

जगदीश काळे
आधार ओळखपत्र हे बायोमेट्रिक प्रणालीवर आधारित असल्यामुळे त्याचा डुप्लिकेट तयार करणे शक्य नाही. त्यामुळे मृत व्यक्तींच्या ओळखीचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्यांचे आधार क्रमांक वेळेवर निष्क्रिय करणे ही काळाची गरज आहे.
‘माय आधार’ पोर्टलवरून कुटुंबातील मृत व्यक्तीचा मृत्यू सहज नोंदवता येतो, ही गोष्ट निश्चितच जनहितार्थ उपयुक्तआणि सुलभ ठरते. प्रत्येक नागरिकाने जर ही जबाबदारी पार पाडली, तर आधार प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल, यात शंका नाही.
आधार क्रमांक हा प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा ओळख पुरावा आहे. तो बँक व्यवहार, सरकारी अनुदान, निवृत्तीवेतन, पासपोर्ट, रेशन, गॅस, वीजबिल इत्यादी अनेक गोष्टींसाठी आवश्यक असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या मृत व्यक्तीचा आधार क्रमांक निष्क्रिय केला नसेल आणि त्याचा गैरवापर झाला, तर त्यावर बोगस व्यवहार होऊ शकतात.
हे टाळण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूएआयडीएआयने मोठा निर्णय घेतला असून, देशभरातील जवळपास एक कोटी वीस लाख मृत व्यक्तीचे आधार क्रमांक रद्द केले आहेत. ही मोहीम सध्या देशातील 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू असून, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम अर्थात नागरी नोंदणी प्रणालीच्या माध्यमातून मिळालेल्या नोंदींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रयत्नांमागे उद्देश केवळ एकच आहे; मृत व्यक्तींच्या आधार क्रमांकाचा कुणीही गैरवापर करू नये आणि सरकारी योजना किंवा बँक व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ नये.
सदर आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासाठी सुमारे 1 कोटी 60 लाख मृत व्यक्तींची माहिती प्राप्त झाली होती. यातील सखोल पडताळणी केल्यानंतर सुमारे एक कोटी सतरा लाख आधार क्रमांक कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आले. उर्वरित राज्यांमध्ये जिथे सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम अद्याप प्रभावीपणे कार्यरत नाही, तिथेही ही प्रक्रिया सुरू असून, सुमारे सहा लाख सत्तर हजार मृत्यू नोंदी प्राप्त झाल्या आहेत. यावर देखील कार्यवाही सुरू आहे. यूएआयडीएआयने यासाठी संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधला असून, मृत व्यक्तींच्या आधार क्रमांकांची खात्रीलायक पडताळणी करूनच त्यांना रद्द केले जात आहे.
यूएआयडीएआयने नागरिकांना आता एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली असून, ‘माय आधार’ या ऑनलाईन पोर्टलवरून कुटुंबातील मृत व्यक्तीचा मृत्यू स्वतः नोंदवता येतो. या सुविधेचा उद्देश म्हणजे मृत व्यक्तीचे आधार क्रमांक अधिकृतपणे निष्क्रिय करून त्याचा कुठलाही गैरवापर होऊ न देणे. ही सेवा सध्या फक्तसिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमद्वारे जोडलेल्या 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
सध्या यूएआयडीएआयकडून अशा मृत व्यक्तींची यादीदेखील तयार करण्यात येत आहे, जे शंभर वर्षांहून अधिक वयाचे आहेत. या व्यक्ती जिवंत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी त्यांची माहिती संबंधित राज्य सरकारांना पाठवली जात आहे. त्या अनुषंगाने संबंधित माहितीची पडताळणी केल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाते.
यूएआयडीएआय आता बँका आणि अन्य आधार संबंधित संस्थांमार्फत देखील मृत्यू नोंदी मिळवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी डिजिटल माहितीचा उपयोग करून मृत व्यक्तींची ओळख पटवली जाणार आहे. भविष्यात ही सेवा देशातील इतर राज्यांमध्ये देखील लागू करण्यात येणार असून, त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होईल.
या सेवेमार्फत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी संबंधित नातेवाईकाने काही आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यासाठी सर्वप्रथम ‘माय आधार’ पोर्टलवर जावे लागते. पोर्टलवर गेल्यानंतर ‘कुटुंबातील सदस्याचा मृत्यू नोंदवा’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर आधार क्रमांक व वन टाईम पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करून पुढील माहिती भरावी लागते. मृत व्यक्तीचे नाव, आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक, मृत्यू प्रमाणपत्राचे तपशील, मृत व्यक्तीचे लिंग, मृत्यू झाल्याचा दिनांक, प्रमाणपत्र जारी झाल्याची तारीख आणि संबंधित मृत व्यक्तीशी तुमचा काय नातेसंबंध आहे, हे देखील स्पष्ट करावे लागते. यासोबत मृत्यू प्रमाणपत्राची प्रत देखील अपलोड करावी लागते. सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी स्वघोषणेवर सहमती दर्शवून फॉर्म सादर करावा लागतो. एकदा ही माहिती सबमिट केल्यावर यूएआयडीएआय त्याची खातरजमा करते आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय केला जातो. ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात राबवली जात असल्यामुळे यामध्ये वेळेचा अपव्यय होत नाही आणि नातलगांना कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रक्रिया करावी लागत नाही.