केंद्र सरकारने आयुष्मान भारत विमा योजनेत व्यापक बदल करत देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांपर्यंतचा मोफत विमा कवच देण्याची घोषणा केली आहे. या बदलाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. देशातील कोणताही ज्येष्ठ नागरिक उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्येष्ठांना स्पेशल कॅशलेस कार्ड दिले जाणार असून, या आधारे देशातील समारे तीस हजार खासगी आणि सरकारी रुग्णालयांत मोफत उपचाराची सुविधा मिळेल.
देशातील प्रत्येक कुटुंबातील 70 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेनुसार प्रत्येक कुटुंबातील 70 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील सदस्याला योजनेच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. योजनेचा सदस्य असलेला ज्येष्ठ नागरिक हा पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत करून घेण्यास पात्र असेल. त्याचा संपूर्ण खर्च सरकारकडून उचलला जाईल.
या योजनेत सामील असलेल्या ज्येष्ठांना विशेष प्रकारचे कार्ड दिले जाईल. या कार्डच्या मदतीने संबंधित व्यक्ती कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकतो. योजनेचा देशातील सुमारे सहा कोटी ज्येष्ठांना फायदा होण्याची शक्यता आहे.
योजनेचे कार्ड तयार करण्यासाठी अर्ज देण्याची प्रक्रिया खूपच सुलभ आहे. कोणताही व्यक्ती आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा अर्ज ऑनलाईन देऊ शकतो. अर्ज भरण्यासाठी नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीच्या पोर्टलवर किंवा आयुष्मान अॅपची मदत घेऊ शकतो. पोर्टल किंवा अॅपवर दिसणारा अर्ज भरून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ती पूर्ण झाल्यानंतर अर्ज भरावा. यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड पोर्टलवर दिसेल. या कार्डची प्रिंट काढून लॅमिनेशन करून घ्यावे. सदस्यांना कार्ड देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य सरकारच्या मदतीने मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी रुग्णालयात हेल्प डेस्क तयार केला जाणार असून, तेथे ज्येष्ठ नागरिक स्वत: कार्ड तयार करू शकतात. देशातील वृद्धाश्रम आणि कम्युनिटी सेंटरवरदेखील शिबिराच्या मदतीने कार्ड तयार केले जाईल.
योजनेत सामील होणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचे आकलन आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेनुसार केले जाणार आहे. कार्डवरील जन्मतारखेनुसार ज्येष्ठाचे वय 70 वर्षे असेल, तर ते सर्वप्रकारचे वैद्यकीय लाभ मिळण्यास पात्र असतील. त्यांच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि या विम्यापोटी कोणताही हप्ता भरावा लागणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्न अणि खर्चाचे विवरण मागितले जाणार नाही.
ज्या ज्येष्ठांकडे एखाद्या खासगी विमा कंपनीची विमा पॉलिसी असेल अथवा विमा योजनेनुसार विमा सुविधा घेत असतील, तेदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय एक्स सर्व्हिसमन, कंट्रब्युटरी हेल्थ स्कीम, आयुष्मान सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स यांसारख्या योजनांचा लाभ घेणारी मंडळी ही जुन्या योजनेत राहू शकतात किंवा नव्या आयुष्मान भारत योजनेतही सामील होऊ शकतात. त्यांना दोन्ही पर्याय खुले असतील.
देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा देण्यासाठी जनआरोग्य योजनेनुसार देशभरातील सुमारे तीस हजार रुग्णालयांना सामील करण्यात आले आहे. यात सुमारे 13 हजार खासगी आणि 17 हजार सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक भरती झाल्यास त्याला पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळेल.
मोफत उपचाराची योजना अगोदरपासूनच सुरू असून, त्यात नव्याने केलेला बदल म्हणजे देशातील सर्वच ज्येष्ठ नागरिक पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतील; मात्र या योजनेचा लाभ घेणार्या ज्येष्ठांना पुन्हा नव्याने विशेष कार्ड काढावे लागेल. अर्थात, त्यांना पूर्वीच्या योजनेचे लाभ मिळतच राहतील अणि नव्या योजनेनुसार त्यांना पाच लाख रुपयांचा टॉप अप कवचदेखील मिळेल; परंतु अतिरिक्त विमा कवच त्यांच्या कुटुबांतील 70 पेक्षा कमी वयोगटातील व्यक्तींना लागू होणार नाही. शिवाय कुटुंबात पती-पत्नी दोघांचेही वय 70 पेक्षा अधिक असेल, तर दोघांनाही टॉप अपचा लाभ दिला जाईल. याप्रमाणे ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड असेल त्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल.