Insurance dark patterns | विमा क्षेत्रातील ‘डार्क पॅटर्न्स’

Insurance dark patterns |
Insurance dark patterns | विमा क्षेत्रातील ‘डार्क पॅटर्न्स’
Published on
Updated on

सूर्यकांत पाठक

विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती झाल्यामुळे आज घरबसल्या पॉलिसी काढणे सोपे झाले असले, तरी या सुविधेसोबतच ग्राहकांच्या फसवणुकीचे नवे मार्गही कंपन्यांनी शोधले आहेत. सध्या विमा कंपन्यांच्या संकेतस्थळांवर आणि अ‍ॅप्सवर ‘डार्क पॅटर्न्स’चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा प्रकार म्हणजे ग्राहकांना फसवून त्यांच्याकडून अधिक पैसे उकळण्यासाठी केलेली एक तांत्रिक मांडणी आहे.

जेव्हा एखादा ग्राहक जीवन विमा किंवा वाहन विमा खरेदी करतो, तेव्हा कंपनीकडून आधीच काही अतिरिक्त कव्हर (अ‍ॅड-ऑन्स) निवडलेले असतात. उदाहरणार्थ, वाहन विम्यामध्ये ‘रोडसाईड असिस्टन्स’ किंवा ‘इंजिन प्रोटेक्शन’ यांसारखे पर्याय आधीच ‘टिक’ केलेले असतात. ग्राहकाचे याकडे लक्ष न गेल्यास त्याला या अनावश्यक सेवांसाठी विनाकारण जास्तीचा हप्ता भरावा लागतो.

दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘किमतीचा संभ्रम’ आणि ‘अद़ृश्य शुल्क’. सुरुवातीला जाहिरातीमध्ये विम्याचा हप्ता अत्यंत कमी दाखवला जातो. मात्र, जेव्हा ग्राहक सर्व माहिती भरून शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा त्यात प्रक्रिया शुल्क, सोयीचे शुल्क किंवा इतर प्रशासकीय खर्च जोडून ती रक्कम वाढवली जाते. ग्राहकाला वाटते की, आपण आता सर्व माहिती भरली आहे, तर पुन्हा दुसरीकडे कशाला शोधायचे आणि याच मानसिकतेचा फायदा कंपन्या घेतात. यालाच तांत्रिक भाषेत ‘बास्केट स्नेकिंग’ असेही म्हटले जाते, जिथे ग्राहकाच्या संमतीशिवाय त्याच्या बिलात काही घटक चोरून टाकले जातात.

तसेच, ग्राहकांवर दबाव निर्माण करण्यासाठी ‘फॉल्स अर्जन्सी’चा वापर केला जातो. ही सवलत फक्त पुढील 10 मिनिटांसाठी आहे किंवा आत्ताच 5 लोकांनी ही पॉलिसी खरेदी केली आहे अशा प्रकारचे संदेश दाखवून ग्राहकाला विचार करण्यास वेळच दिला जात नाही. दबावाखाली घेतलेले विम्याचे निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. याशिवाय, विमा कंपन्या ग्राहकांकडून केवळ माहिती घेण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक घेतात आणि त्यानंतर त्यांची संमती आहे असे भासवून सतत कॉल्स आणि संदेशांचा भडिमार सुरू करतात. ग्राहकांनी या डिजिटल जाळ्यातून वाचण्यासाठी अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. कोणताही विमा खरेदी करताना प्रत्येक पर्यायाची नीट तपासणी करणे, अटी व शर्तींचे बारकाईने वाचन करणे आणि घाईघाईत पेमेंट न करणे हेच हिताचे ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news