सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन म्हणजेच एसटीपी ही अशी योजना आहे की, त्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अन्य श्रेणीत स्थानांतरित करू शकतो. शेअर बाजारात चढ-उतार किंवा बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेण्याऐवजी आहे त्या कंपनीतच वेगळ्या फंडात गुंतवू शकतात.
गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात चढ-उतार पाहावयास मिळत आहे. कधी बाजार उसळी घेतो, तर कधी बराच घसरताना दिसतो. अशाप्रकारच्या अस्थिर बाजारात म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करणार्यांना भांडवलातही फरक दिसतो. काहीजण म्युच्युअल फंडमधील नकारात्मक किंवा कमी परतावा पाहून सर्व पैसे काढून घेण्याचा विचार करतात, तर काहीजण फंड बदलण्याबाबतचा मुद्दा मांडतात. अशावेळी संपूर्ण पैसे काढण्यापेक्षा आहे त्या कंपनीतच वेगळा फंड निवडण्याचा विचार चांगला राहू शकतो. अशावेळी चढ-उताराचा फार परिणाम न करणार्या गुंतवणूक योजनेत तुमची गुंतवणूक स्थानांतरित करता येऊ शकते. म्हणजेच म्युच्युअल फंड कंपन्यांनी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनप्रमाणेच सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनची (एसटीपी) सुविधा दिली आहे.
सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात किमान आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. अर्थात, काही असेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजेच ‘एएससी’ हे गुंतवणूकदारांकडून काही शुल्क आकारू शकतात. यासाठी कंपनीशी यासंदर्भात चर्चा करायला हवी. कारण, कंपन्या नेहमीच एसटीपी सुविधा देण्याच्या नावावर 2 टक्क्यांपर्यंत प्री मॅच्योरिटी एक्झिट लोड वसूल करू शकतात. काही कंपन्या केवळ सेवा शुल्क घेतात, तर काही कंपन्या काहीही शुल्क आकारत नाहीत. गुंतवणूकदार अन्य कंपनीकडे वळत तर नाही ना, यावर त्यांचे समाधान असते.
तुम्ही एखादा फंड दुसर्या फंड श्रेणीत ट्रान्स्फर करू इच्छित असाल, तर किमान सहा हप्ते किंवा त्यापेक्षा अधिक हप्त्यांत तो ट्रान्स्फर करावा लागेल. अर्थात, या काळात गुंतवणूकदारांना सोर्स फंड आणि टार्गेटेड फंड या दोन्ही श्रेणींतून परतावा मिळत राहील.
सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन म्हणजे एसटीपीचे तीन प्रकार आहेत. यात पहिले म्हणजे फिक्स्ड ट्रान्स्फर प्लॅन यात सोर्स फंडपासून एक निश्चित रक्कम दैनिक, मासिक, सहामाहीच्या आधारावर टार्गेटेड फंडमध्ये ट्रान्स्फर होत राहील. दुसरे म्हणजे कॅपिटल अॅप्रिसिएशन एसटीपी. या प्लॅनमध्ये सोर्स फंडपासून मिळणारा परतावा हा टार्गेटेड फंडमध्ये ट्रान्स्फर करण्याची सुविधा असते. अर्थात, फंडावर जेवढे भांडवल मिळेल, तेवढीच रक्कम दुसर्या श्रेणीतील फंडामध्ये स्थानांतरित केली जाईल. याचा फायदा म्हणजे आपली मूळ रक्कम ही सोर्स फंडमध्ये कायम राहील आणि त्यावरही परतावा मिळत राहील. एसटीपीच्या तिसर्या प्रकाराला फ्लेक्सी एसटीपीच्या नावाने ओळखले जाते. याप्रकारच्या योजनेत सोर्स फंडमधून टार्गेटेड फंडमध्ये जमा होणारी रक्कम ही बाजाराच्या चढ-उतारावर आणि परताव्याच्या दरावर निश्चित केली जाते. उदा. परताव्याचा दर अधिक असेल, तर अधिक रक्कम ट्रान्स्फर केली जाते किंवा परतावा कमी असेल, तर कमी प्रमाणात रक्कम टार्गेटेड फंडमध्ये ट्रान्स्फर होईल.
सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन म्हणजेच एसटीपी ही अशी योजना आहे की, त्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अन्य श्रेणीत स्थानांतरित करू शकतो. उदा. तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडच्या पेन्शन प्लॅन श्रेणीत गुंतवणूक केली असेल आणि अलीकडच्या काळात त्यातून चांगला परतावा मिळत नसेल किंवा नकारात्मक स्थितीत परतावा जात असेल आणि परिणामी भांडवल वाढत नसेल, तर अशावेळी म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना ‘एसटीपी’ची सुविधा प्रदान करते. याप्रमाणे पेन्शन फंडमधील गुंतवणूक अन्य म्युच्युअल फंड श्रेणीत जसे इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा चिल्ड्रन फंडसारख्या योजनेत स्थानांतरित करणे. या सुविधेनंतर गुंतवणूकदारची रक्कम ही दुसर्या योजनेत दरमहा हळूहळू ट्रान्सफर होत राहील. जुन्या म्युच्युअल फंड योजनेला फंड कंपन्या सोर्स फंड म्हणून पाहतात आणि ज्या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, त्याला टार्गेट फंड असे म्हणतात.
एसटीपी हे एकाच नाही, तर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून एसटीपीची सुविधा घेत असाल, तर भविष्यात टार्गेटेड फंडमधून अधिक फायदा मिळू शकतो. याशिवाय पोर्टफोलिओच्या अलोकेशनसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही. उलट फंड श्रेणी बदलल्याने पोर्टफोलिओचा विस्तार होईल. उदा. इक्विटी फंड हा सोर्स फंड असेल आणि बँकिंग फंड श्रेणीला टार्गेटेड फंड करत असाल आणि त्याचवेळी कॅपिटल अॅप्रिसिएशन एसटीपीची सुविधा निवडत असाल, तर टार्गेटेड फंड हा बँकिंग श्रेणीचा असेल. म्हणजेच अस्थिर इक्विटी श्रेणीतील पैसा तुलनेने स्थिर असलेल्या बँकिंग श्रेणीत टप्प्याटप्प्याने येईल. एकप्रकारे पोर्टफोलिओत वैविध्यपणा येईल आणि त्यातून चांगला फायदा मिळेल. शिवाय एसटीपीच्या सुविधेने जोखीमदेखील कमी राहते. उदा. सोर्स फंड इक्विटी आधारित असेल, तर साहजिकच त्यात जोखीम अधिक राहते आणि टार्गेटेड फंड हा डेट श्रेणीतील असेल, तर फंडची जोखीमही आपोआपच कमी होईल.
तुम्ही सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅनची सुविधा घेत असाल, तर तुम्हाला त्याच कंपनीच्या दुसर्या फंडची श्रेणी निवडावी लागेल. तुम्ही अन्य कंपनीच्या फंडमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर फंड मॅनेजर ही सुविधा देत नाही. एसटीपीची सुविधा ही फंडांतर्गत गुंतवणुकीचा प्रकार बदलण्याची मुभा देते, अन्य म्युच्युअल फंड हाऊसमध्ये जाण्याची नाही.