा. म्हणजे ही वाढ 27 टक्के दिसते. वर्षभरातील शेअरचा कमाल व किमान भाव अनुक्रमे 127 रुपये व 74 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 17.67 पट आहे. रोज सुमारे 50 ते 60 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो.
बँकेच्या जिंदगीची गुणवत्ता (Asset Quality) सुधारत आहे. अनार्जित कर्जासाठी कमी तरतुदी कराव्या लागतील. बँक आपली फंड-फिना व आयडीबीआय फेडरलमधील गुंतवणूक विकून गंगाजली वाढवणार आहे. बँकेचे व्याज व अन्य उत्पन्न मिळून मार्च 2018 चे प्रत्यक्ष व मार्च 2019 चे संभाव्य उत्पन्न अनुक्रमे 4742 कोटी रुपये व 5603 कोटी आहे. 2017-18 या वर्षातील चार तिमाहीत बँकेने अनार्जित कर्जासाठी 236 कोटी रुपये, 177 कोटी रुपये, 162 कोटी रुपये व 371 कोटी रुपये तरतुदी केल्या आहेत. तिचा या चार तिमाहीसाठी नक्त नफा अनुक्रमे 210 कोटी रुपये, 263 कोटी रुपये, 260 कोटी रुपये व 145 कोटी रुपये आहे.
बँकेची ढोबळ अनार्जित कर्जे 2800 कोटी रुपये आहे, पण नक्त अनार्जित कर्जे फक्त 1550 कोटी रुपये आहेत. एकूण कर्जाची नक्त अनार्जित कर्जाचे प्रमाण फक्त 1.7 टक्के आहे. तिच्याकडील ठेवी 95800 कोटी रुपयांच्या आहेत व कर्जे 76300 कोटी रुपयांची आहेत. चालू व बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण(CASA) 33 टक्के आहे. ठेवीवरील व्याज 6.1 टक्का आहे, पण एकूण ठेवी व अन्य जमा यावरील व्याज 5.7 टक्के आहे व त्यावरील उत्पन्न 9.0 टक्के आहे. तिचा व्यवहार प्रामुख्याने केरळ राज्यात आहे. कृषी क्षेत्रासाठी ती शेतकर्यांना सोन्याच्या तारणावरही पैसे देते. तिच्या कर्जापैकी 43 टक्के कर्जे कॉर्पोरेट कंपन्यांना दिली आहेत. तिचे शेअरगणिक उपार्जन मार्च 2019 व 2020 साठी अनुक्रमे 5.8 रुपये व 7.9 रुपये दिसावे. शेअरची पुस्तकी किंमत सध्या 67 रुपये आहे व पुढील वर्षी ती 73 रुपये व्हावी. बँकेचे एकूण उत्पन्न मार्च 2013 वर्षासाठी 2693 कोटी रुपये होते. 2018 मार्चमध्ये ते 4791 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. 2018 मार्चसाठी ते 5600 कोटी रुपये अपेक्षित आहे. 2013 मार्चमध्ये ठेवी 57615 कोटी रुपयांच्या होत्या. आता त्या 111990 कोटी रुपये आहेत. बँकेचे भागभांडवल 394 कोटी रुपये आहे. त्यातील ढळशी ख चे भांडवल 11.6 टक्के आहे. खासगी क्षेत्रातील कमी भाव असलेला हा शेअर माफक प्रमाणात घ्यायला हरकत नाही. लेखाच्या सुरुवातीला स्टरलाईट टेक्नॉलॉजी गुतवणुकीसाठी उत्तम असल्याचे म्हटलेच आहे. तसेच हिंदुस्थान पेट्रोलियमही वर्षभरात 50 टक्के वाटू शकेल.
डॉ. वसंत पटवर्धन