

जयदीप नार्वेकर
निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीत जमा झालेली रक्कम एकाचवेळी काढून घ्यायची की तिच्या साहाय्यानेे दरमहा नियमित उत्पन्न मिळवायचे, हा प्रश्न अनेक नोकरदारांना पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) प्रस्तावित केलेल्या पद्धतशीर पैसे काढण्याच्या सुविधेमुळे निवृत्त कर्मचार्यांना आर्थिक नियोजनाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या सुविधेला ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉअल प्लॅन’ (एसडब्ल्यूपी) असे म्हटले जाते.
एसडब्ल्यूपीमध्ये भविष्य निर्वाह निधीतील संपूर्ण रक्कम एकाचवेळी काढण्याऐवजी दरमहा, दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी ठरावीक रक्कम काढता येईल. खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. मात्र, ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होण्याची तारीख आणि अंतिम अटी स्पष्ट होणे आवश्यक आहे.
समजा, एखादा कर्मचारी वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झाला आणि त्याच्या पीएफ खात्यात ५० लाख रुपये जमा आहेत. या रकमेवर वार्षिक ८.२५ टक्के व्याज मिळत असल्याचे गृहीत धरल्यास वर्षभरात सुमारे ४ लाख १२ हजार ५०० रुपये व्याज मिळेल. त्यानुसार दरमहा ३४ हजार ३७५ रुपये काढता येतील. व्याजदर कायम राहिला आणि काढलेली रक्कम व्याजापुरतीच मर्यादित ठेवली, तर मूळ ५० लाख रुपयांची रक्कम अबाधित राहू शकते. अर्थात, ही गणिती मांडणी असून आयुष्यभर एवढेच उत्पन्न मिळण्याची हमी नाही.
ग्रँट थॉर्न्टनचे भागीदार विवेक रामजी अय्यर यांनी दिलेल्या उदाहरणानुसार, दरमहा ४० हजार रुपये काढल्यास ५० लाखांचा निधी सुमारे २४ वर्षे पुरू शकतो. म्हणजेच वयाच्या ८२ वर्षांपर्यंत नियमित उत्पन्न मिळू शकते. दरमहा ५० हजार रुपये काढल्यास मात्र निधी सुमारे १५ वर्षांत संपण्याची शक्यता आहे.
महागाईचा विचार करून सुरुवातीला दरमहा ३० हजार रुपये काढायचे आणि दरवर्षी त्यामध्ये ५ टक्के वाढ करायची, असे नियोजन केल्यास निधी सुमारे २० वर्षे पुरेल. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात जास्त रक्कम काढण्याचा मोह टाळणे महत्त्वाचे ठरते.
प्रस्तावित सुविधेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खातेदाराच्या मृत्यूनंतर शिल्लक निधी वारसदाराला मिळू शकतो. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित वारसदार किंवा पात्र अवलंबित व्यक्तीला उर्वरित रक्कम काढण्याचा अथवा हप्त्यांमध्ये स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे सरकारी प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एसडब्ल्यूपी म्हणजे निश्चित आजीवन पेन्शन नव्हे. पीएफवरील व्याजदर दरवर्षी बदलू शकतो. महागाईमुळे ठरावीक मासिक उत्पन्नाची क्रयशक्तीही कमी होते. शिवाय, प्रत्यक्ष पैसे काढण्याची पद्धत, करनियम आणि व्याजाची गणना यांचा अंतिम परताव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निवृत्तांनी मासिक खर्च, वैद्यकीय गरजा आणि आपत्कालीन निधी यांचा विचार करूनच पैसे काढण्याची रक्कम निश्चित करणे हिताचे ठरेल.