

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत दोन लाख महिला विमा एजंट नेमण्यात येणार आहेत.
विम्याबाबत सामाजिक जागरूकता वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत, 18 ते 70 वर्षे वयोगटातील 10 वी उत्तीर्ण महिलांना विमा एजंट होण्यासाठी प्रशिक्षण आणि मानधन देण्यात येणार आहे.
या विमा सखींना पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसर्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसर्या वर्षी 5,000 रुपये मासिक अनुदान मिळेल. याशिवाय या विमा सखींना कमिशनचा लाभही मिळणार आहे. प्रशिक्षणानंतर या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील. यामध्ये बी.ए. पास असलेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणजेच डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
या महिलांनी आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. यासाठी त्यांची वित्तीय समज वाढावी, विम्याचं महत्त्व कसे समजावून सांगावे, यासाठी तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समजावून सांगण्याची पद्धत शिकवली जाणार आहे.
विमा सखी बनण्यासाठी दहावी पास असल्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.
विमा सखी या एलआयसीच्या नियमित कर्मचारी असणार नाहीत. त्यामुळे त्यांना नियमित कर्मचार्यांप्रमाणे बोनस किंवा कमिशन यांसारखे कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.
प्रत्येक विमा सखीला दरवर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. तसेच या विमा सखींकडून ज्या पॉलिसी विकल्या जातील, त्यातील 65 टक्के पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत सक्रिय राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आपण विकलेल्या पॉलिसी पुढे सुरू राहतील, याची काळजीही या विमा सखींनी घ्यावयाची आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या महिलांना एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर टेस्ट 2 मध्ये जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करताना संकेतस्ळावर नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि पत्ता आदी तपशील नमूद करणे गरजेचे आहे.
एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित असणार्यांनी तशी माहिती देणे बंधनकारक आहे.